कोल्हापूर, (जि.मा.का.) दि.
6: राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारांचा वारसा कायम ठेवू. सर्वोच्च
न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करू. जिल्ह्यामध्ये बंधूभाव राखून शांतता
प्रस्थापित करून कोल्हापूरचा आदर्श देशात निर्माण करू, असा सामाजिकतेचा संदेश आज
झालेल्या जिल्हास्तरीय शांतता समितीच्या बैठकीत उपस्थित सर्वांनीच दिला.
ईद-ए-मिलाद
सणाच्या निमित्ताने आणि रामजन्मभूमी बाबरी मस्जिद जागेसंदर्भात सर्वोच्च
न्यायालयाकडून होणाऱ्या निकालाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक शांतता व सुव्यवस्थेबाबत
श्री शाहू स्मारक येथे शांतता समितीची बैठक श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या
अध्यक्षतेखाली आज झाली.
या बैठकीला पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश
जाधव, खासदार धैर्यशील माने, आमदार चंद्रकांत जाधव, जिल्हाधिकारी दौलत देसाई,
महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर
पोलीस अधीक्षक तिरूपती काकडे, श्रीनिवास घाडगे, प्रांताधिकारी वैभव नावडकर, तहसिलदार शीतल मुळे-भामरे आदी उपस्थित होते.
डॉ. देशमुख यावेळी म्हणाले, जमिनीच्या मालकी हक्काविषयी
दिवाणी न्यायालयाचा निकाल असणार आहे. तो निकाल सर्वांनी स्वीकारला पाहिजे.
त्याच्यावर कोणतीही टिकाटिपण्णी होणार नाही याची दक्षता आपण सर्वांनी घ्यायला हवी.
राजर्षी शाहू महाराजांचा न्यायाचा संदेश जगाला दिला आहे. याच विचारांचा वारसा आपण
ठेवू.
मौलानी इरफान यांनीही
यावेळी सर्व जाती धर्माचे लोक जिल्ह्यामध्ये प्रेम आणि शांततेन रहात आहेत.
कोणाचाही व्देष करण्याची शिकवण कोणताच धर्म देत नाही. देशाच्या एकसंघतेला कोठेही
बाधा येणार नाही याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. ती आपण पूर्ण करू, असे
सांगितले.
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची सर्वांनी शांततेत स्वागत
करून कोठेही जल्लोष होणार नाही, कोणताही अनुचित प्रकार होणार नाही, याची आपण काळजी
घेवू. सर्वानी सामाजिक ऐक्याचा संदेश
जगाला देवू, असे विचार माजी महापौर आर. के. पवार यांनी व्यक्त केले.
सर्वोच्च
न्यायालय जो निकाल देईल त्याचे राजर्षी
शाहूंच्या पुतळ्यासमोर एकत्र येवून स्वागत करू, असे मत गणी आजरेकर यांनी यावेळी
मांडले. राजर्षी शाहूंच्या विचाराचा वारसा असणाऱ्या जिल्ह्याला गालबोट लागणार नाही
याची काळजी आपण सर्वांनी घेवू, असे विचार निवास साळोखे यांनी व्यक्त केले. डॉ.
बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर आधारित सर्वोच्च न्यायालयाचा निकाल असणार आहे.
तो आपण सर्वांनी मोठ्या मनाने मान्य करावा आणि संविधानाचा सन्मान करावा, असे विचार
उत्तम कांबळे यांनी व्यक्त केले.
इचलकरंजीचे
सलीम अत्तार हे यावेळी म्हणाले, महापुराने जिल्ह्याची दयनीय अवस्था केली. उरलसुरल
अवकाळी पावसाने नेलं. त्यामुळे दोन वेळच्या भाकरीचा संघर्ष पुढे आला आहे.
त्याच्यावर आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे. याचा विचार सर्वांनी करावा. शिवजी
व्यास यांनीही निर्णयाचे स्वागत करून शांतता आणि सलोखा ठेवण्याची सर्वांची
जबाबदारी असल्याचे मत व्यक्त केले. मानवता हा धर्म आणि माणुसकी हीच जात असा संदेश
राजर्षी शाहू महाराजांनी दिला आहे. रोजी रोटीच्या प्रश्नाची सध्या काळजी आहे.
