शुक्रवार, १५ नोव्हेंबर, २०१९

पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ 23 नोव्हेंबरपासून मतदार नोंदणी -जि‍ल्हाधिकारी दौलत देसाई



कोल्हापूर, दि. 15 (जि.मा.का.) : पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघ निवडणूक कार्यक्रमातंर्गत 23 नोव्हेंबर रोजी प्रारुप मतदार यादी प्रसिध्द होणार असून त्यानंतर 23 नोव्हेंबर ते 9 डिसेंबर 2019 या कालावधीत पदवीधर व शिक्षक नोंदणीसाठी पात्र मतदारांना नोंदणी करता येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा पदवीधर व शिक्षक मतदार संघाचे सहाय्यक मतदान नोंदणी अधिकारी दौलत देसाई यांनी दिली.
निवडणूक आयोगाने 1 नोव्हेंबर 2019 या अर्हता दिनांकावर आधारीत पुणे  पदवीधर व शिक्षक मतदार संघ निवडणूकीच्या अनुषंगाने मतदार नोंदणीचा कार्यक्रम घोषित केला आहे. पदवीधर व शिक्षकांकरीता अनुक्रमे 18 व 19 नमुन्याचा अर्ज सादर करावयाचा आहे. प्रारुप मतदार यादी प्रसिध्द झाल्यानंतर म्हणजे दि. 23 नोव्हेंबर ते 9 डिसेंबर 2019 या कालावधीत पदवीधर व शिक्षक मतदारांना नोंदणी करता येईल.
पदवीधरकरीता जी व्यक्ती भारताची नागरिक आहे, त्या मतदारसंघातील सर्वसाधारण रहिवाशी आहे आणि ती व्यक्ती दि. 1 नोव्हेंबर 2016 पूर्वी भारतातील विद्यापीठाची पदवीधर असेल किंवा त्याच्याशी समकक्ष असलेली अर्हता धारण करीत असेल अशी प्रत्येक व्यक्ती मतदार यादीमध्ये नाव नोंदणीसाठी पात्र आहे.
शिक्षकांकरीता जी व्यक्ती भारताची नागरिक आहे, त्या मतदारसंघातील सर्वसाधारण रहिवाशी आहे आणि ती दि. 1 नोव्हेंबर 2019 च्या लगत पूर्वीच्या सहा वर्षामध्ये किमान तीन वर्ष इतक्या कालावधीकरीता माध्यमिक शाळेच्या दर्जापेक्षा कमी दर्जाची अशी विनिर्दिष्ट केलेली नसेल अशा राज्यातील कोणत्याही शिक्षक संस्थेमध्ये अध्यापन करीत असेल अशी प्रत्येक व्यक्ती मतदार यादीमध्ये नाव नोंदणीसाठी पात्र आहेत.
पदवीधर व शिक्षक मतदारसंघाची मतदार यादी प्रत्येक निवडणुकीपूर्वी नव्याने तयार करणे आवश्यक असल्यामुळे सर्व मतदारांनी नव्याने अर्ज सादर करावेत. अर्ज सादर करताना पदवीधर नोंदणीकरीता पासपोर्ट आकारातील रंगीत छायाचित्र, मुळ पदवीची किंवा समकक्ष अर्हताची छायांकित प्रत व रहिवास पुराव्याची छायांकित प्रत जी राजपत्रित अधिकारी/ पोस्टमास्तर/कार्यरत पब्लिक नोटरी अधिकारी/शासकीय महाविद्यालयातील प्राचार्य/ शासन अनुदान प्राप्त महाविद्यालयातील प्राचार्यांनी  साक्षांकित केलेली असावी. 
शिक्षकाकरीता पासपोर्ट आकारातील रंगीत छायाचित्र, रहिवास पुराव्याची छायांकीत साक्षांकित प्रत जी राजपत्रित अधिकारी/ पोस्टमास्तर/कार्यरत पब्लिक नोटरी अधिकारी/ शासकीय महाविदयालयातील प्राचार्य/ शासन अनुदान प्राप्त महाविदयालयातील प्राचार्य यांनी साक्षांकित केलेली असावी व संस्था प्रमुखाने किंवा संबंधित शाळेतील मुख्याध्यापकाने संबंधित शिक्षक तीन वर्ष अध्यापन करीत असल्याबाबत प्रमाणीत केलेली असावी.
पात्र पदवीधर व शिक्षक मतदारांनी अनुक्रमे नमुना क्रमांक 18 व 19 (कागदपत्रासह) भरुन आपल्या तालुक्यातील पदनिर्देशित अधिकारी (संबंधित तहसिल कार्यालयातील निवडणूक शाखा तसेच कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रासाठी एल. बी. टी. शाखा, शिवाजी मार्केट, कोल्हापूर यांच्याकडे सादर करावेत, असे आवाहनही जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी केले आहे.
00000



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.