कोल्हापूर, दि. 20 (जिमाका) : फसवणूक झालेल्या ग्राहकांनी पुढे येवून
तक्रारी द्याव्यात. फसवणूक होवू नये म्हणून ग्राहकांच्या हिताचे संरक्षण
करण्यासाठी 1986 साली कायदा झाला. याची जनजागृती ग्राहकांनी स्वत:च केली पाहीजे, असे आवाहन
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचच्या अध्यक्ष सविता भोसले यांनी केले.
जागो ग्राहक जागो या मोहिमेतंर्गत
शासकीय सदस्य आणि अधिकारी यांचे प्रशिक्षण येथील शाहू स्मारक भवन येथे आज झाले. या
प्रशिक्षणाच्या उद्घाटन प्रसंगी श्रीमती भोसले बोलत होत्या. यावेळी जिल्हा पुरवठा
अधिकारी दत्तात्रय कवितके, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी सरस्वती पाटील, राज्य
ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य अरूण यादव आदी उपस्थित होते.
श्रीमती
भोसले पुढे म्हणाल्या, 1986 साली करण्यात आलेल्या कायद्यामध्ये 2019 मध्ये
सुधारणा सुचवण्यात आल्या आहेत. या सुधारणेनुसार जिल्हा आयोग असा शब्द प्रयोग
करण्यात येणार असून 1 कोटी पर्यंतच्या तक्रारींची मर्यादा आता वाढवण्यात आली आहे. हा बदल नविन
वर्षात लागू होण्याची अपेक्षा आहे. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे ऑनलाईन
खरेदीच्या तक्रारी दाखल करू शकतो. ग्राहकाला जास्तीत-जास्त कसा न्याय मिळेल हे
पाहीले जाईल. आज प्रत्येकजण आपल्या व्यापात असतो. त्यामुळे आपल्या ग्राहक हिताचे संरक्षण होते का याकडे पाहिले जात नाही.
येथेच ग्राहकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होते.
कर्ज
प्रकरणातील अटी-शर्ती, विमा कंपन्यांबाबतही आपण जागरूक असायला हवे. शेतकरी हाही
ग्राहकच असतो. बी-बियाणे, पाईपलाईन जोडणी प्रकरणात त्याचीही फसवणूक होवू शकते.फसवणूक
झालेल्या ग्राहकांनी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचकडे धाव घ्यावी. ग्राहकांनीच मोठ्या प्रमाणात याविषयी जनजागृती
करावी, असेही त्या शेवटी म्हणाल्या.
जिल्हा
तांत्रिक समन्वयक करण गायकवाड यांनी अन्न सुरक्षा कायदा ई-पॉस मशिन याबाबत अन्न
प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त मोहन केंबळकर, औषध प्रशासनाच्या सहाय्यक आयुक्त मनिषा
पाटील, जिल्हा सार्वजनिक आरोग्य शाळेचे अन्न विश्लेषक डॉ. रवींद्र शिंदे यांनी
भेसळीबाबत किंवा वस्तूचा दर्जा ठरविण्यासाठी उपलब्ध असलेल्या प्रयोगशाळांची माहिती
व कार्य यावर मार्गदर्शन केले. तर उपविभागीय कृषी अधिकारी मकरंद कुलकर्णी यांनी कृषी
क्षेत्रातील शासनाच्या योजना याविषयी मार्गदर्शन केले. जिल्हा पुरवठा अधिकारी
श्री. कवितके यांनी सर्वांचे स्वागत करून प्रास्ताविक केले. अन्न वितरण अधिकारी
माधवी शिंदे यांनी सूत्रसंचलन करून सर्वांचे आभार मानले.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.