त्यामुळे जिल्ह्यात अनुचित प्रकार होणार नाही, अशी अपेक्षा व्यक्त् केली.
आमदार
श्री. जाधव यावेळी म्हणाले, जागरूक राहून आपल्या चरीतार्थाकडे लक्ष देण्याची खरी
गरज आहे. जातीधर्माचा विचार सोडून पुढील पिढीच्या प्रगतीचा सर्वांनी विचार करावा.
व्हॉटस् ॲप बंद करावे, जेणेकरून कोणताही अनुचित प्रकार होणार नाही. पश्चिम
देवस्थान समितीचे अध्यक्ष श्री. जाधव म्हणाले, न्यायालयात 50 वर्ष प्रलंबित
असणाऱ्या जमिनीचा निकाल होणार आहे. सोशल मीडिया हे सध्या वादाचं कारण बनत आहे.
राजर्षी शाहू महाराजांनी सर्व धर्मांना न्याय दिला तो वारसा आपण जपूया.
खासदार
श्री. माने यावेळी म्हणाले, मस्जिदीमध्ये गणपती बसवणे आणि हिंदू गल्लीमध्ये पीर
बसविणे हे आपल्या सामाजिक एकतेचे दर्शन आहे. अशा सर्व धर्म समभाव समाजामध्ये काही
विघ्नसंतोषी लोक गालबोट लावण्याचा प्रयत्न करत असतात. ही प्रवृत्ती आपण वेळीच
ओळखून रोखली पाहीजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या घटनेचा आदर आपण केला
पाहीजे. राजर्षी शाहूंच्या जिल्ह्यातील बंधूभाव पुढच्या पिढीमध्ये घातला पाहीजे.
कोल्हापूरकरांच अभिनंदन संसदेनं करावं, अस आचरण आपण सर्वांनी करूया.
जिल्हाधिकारी
श्री. देसाई यावेळी म्हणाले, पदभार घेतल्यापासून लोकसभेची निवडणूक झाली.
जिल्ह्यामध्ये महापूर येवून गेला त्यानंतर पुन्हा विधानसभेची निवडणूक झाली. या
सर्व घटना शांततेत झाल्या. याचं सर्व श्रेय कोल्हापूरकरांना आहे. प्रशासन हे केवळ
निमित्त मात्र आहे. ही ताकद तुमची सर्वांची आहे. समाजामध्ये जे 1 टक्का लोक गडबड
करू इच्छित असतात त्यांच्यावर वचक आणि नैतिक बंधन ठेवण्याची ताकदही तुमच्यामध्ये
आहे. समाजात कुठलही तेढ निर्माण होणार नाही, गुण्या -गोविंदाने आपण सर्वजण राहू
यात शंका नाही.
अध्यक्षीय
भाषणात श्रीमंत छत्रपती शाहू महाराज म्हणाले, पुरोगामी विचारांचा जिल्हा राहिला आहे. डॉ. आंबेडकरांनी जी घटना लिहीली
त्या घटनेचं संवर्धन आपल्याला निकालाचे स्वागत करून करायचे आहे. छत्रपती शिवाजी
महाराज, छत्रपती राजर्षी शाहू महाराज
यांच्या विचारांचा हा जिल्हा आहे. मानवतेच्या विचाराला आणि महात्मा गांधीजींच्या
अहिंसेच्या विचाराला महत्व देणारा जिल्हा आहे. त्यामुळे जिल्ह्याची वाटचाल ही
नेहमीच पुरोगामी आणि आदर्शवादी राहीली आहे. अप्पर पोलीस अधीक्षक श्री. काकडे यांनी
शेवटी आभार प्रदर्शन केले. राष्ट्रगीताने बैठकीची सांगता झाली. या बैठकीला जिल्ह्यातील
विविध पक्षाचे, संघटनेचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या
संख्येने उपस्थित होते.
0000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.