गुरुवार, १४ नोव्हेंबर, २०१९

बालदिनानिमित्त चाईल्डलाईनच्यावतीने शहरातून जनजागृती रॅली व पथनाट्यांचे कार्यक्रम



कोल्हापूर, दि. 14 (जि.मा.का): बालदिनानिमित्त चाईल्डलाईनच्यावतीने आज शहरातून जनजागृती रॅली काढण्यात आली.  तसेच शहरात विविध ठिकाणी मुलांच्या हक्काच्या जनजागृतीपर पथनाट्यांचे कार्यक्रम आयोजित करून प्रबोधन करण्यात आले.
चाईल्डलाईनच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या जनजागृती रॅलीची सुरूवात जिल्हा बालकल्याण समितीचे सदस्य श्री. व्ही.बी.शेटे यांच्या हस्ते करण्यात आली.  या रॅलीस रमणमळा येथून सुरूवात होवून जिल्हाधिकारी कार्यालय, व्हीनस कॉर्नर, लक्ष्मीपुरी, बिंदू चौक, भवानी मंडप, शिवाजी चौक, रेल्वे स्टेशन, रंकाळा अशी काढण्यात आली. या रॅलीमध्ये चाईल्डलाईन  आणि रेल्वे चाईल्डलाईनची टीम सहभागी झाली होती. जनजागृतीसाठी पोष्टरच्या व घोषणांच्या माध्यमातून फेरी काढण्यात आली. त्यादरम्यान पथनाट्याव्दारे मुलांच्या समस्यांवर प्रकाशझोत टाकण्यात आला. भवानी मंडप,शिवाजी चौक, बिंदू चौक व रेल्वेस्टेशन येथे या पथनाट्यांचे सादरीकरण करण्यात आले.
याप्रसंगी बोलतांना व्ही.बी.शेटे  म्हणाले, सध्या समाजात मुलांच्या समस्या खूप वाढत आहेत व त्या समस्या सोडविण्यासाठी चाईल्डलाईनची खूप मदत होते. सांगली मिशन सोसायटीचे अध्यक्ष फादर ज्योबी यांनी मुलांना शिक्षण व आरोग्य यावर भर देण्याचा सल्ला देवून चाईल्डलाईन टीमला मुलांच्या विकासाच्या कार्याला हातभार लावण्याच्या सूचना दिल्या. सांगली मिशन सोसायटीचे सामाजिक कार्य व विकासचे संचालक व चाईल्डलाईनचे संचालक फादर रोशन वर्गीस म्हणाले की, मुलांना मोबाईलपासून दूर ठेवून मुलांना वाचनाच्या मार्फत वर्तमानपत्रातील चित्रे पाहण्याच्या सवयी लावून मोबाईलच्या व्यसनापासून दूर  राहण्याचा सल्ला दिला.
 चाईल्डलाईच्या केंद्र समन्वयक अनुजा खुंदळकर यावेळी म्हणाल्या की, मुलांनी त्यांच्या हक्कासाठी लढले पाहीजे. मुले ही देशाची राष्ट्रीय संपत्ती आहे, ती सांभाळली पाहीजे. विभक्त कुटुंब पध्दतीमुळे, मोबाईल, प्रसारमाध्यमांच्या अतिरेक वापरामुळे मुलांवर होणारे परिणाम याबद्दल माहिती सांगितली. कधीही कोणत्याही प्रकारची मदत हवी असल्यास मुलांनी 1098 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
याप्रसंगी कोल्हापूर चाईल्डलाईन व रेल्वे चाईल्डलाईची सर्व टीम उपस्थित होती.
000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.