बुधवार, २० नोव्हेंबर, २०१९

बाल गृहातील मुला-मुलींच्या चाचा नेहरू बाल महोत्सवास प्रारंभ मुलांमधील कलागुण शोधून त्यांना प्रोत्साहित करणार-आमदार चंद्रकांत जाधव



        कोल्हापूर, दि. 20 (जिमाका) : जिल्ह्यातील बाल गृहातील मुला-मुलींच्या 'चाचा नेहरू बाल महोत्सवास' आज नुतन आमदार चंद्रकांत जाधव यांच्याहस्ते प्रारंभ झाला.
       महिला बाल विकास विभागांतर्गत जिल्ह्यातील शासकीय स्वयंसेवी संस्थांमध्ये पुनर्वसनासाठी दाखल झालेल्या मुलांसाठी येथील विभागीय क्रीडा संकुलामध्ये 3 दिवसांसाठी चाचा नेहरू बाल महोत्सवाचे आयोजन केले आहे. या महोत्सवामध्ये जिल्ह्यातील बाल गृहातील मुले-मुली तसेच स्थानिक शाळातील मुले-मुली सहभागी झाली असून 3 दिवसामध्ये खो-खो, कॅरम, कबड्डी, बुध्दीबळ, 400 मीटर व 100 मीटर धावणे तसेच निबंध, वत्कृत्व आणि चित्रकला स्पर्धांचे आयोजन केले आहे.
          बाल गृहातील मुला-मुलींच्या सुप्त गुणांना वाव देऊन त्यांच्यात खिलाडूवृत्ती, बंधुभाव, सांघिक भावना निर्माण व्हावी यासाठी जिल्हा महिला व बाल विकास विभागाने जिल्हास्तरावर चाचा नेहरु बाल महोत्सवाचे आयोजन केले आहे. येथील विभागीय क्रीडा संकुलामध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमाचा शुभारंभ आमदार चंद्रकांत जाधव यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलनाने केला. त्यांच्यासमवेत प्रांताधिकारी वैभव नावडकर, बालकल्याण संकुलच्या मानद कार्यवाह पद्मजा तिवले, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी बी. जी. काटकर, बाल विकास प्रकल्प अधिकारी निवेदिता महाडिक, बालन्याय मंडलाच्या सदस्या प्रियदर्शनी चोरगे यांच्यासह बालकल्याण समितीचे  अध्यक्ष व सदस्य उपस्थित होते.
मुलांमधील कलागुण शोधून त्यांना प्रोत्साहित करणार-आमदार चंद्रकांत जाधव
          बाल गृहातील मुला-मुलींच्या कला गुणांना वाव मिळावा यासाठी हा बाल महोत्सव उपयुक्त असल्याचे स्पष्ट करून आमदार श्री. जाधव म्हणाले, बाल गृहातील मुलांमधील खेळाचे कलागुण शोधून त्यांना प्रोत्साहित करण्याची भूमिका महिला व बाल विकास विभागाने घ्यावी. याकामी सर्वते सहकार्य आणि मदत केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. ते म्हणाले, बाल संकुलातील मुला-मुलींना शैक्षणिक तसेच क्रीडा विषयक आवश्यक सोई-सुविधा उपलब्ध करून देवून त्यांना मदत करण्याची भूमिका यापुढील काळात घेतली जाईल. शासन आणि लोकसहभागातूनन बाल संकुलांचे व्यवस्थापन अधिक दर्जेदार आणि पोषक करण्यावर भर राहील, असेही ते म्हणाले.
          प्रारंभी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी बी. जी. काटकर यांनी स्वागत करून चाचा नेहरू बाल महोत्सवाची संकल्पना व्यक्त केली. ते म्हणाले, बाल संकुलातील तसेच स्वयंसेवी संस्थांमधील पुनर्वसनासाठी दाखल झालेल्या अनाथ, निराधार, उन्मार्गी मुला-मुलींमधील सुप्त गुणांना वाव देवून त्यांच्यात सांघिक भावना निर्माण करण्याच्या उद्देशाने या स्पर्धाचे आयोजन 20 ते 22 नोव्हेंबर या कालावधील आयोजन केले आहे. या स्पर्धांच्या आयोजनासाठी विविध सेवाभावी स्वयंसेवी संस्थांनी केलेली मदत उल्लेखनीय असल्याचेही ते म्हणाले.
          प्रारंभी आमदार चंद्रकांत जाधव यांच्या हस्ते क्रीडा ध्वज फडकावून स्पर्धांना सुरूवात करण्यात आली. महोत्सवामध्ये सहभागी झालेल्या बालचमुंच्या संचलनाची मानवंदना स्विकारली. खेळाडू विद्यार्थ्यांनी शपथ घेतली यानंतर मुलांच्या स्पर्धांचा शुभारंभही त्यांच्या हस्ते करण्यात आला. समारंभास महिला व बालकल्याण विभागाचे जिल्हा परिवीक्षा अधिकारी ई.एम. बारदेसकर तसेच विधी अधिकारी आशिष पुंडपळ, जिल्हा संरक्षण अधिकारी संजय चौगले यांच्यासह विविध बाल संकुल संस्थांचे अध्यक्ष,पदाधिकारी, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.
0000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.