शनिवार, २ नोव्हेंबर, २०१९

लाचेची माया कुटुंबावर दुर्दशेची छाया... दक्षता जनजागृती सप्ताहनिमित्त शहरातून रॅली




कोल्हापूर, (जि.मा.का.) दि. 2 : भ्रष्टाचार निर्मूलनाचा विचार करे लोकशाही साकार, लाचेची माया टाकते कुटुंबावर दुर्दशेची छाया, Prevent Corruption Protect Nation अशा घोषवाक्यांचे फलक घेऊन दक्षता जनजागृती सप्ताहनिमित्त आज भवानी मंडप ते जैन बोर्डिंग या मार्गावर रॅली काढण्यात आली.
       महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी भवानी मंडप येथे हिरवा झेंडा दाखवून या दक्षता जनजागृती रॅलीचा प्रारंभ केला. ही रॅली बिंदू चौक, छत्रपती शिवाजी पुतळा, महानगरपालिका, सीपीआर हॉस्पिटल मार्गे जैन बोर्डिंग येथे या रॅलीचा समारोप करण्यात आला.
          लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उप अधिक्षक आदिनाथ बुधवंत यावेळी म्हणाले, लाच देणार नाही आणि लाच घेणारही नाही, अशी प्रतिज्ञा आज आपण करूया. भविष्यामध्ये आपल्यातील बहुतांशी अधिकारी होतील. विद्यार्थी दशेमध्ये केलेला निर्धार कर्तव्य बजावतानाही आपण सर्वांनी कायम ठेवला पाहिजे. लाच घेणे हा जसा गुन्हा आहे तसाच लाच देणे हाही गुन्हा आहे. अशा प्रवृत्तीला आपण सर्वांनी मिळून रोखल पाहिजे, असे सांगून त्यांनी सर्वांचे आभारही मानले. प्रिया बुराण या विद्यार्थीनीने आपले विचार यावेळी व्यक्त केले. एखाद्या गोष्टिचे आमिष दाखवून लहान मुलांना काम सांगण्यात येते, ही  लाचेची प्राथमिक अवस्था आपल्या कुटुंबातूनच सुरूवात होते. यावर विचार करावा लागेल, असे ती म्हणाली.
           आजच्या या रॅलीमध्ये उषाराजे हायस्कूल कोल्हापूर, महावीर महाविद्यालय, रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सेंट्रल पुरस्कृत इंटरॅक्ट क्लब हणमंतवाडी हायस्कूल, हणमंतवाडी हायस्कूल हणमंतवाडी, छत्रपती शाहू विद्यालय, आयटीआय आदींचे विद्यार्थी-विद्यार्थीनी, राष्ट्रीय छात्र सेनेचे छात्र, आरएसपीचे विद्यार्थी, त्यांचे शिक्षक- शिक्षिका यांच्यासह परिवहन विभागाचे अधिकारी, उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी, गृहरक्षकदलाचे अधिकारी, अग्निशमन दलाचे अधिकारी, पोलीस निरीक्षक वसंत बाबर, अनिल गुजर, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक जितेंद्र पाटील आणि कर्मचारी उपस्थित होते.
00000


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.