मंगळवार, १९ नोव्हेंबर, २०१९

ऐतिहासिक वारसा जपण्याचा कोल्हापूरकरांना ध्यास - श्रीमंत छत्रपती शाहू महाराज



कोल्हापूर, दि. 19 (जि.मा.का.)  : कलाप्रेमी कोल्हापूरकरांना ऐतिहासिक वारसा जपण्याचा ध्यासच असल्याने ते हेरिटेज सप्ताहातही आघाडीवर राहतील, असा विश्वास श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी आज येथे व्यक्त केला.
जिल्हा प्रशासन हेरिटेज समितीतर्फे आयोजीत हेरिटेज वीकच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई व आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी प्रमुख उपस्थित होते.
शाहू महाराज म्हणाले, प्रशासनाच्या जोडीला विविध संस्था आणि संघटनांचे कार्यकर्ते अशा वास्तुंच्या जतन आणि संवर्धनासाठी नेहमीच प्रयत्न करतात. कोल्हापूरच्या वैभवात भर घालणारा हा समृध्द वारसा जपण्यासाठी करवीरकर पुढाकार नक्‍कीच घेतील.
19 ते 25 नोव्हेंबर हा आठवडा हेरिटेज वीक म्हणून साजरा करण्यात येत आहे या आठवड्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. छायाचित्र स्पर्धा, हेरिटेज वॉक, हेरिटेज हंट, तसेच पाककृती स्पर्धा आणि पोस्टर स्पर्धा अशा विविध कार्यक्रमांनी आठवडा साजरा केला जाणार आहे.
राजर्षी शाहू महाराज यांच्या जन्मस्थळी लक्ष्मी विलास पॅलेसच्या हिरवळीवर झालेल्या कार्यक्रमाचा प्रारंभ शाहीर आझाद नायकवडी यांनी रचलेल्या लक्ष्मी विलास पॅलेसच्या पोवाड्याने झाला. हेरिटेज समितीच्या अध्यक्ष अमरजा निंबाळकर यांनी हेरिटज वीक साजरा करण्यामागची भूमिका स्पष्ट केली. तसेच शहर आणि परिसारातील पुरातन वास्तुंमुळे कोल्हापूरचे जगाच्या नकाशावर महत्व वाढत असल्याने त्यांचे जतन करणे आपले कर्तव्य असल्याचे सांगितले. यानंतर जन्मस्थळ परिसरात  झालेल्या हेरिटेज वॉकला  युवक युवतींनी मोठा प्रतिसाद दिला.
या कार्यक्रमासाठी क्रिडाईचे अध्यक्ष विद्यानंद बेडेकर, आयआयडी चे संदीप घोरपडे. चंदन मिरजकर, हॉटेल मालक संघाचे उज्ज्वल नागेशकर, आनंद माने, प्रेस क्लबचे अध्यक्ष मोहन मेस्त्री, विजय केसरकर तसेच रोटरीचे सूर्यकांत पाटील गिरीष जोशी, शाहीर डॉ राजू राऊत उपस्थित होते.
00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.