मंगळवार, ५ नोव्हेंबर, २०१९

हातकणंगले तालुक्यातील 1734 नुकसानग्रस्तांना 6 कोटी 68 लाख 8 हजार 590 खात्यावर जमा -डॉ. विकास खरात



       कोल्हापूर, (जि.मा.का.) दि. 5 : महापुरातील नुकसानग्रस्त यंत्रमाग कारखाने आणि अन्य छोट्या व्यावसायिकांना नुकसान भरपाई दिली जात आहे. हातकणंगले तालुक्यातील अशा  1734 नुकसानग्रस्तांना 6 कोटी 68 लाख 8 हजार 590 रुपये त्यांच्या बँक खात्यावर जमा केले आहेत. आजअखेर तालुक्यात 35 कोटी 47 लाख 70 हजार 355 रुपयांचे अनुदान दिले गेले आहे, अशी माहिती प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांनी आज दिली.
            ऑगस्ट महिन्यात झालेल्या महापुरामुळे शहर आणि परिसरात प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. त्यामध्ये अनेक घरांची पूर्णत: तर काही ठिकाणी पडझड झाली होती. ज्या भागात महापुराचे पाणी शिरले त्या भागातील यंत्रमाग व्यवसायासह दुकाने, गॅरेज, हस्तकला आदींसह लहान सहान व्यवसायांनाही नुकसान सोसावे लागले. सर्व नुकसानग्रस्त भागांचे सर्वेक्षण करण्यात आले. उद्योगांसाठी नुकसानीच्या 75 टक्के अथवा जास्तीत जास्त 50 हजार रुपये यापैकी जी जास्त रक्कम असेल ती अनुदान मदत स्वरुपात देण्यात आली आहे.
            प्रांताधिकारी डॉ. खरात म्हणाले, नुकसानग्रस्त लहानसहान 1734 उद्योग व्यवसायांसाठी 6 कोटी 68 लाख 8 हजार 590 रुपये अनुदान बँक खात्यावर जमा केले   आहे. महापूराचा फटका बसलेल्या 885 जनावरांच्या गोठ्यासाठी 26.55 लाखाचे अनुदान दिले आहे. यापूर्वी पूर्णत: पडझड झालेल्या 781 घरांसाठी 2 कोटी 26 हजार 92 हजार रुपये दिले गेले आहेत. महापुरामुळे मृत 134 गाई, म्हशी, शेळ्या, मेंढ्यांची नुकसान भरपाई म्हणून 30 लाख रुपये देण्यात आले आहेत. पूरग्रस्तांना तातडीची मदत म्हणून प्रारंभी 5 हजार रुपये सानुग्रह अनुदानापोटी 8 कोटी 81 लाख 30 हजार रुपये दिले गेले. तर नंतर बँक खात्यावर प्रत्येक कुटुंबाला 10 हजार रुपयाप्रमाणे 14 कोटी 49 लाख 85 हजार रुपये जमा करण्यात आले.
            निर्वाह भत्त्यापोटी 2 कोटी 91 लाख 99 हजार 765 रुपये दिले गेले. याचा लाभ इचलकरंजीतील 8918 आणि ग्रामीण भागातील 9968  अशा एकूण 18 हजार 886 कुटुंबांना झाला आहे. महापुरामुळे स्थलांतरित व्हावे लागल्याने घरभाड्यापोटी शहरी भागात प्रत्येक कुटुंबाला 36 हजार तर ग्रामीण भागातील कुटुंबाला 24 हजार रुपये देण्यात आले असल्याचेही डॉ. खरात यांनी सांगितले.
0000


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.