बुधवार, ६ नोव्हेंबर, २०१९

नियमित कर्ज फेडणाऱ्या लाभधारकाच्या खात्यात महामंडळाकडून 12 टक्के व्याज



कोल्हापूर, (जि.मा.का.) दि. 6 : महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत वितरीत केलेल्या कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या लाभधारकांच्या बँक खात्यात 12 टक्के व्याज महामंडळ जमा करेल, अशी माहिती जिल्हा व्यवस्थापक हनमंत बिरादार यांनी दिली.
इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत 2019-20 या आर्थिक वर्षामध्ये दहा लाख रक्कमेपर्यंतची वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना व दहा लाख ते पन्नास लाख पर्यंतची गट कर्ज व्याज परतावा योजना राबविण्यात येत आहे. इतर मागास वर्गातील पात्र व्यक्ती व गटासाठी ही योजना आहे. ही योजना बँकेमार्फत असून संपूर्ण कर्ज रक्कम बँकेची असेल. कर्जाची परतफेड नियमित करणाऱ्या लाभधारकाच्या आधारलिंक बँक खात्यावर 12 टक्केपर्यंतचे व्याज महामंडळ जमा करेल.
कर्जाच्या अटी व शर्ती पुढीलप्रमाणे- वैयक्तिक अर्जदार व गटातील अर्जदार महाराष्ट्र राज्यातील रहीवाशी असावेत. अर्जदाराचे कर्ज खाते आधारकार्ड लिंक असणे अनिवार्य आहे. अर्जदाराचे वय वैयक्तिक योजनेसाठी 18 ते 50 आणि गट योजनेसाठी 18 ते 45 वर्ष असावे. योजना फक्त ऑनलाईन असून महामंडळाची वेबसाईट www.msobcfdc.org वरील व्याज परातावा योजना येथून वेब पोर्टलवर नोंदणी आवश्यक आहे. वैयक्तिक अथवा गट योजनेसाठी संबंधित अर्जदाराच्या एकत्रित कुटूंबाचे सर्व मार्गाने मिळणारे एकूण वार्षिक उत्पन्न नॉन क्रिमीलेअरकरीता असलेल्या कौटुंबिक वार्षिक उत्पन्न 8 लाखाच्या मर्यादेत (सक्षम प्राधीकरणाने वेळोवेळी दिलेल्या प्रमाणपत्रानुसार) असावे. अर्जदाराचा सेबील स्कोअर किमान 500 असावा. शासनाने वेळोवेळी ठरवून दिलेल्या अटी व शर्ती लागू राहतील.
अधिक माहितीसाठी इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, विचारे माळ, कोल्हापूर येथे (दूरध्वनी क्र. 0231-2653512) संपर्क साधावा.
00000
                                                                                   




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.