कोल्हापूर, दि. 15
(जि.मा.का.) : येत्या 19 जानेवारी 2020 रोजी जिल्ह्यात पल्स पोलिओ लसीकरण मोहिम राबविण्यात येत असून 0 ते 5 वयोगटातील 3 लाख 30
हजार 685 बालकांना 2 हजार 201 पोलिओ लसीकरण केंद्राच्या माध्यमातून पोलिओची लस
पाजण्याचे नियोजन करण्यात आल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल
यांनी आज येथे दिली.
आरोग्य
विभागाच्या जिल्हा समन्वय समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या शाहुजी
सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी अमन
मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली
त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे,
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी.सी. केंम्पी पाटील,
निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षला वेदक, जिल्हा आरसीएच अधिकारी डॉ. एफ.ए.
देसाई यांच्यासह सर्व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
यंदाच्या
पोलिओ लसीकरणातून 5 वर्षाखालील एकही बालक पोलिओ लसविना वंचित राहणार नाही. याची
दक्षता घेण्याची सूचना करुन मुख्य
कार्यकारी अधिकारी अमन मित्तल म्हणाले, येत्या 19 जानेवारी रोजीच्या पल्स
पोलिओ लसीकरण मोहिमेसाठी ग्रामीण भागातील 2 लाख 28 हजार 355, नगरपालिका
क्षेत्रातील 53 हजार 641 तर महापालिका क्षेत्रातील 48 हजार 689 अशा 3 लाख 30 हजार 685
लाभार्थी बालकांची नोंद आहे. या लसीकरणातून जिल्ह्यातील जनतेने आपल्या 5 वर्षाखालील बालकास पोलिओची लस पाजून घ्यावी, असे आवाहनही श्री. मित्तल यांनी केले.
राष्ट्रीय
पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेतून येत्या 19 जानेवारी रोजी राबविण्यात येणाऱ्या
लसीकरणासाठी 2201 इतक्या पोलिओ लसीकरण केंद्राची स्थापना करण्यात आली असून 686
मोबाईल टिम तर 303 ट्रान्झीट टिम तयार करण्यात आल्याचे सांगून मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल म्हणाले,
गेल्या वर्षी जिल्ह्यात राबविलेल्या लसीकरण मोहिमेत 3 लाख 29 हजार 310 इतक्या
बालकांना लस देण्यात आली असून, यावर्षी 19
जानेवारी रोजी होणाऱ्या पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेत सर्वांनी सक्रीय योगदान देवून
ही मोहिम यशस्वी करावी, असे आवाहन त्यांनी केले.
पोलिओ
लसीकरणातून ऊसतोड, वीटभट्या तसेच विविध ठिकाणी काम करणाऱ्या मजुरांच्या मुलांसाठी
फिरती लसीकरण केंद्रे कार्यान्वित करण्यात येणार असल्याचे सांगून मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल म्हणाले, जिल्ह्यातील ऊसतोडी, वीटभट्ट्या, रस्त्यांवर
काम करणारे मजूर, बांधकाम मजूर, साखर कारखाने गाडीतळ तसेच प्रवासात असणाऱ्या
बालकांसाठी 686 मोबाईल टीम, 303 ट्रान्झीट टीम तयार करण्यात आल्या आहेत. या टीम्स
एस. टी. स्टँड, रेल्वे स्टेशन, महामार्ग, जिल्हा प्रवेशाच्या ठिकाणी, साखर
कारखाने, जिल्ह्यातील विविध धार्मिक स्थळे येथेही 19 जानेवारी रोजी कार्यरत
राहतील. जिल्ह्यात निश्चित केलेल्या 2201 लसीकरण केंद्रांमध्ये ग्रामीण भागासाठी
2037, नगरपालिका शहरी विभागात 164 आणि महापालिका क्षेत्रात 1247 लसीकरण केंद्रांचा समावेश असल्याचेही मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी
सांगितले.
पल्स
पोलिओ लसीकरण मोहिमेसाठी आवश्यक आरोग्य कर्मचारी, अधिकारी नियुक्त करण्याची सूचना
करुन मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल
म्हणाले, आरोग्य विभागाने लसीकरणाचा कृती कार्यक्रम तयार करुन त्यानुसार पोलिओ
लसीकरण मोहिम राबवावी. यामध्ये प्रामुख्याने घरोघरी प्रत्येक लाभार्थ्याच्या
नावाची तारीख, वार, वेळ व लसीकरण केंद्र यांची माहिती असलेली स्लीप लसीकरणाच्या
अगोदर देण्याचे नियोजन करावे, असेही त्यांनी सांगितले. पोलिओ लसीकरणाच्या प्रभावी
जनजागृतीसाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्या बरोबरच सर्व शासकीय, निमशासकीय
यंत्रणांना लसीकरणाच्या राष्ट्रीय कार्यासाठी परस्पर समन्वयाने काम करण्याची सूचनाही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केली.
पोलिओ
लसीकरण मोहिम राज्यात 1995 पासून राबविली जात असून, कोल्हापूर जिल्ह्यात शेवटचा
रुग्ण 23 ऑगस्ट 1999 मध्ये शाहूवाडी तालुक्यातील करंजोशी या गावी आढळला होता.
त्यानंतर जिल्ह्यात पोलिओचा एकही रुग्ण आढळला नाही. जिल्ह्यात पोलिओ निर्मुलनासाठी
आरोग्य विभागाने त्रिसुत्री कार्यक्रम राबविला असून, यामध्ये सर्व बालकांचे विहित
वयात नियमित लसीकरण, नियमित एएफपी सर्वेक्षण आणि पल्स पोलिओ मोहिमेद्वारे 0 ते 5
वयोगटातील सर्व बालकांचे लसीकरण या बाबी महत्वाच्या असल्याचेही मुख्य
कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी सांगितले.
पल्स पोलीओ लसीकरणाची मोहिम यशस्वी
करण्यासाठी आरोग्य विभाग सज्ज असून येत्या 19 जानेवारी 2020 रोजी प्राथमिक आरोग्य
केंद्रस्तरावर वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण आयोजित केले आहे. या
मोहिमेसाठी 4 लाख 26 हजार पोलिओ डोस प्राप्त झाले असून लाभार्थीच्या प्रमाणात
लसीचे वाटप प्राथमिक आरोग्य केंद्रात तसेच शहरी विभागासाठी सीपीआर रूग्णालयात
करण्याची व्यवस्था केली आहे. यावेळी पोलिओ लसीकरण मोहिमेच्या अनुषंगाने जनजागृती
आणि लसीकरणाचे नियोजन अशा सर्व बाबींवर सविस्तरपणे चर्चा करण्यात आली.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.