कोल्हापूर, दि. 1 (जि.मा.का.)
: अद्यापही काही एचआयव्ही संसर्गीत शासनाच्या विविध लाभापासून वंचित आहेत. त्यांच्यापर्यंत
पोहचून त्यांचे प्रबोधन करून त्यांना लाभ मिळवून
देण्यासाठी प्रयत्न करावेत. त्याचबरोबर रक्त संकलनातील ज्या व्यक्ती एचआयव्ही पॉझिटिव्ह
असतील अशांवर लवकरात-लवकर उपचार सुरू व्हावेत यासाठी रक्त पेढयांनी याची तात्काळ माहिती
जिल्हा एड्स नियंत्रण पथकाकडे द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिले.
जिल्हा एड्स प्रतिबंध आणि नियंत्रण
समितीची बैठक नुकतीच झाली. या बैठकीस सहाय्यक
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विलास देशमुख, शहर
क्षयरोग अधिकारी डॉ. ए.बी.परितेकर, डीटीसीच्या मेडीकल ऑफिसर डॉ. रूपाली भाटे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी दिपा शिपुरकर,
जिल्हा पर्यवेक्षक निरंजन देशपांडे, संग्राम संस्थेच्या मिना शेषू आदी उपस्थित होते.
जिल्हा पर्यवेक्षक श्री. देशपांडे
आणि जिल्हा कार्यक्रम अधिकारी श्रीमती शिपुरकर यांनी संगणकीय सादरीकरण करून गेल्या
तीन महिन्यातील जिल्ह्याचा आढावा दिला. 1 हजार 790 जणांनी मोफत एसटी पासचा लाभ घेतला
आहे. संजय गांधी निराधार योजनेचा 1 हजार 472 जणांनी लाभ घेतला आहे. याच धर्तीवर केएमटीचा
लाभही यांना मिळावा, अशी मागणी श्रीमती शिपुरकर यांनी केली.
जिल्हाधिकारी
श्री. देसाई म्हणाले, केएमटीच्या बसचा लाभ मिळवून देण्यासाठी महापालिका आयुक्तांना
पत्र दिले जाईल. या लाभासह अद्यापही काही प्रकरणे प्रलंबित असतील तर ती मार्गी लावावीत.
एचआयव्ही संसर्गीतांच्या कोणत्याही गोपनियतेचा भंग होणार नाही याची जबाबदारी संबंधित
यंत्रणेने घ्यावी. आवश्यक त्या ठिकाणी पोस्टाने पत्रव्यवहार करून सूचना द्यावी. संसर्गीतांसाठी
आवश्यक असणाऱ्या तपासणी प्रयोगशाळेसाठी साधन-सामग्री, संगणक यासाठी स्वतंत्र प्रस्ताव
तयार करून द्यावा.
एड्स प्रतिबंधक
उपाययोजनेबरोबरच जनजागृतीचे काम जिल्ह्यात प्रभावीपणे होत आहे. त्यामुळे संसर्गीतांच्या
संख्येत घट दिसून येत आहे. तृतीयपंथी, वेश्या व्यवसाय करणाऱ्यांना आवश्यक सामाजिक सुविधा
मिळाव्यात यासाठी विशेष प्रयत्न करावेत,असेही ते म्हणाले.
यावेळी क्षयरोग निर्मुलन कार्यक्रमावरही सविस्तर
चर्चा करण्यात आली.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.