शुक्रवार, २२ नोव्हेंबर, २०१९

जागतिक एड्स दिनानिमित्त व त्या पंधरवड्यात होणाऱ्या विविध कार्यक्रमासाठी सर्वांनी सहभागी व्हावे --- जिल्हाधिकारी दौलत देसाई/ 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिन /पुराभिलेख खात्याकडून मोडीलिपी प्रशिक्षण वर्ग


जागतिक एड्स दिनानिमित्त व त्या पंधरवड्यात होणाऱ्या
विविध कार्यक्रमासाठी सर्वांनी सहभागी व्हावे
              --- जिल्हाधिकारी दौलत देसाई
कोल्हापूर - 22 (जिमाका) :  रविवार दि. 1 डिसेंबर रोजी जागतिक एड्स दिनानिमित्त व त्या पंधरवड्यात होणाऱ्या विविध उपक्रमांनी हा एड्स दिन साजर केला जाणार आहे. या निमित्त जिल्ह्यातील महाविद्यलये, स्वयंसेवी संस्था, कारखान्यांनी सक्रीय सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आजच्या अध्यक्षीय बैठकीत केले, अशी माहिती जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथकाच्या जिल्हा कार्यक्रम अधिकारी दीपा शिपूरकर यांनी दिली.
या जागतिक एड्स दिनानिमित्त प्रभात फेरी, पथनाट्य, पोस्टर्स, युवा संवाद, प्रतिबंध व तपासणी जनजागृती स्पर्धा, प्रदर्शनातून प्रतिबंध व तपासणी जनजागृती, सोशल मिडीया, जनजागृती कट्टा, ‘एचआयव्ही/एड्स बोलू काही’ आदी उपक्रम सीपीआर हॉस्पीटलच्यावतीने घेण्यात येणार आहे.  विविध ठिकाणी व्याख्याने, प्रश्नमंजूषा, गटचर्चा, औदयोगिक वसाहतीमध्ये स्पर्धा, प्रदर्शनही भरविण्यात येणार आहे. किर्लोस्कर इंजिन्स ऑईलच्या सामाजिक बांधिली उपक्रमातंर्गत संवेदना जागर-2020 या कार्यक्रमाची घोषणा केली जाणार आहे. एन.के.पी. प्लस संस्थेच्यावतीने एच.आय.व्ही. ग्रस्त व्यक्तींचे मेळावे व  राज्यस्तरीय युवक-युवती मेळाव्याचेही आयोजन करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाला निवासी वैद्यकिय अधिकारी हर्षला वेदक, किर्लोस्कर संस्थेचे सामाजिक बांधिलकी अधिकारी शरद आजगेकर, आयसीटीसीचे समुपदेशक कपिल मुळे, मकरंद चौधरी, विनायक देसाई, क्रांतिसिंह चव्हाण, तसेच  अेआरटीचे समुपदेशक संदीप पाटील, मनिषा माने, युवा ग्रामीण विकास मंचाचे मोहन सातपुते, गणेश बारटक्के, विविध संस्थांचे प्रतिनिधी अमित गायकवाड, अनिकेत खाडे, वैशाली बगाडे, उमेश बिरणगे, माहेश राऊळ, इस्माईल शेख आदी उपस्थित होते.
0000

26 नोव्हेंबर रोजी संविधान दिन
        कोल्हापूर - 22 (जिमाका) :  जिल्हयात 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिन साजरा करण्यात येणार आहे. यासाठी शहारातील विविध शाळांमधील 1000 विद्यार्थी विद्यार्थीनींचा सहभाग घेण्यात येणार असून, श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांचा पुतळा दसरा चौक येथून शालेय विद्यार्थीच्या संविधान रॅलीचा प्रारंभ महापौर सूरमंजिरी लाटकर यांच्या शुभहस्ते होणार आहे, अशी माहिती समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त बाळासाहेब कामत यांनी दिली.
संविधान रॅली दसरा चौक, अयोध्या टॉकीज (लक्ष्मीपुरी पोलीस स्टेशन चौक) मार्गे बिंदू चौक येथे रॅलीचा समारोप होणार आहे. त्यानंतर शालेय विद्यार्थ्यांसह महापौर सूरमंजिरी लाटकर, जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी, खासदार, आमदार, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, पोलीस अधिक्षक अभिनव देशमुख आदी मान्यवरांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करून या कार्यक्रमाची सुरूवात करण्यात येणार आहे. यावेळी सर्वांना संविधान उद्देशिकेचे वाटप करण्यात येणार असून, संविधान उद्देशिकेचे सामुहिक वाचनही करण्यात येणार आहे.
            जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांनी जिल्हा परिषद, पंचायत समित्या, सर्व ग्रामपंचायती,  प्राथमिक /माध्यमिक शाळा, अनुदानित शाळा यानीही संविधान दिन साजरा करण्यात यावा, असे आवाहन सामाजिक न्याय विभागामार्फत करण्यत आले आहे.
0000

पुराभिलेख खात्याकडून मोडीलिपी प्रशिक्षण वर्ग
कोल्हापूर - 22 (जिमाका) :  पुराभिलेख संचालनालय महाराष्ट्र शासन यांच्या विद्यमाने आयोजित मोडीलिपी प्रशिक्षण वर्गाचा उद्घाटन समारंभ कार्यक्रम सोमवार दि. 25 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजता श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे श्री शहाजी छत्रपती महाविद्यालय येथील यशवंतरात चव्हाण सभागृह, दसरा चौक येथे आयोजित करण्यात आला आहे. असे आवाहन गणेशकुमार खोडके अभिलेखाधिकारी पुरालेखागार विभाग यांनी केले.
000


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.