शनिवार, २ नोव्हेंबर, २०१९

शिक्षण संक्रमण मासिकासाठी स्वतंत्र संकेतस्थळ आणि अँड्रॉईड ॲप



कोल्हापूर, (जि.मा.का.) दि. 2 : शिक्षण संक्रमण मासिकासाठी स्वतंत्र संकेतस्थळ व अँड्रॉईड ॲप सुरू करण्यात आले असल्याची माहिती कोल्हापूर विभागीय मंडळाच्या विभागीय सचिवांनी पत्रकाव्दारे दिली आहे.
कोल्हापूर विभागीय मंडळाच्या कार्यक्षेत्रातील सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व मुख्याध्यापक, माध्यमिक शाळा, सर्व प्राचार्य, कनिष्ठ महाविद्यालये, सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयीन विद्यार्थी, पालक वर्गणीदार यांना या परिपत्रकाव्दारे कळविण्यात येते की, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत दरमहा शिक्षण संक्रमण अंक प्रकाशित करण्यात येते. या मासिकातून पुनर्रचित अभ्यासक्रम, अध्यापन पध्दती, मूल्यमापन पध्दती, विषयनिहाय पाठ्यपुस्तकातील आशय, नावीन्यपूर्ण शालेय उपक्रम, शैक्षणिक घडामोडी याबाबतच्या माहितीसोबतच अभ्यासू शिक्षक, पालक, विद्यार्थी इत्यादींशी संबंधित उत्तम वैचारिक साहित्यही प्रसिध्द केले जाते. या शिक्षण संक्रमण अंकाची वार्षिक वर्गणी 200 रूपये आहे. या अंकासाठी यापूर्वी वर्गणी भरण्यासाठी पोस्टात जाऊन मनी ऑर्डर, डी.डी. काढून पाठविणे किंवा मंडळ कार्यालयात रोखीने वर्गणी भरावी लागत असे परंतु आता या अंकांची वर्गणी ही ऑनलाईन भरता येईल. शिक्षण संक्रमण अंक जास्तीत-जास्त लोकांपर्यत पोहचविण्यासाठी तसेच लेखकांना मासिकासाठी साहित्य, लेख पाठविणे सोयीचे व्हावे याकरीता शिक्षण संक्रमण मासिकासाठी स्वतंत्र संकेतस्थळ व अँड्रॉईड ॲप सुरू करण्यात आले आहे. या शिक्षण संक्रमण अंकासाठी http:// shikshansankraman.msbshse.ac.in या संकेतस्थळावर ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
  गुगल प्ले स्टोअरवर शिक्षणसंक्रमण असे टाईप करून अँड्राईड ॲप डाऊनलोड करता येते. htpp://playgoogle.com/store/apps/details?id=com.stateboard.shikshansankraman वर सर्च करूनही ॲप डाऊनलोड करता येते. शिक्षणसंक्रमण वर्गणीदार यांना मंडळाचे बचत खाते क्रमांक 50100205419942 मध्ये एटीएम, क्रेडीट कार्ड, एनईएफटी, आरटीजीएस इत्यादीव्दारे शिक्षणसंक्रमण मासिक शुल्क 200 रूपये भरता येणार आहे. तरी या आधुनिक सुविधेचा सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक, विद्यार्थी, पालक वर्गणीदार यांनी लाभ घ्यावा.
00000




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.