शुक्रवार, १ नोव्हेंबर, २०१९

मुलींना जन्म देणाऱ्या पालकांना मिळणार अग्रक्रमाचे स्थान जिल्ह्यात ताराराणी अग्रक्रम पास नाविन्यपूर्ण योजना




कोल्हापूर, (जि.मा.का.) दि. 1 :  जिल्ह्यात मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी ताराराणी अग्रक्रम पास ही नाविन्यपूर्ण योजना राबविण्याचा निर्णय आज झालेल्या बेटी बचाओ बेटी पढाओ जिल्हा कृतीदल समितीच्या बैठकीत घेण्यात आला. मुलींना जन्म देणाऱ्या पालकांना अग्रक्रमाचे स्थान देण्यासाठी ही योजना जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. या पासधारकांना शासकीय कार्यालयातील कामकाजासाठी आता रांग असणार नाही.    
            जिल्हाधिकारी कार्यालयातील राजर्षी शाहू सभागृहात बेटी बचाओ बेटी पढाओ जिल्हा कृती दल समितीची आढावा बैठक आज घेण्यात आली. याबैठकीला महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा परिषदेचे महिला व बाल विकास अधिकारी सोमनाथ रसाळ, डॉ. विलास देशमुख, बाल विकास प्रकल्प अधिकारी वैभव कांबळे, मनिषा पालेकर, अतिरिक्त आरोग्य अधिकारी डॉ. उषादेवी कुंभार, वकील गौरी पाटील आदी उपस्थित होते.
               श्री. रसाळ यांनी सुरुवातीला स्वागत केले. यावेळी मुलींचा जन्मदर वाढविण्याबाबत चर्चा करुन सूचना करण्यात आली.  त्यामध्ये ग्रामपंचायतीने आपल्या प्रत्येक ग्रामसभेत त्याबाबत चर्चा करावी.  गुड्डा, गुड्डी फलक जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती, अंगणवाडी केंद्र यांना वितरीत केल्या आहेत. या फलकांवर गावातील मुला मुलींच्या जन्मदराची आकडेवारी नमूद करुन ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत त्यावर चर्चा करावी. समाज माध्य, इलेक्ट्रॉनिक माध्यम, नभोवाणी, दूरचित्रवाणी यामधून जनजागृती करावी.  शाळा, महाविद्यालयांमधून वक्तृत्व, निंबध, चित्रकला, रांगोळी, घोषवाक्य आदी स्पर्धांचे आयोजन करावे. फिरत्या वाहनामधून अभियानाची माहिती देणे. बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेचा ठसा शासकीय कार्यालयातील मेल, पत्र व्यवहार यावर ठेवावा. यांचा समावेश आहे.
ताराराणी अग्रक्रम पास नाविन्यपूर्ण योजना
            मागील पाच वर्षातील एका मुलीवर तसेच दोन मुलींवर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केलेल्या दांपत्याला ताराराणी अग्रक्रम पास या नाविन्यपूर्ण योजनेचा पास देण्यात येणार आहे.  ही योजना तात्काळ राबविण्याबाबत जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी निर्देश दिले. या पास धारकांना जिल्ह्यातील सर्वच ठिकाणी अग्रक्रम देण्यात येईल. कोणत्याही रांगेमध्ये त्यांना उभे राहण्याची आवश्यकता असणार नाही.  या पाससाठी संबंधित दांपत्यांनी महिला व बाल विकास विभागाशी संपर्क साधून माहिती द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. 
            या पासवर संबंधित दांपत्यांचे छायाचित्र असणार आहे. त्यावर जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची स्वाक्षरी असेल. शासकीय कार्यालयातील कोणत्याही योजनेसाठी पास धारकाला प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यासाठी पास धारकाला रांगेत उभे राहण्याची आवश्यकता असणार नाही.‍          
 0 0 0 0 0 0 0

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.