कोल्हापूर, दि. 10 (जिमाका) : जिल्ह्यातील
चंदगड, आजरा, गडहिंग्लज, कागल, करवीर, पन्हाळा, शाहूवाडी, गगनबावडा, भुदरगड व
राधानगरी या तालुक्यांमध्ये कार्यरत असणाऱ्या सर्व दुकाने, व्यापारी संस्था,
उपहारगृहे, निवासी हॉटेल्स, करमणुकीची ठिकाणे येथील ज्या दुकानांमध्ये 0 ते 9
कामगार कार्यरत आहे, अशा आस्थापनांनी दुकाने व आस्थापना अधिनियमानुसार ऑनलाईन अर्ज
करून सूचना पत्र पोचपावती किंवा नोंदणी प्रमाणपत्र ऑनलाईन घ्यावे, असे आवाहन
सहाय्यक कामगार आयुक्त अनिल गुरव यांनी केले आहे.
ज्या दुकानामध्ये 10 व त्यापेक्षा जास्त कामगार
कार्यरत आहेत अशा दुकान/ आस्थापना धारकांनी ऑनलाईनव्दारे आपल्या आस्थापनेची नोंदणी
करणे आवश्यक आहे. तसेच महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे
विनियोजन ) नियम 2018 च्या नियम 35 अन्वये आपल्या आस्थापनेचा नामफलक हा मराठी
देवनागरी लिपीत विहीत पध्दतीने प्रदर्शित करणे बंधनकारक आहे.
संबंधितांनी ApaleSarkar.Mahaonline.gov.in या संकेतस्थळावर जावून ऑनलाईनव्दारे अर्ज करून
आस्थापनेची सूचनापत्र पोचपावती/ नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावे. जे
आस्थापनाधारक वरील अधिनियमांतर्गत पोचपावती/ नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त करून घेणार
नाहीत असे आस्थापनाधारक हे वरील अधिनियमाच्या कलम 7 (3) व 29 (1) अन्वये शिक्षेस
पात्र राहील. संबंधिताविरूध्द उक्त अधिनियमांतर्गत कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
अधिक माहितीसाठी सहाय्यक
कामगार आयुक्त कार्यालय, 579, ई वॉर्ड, व्यापारी पेठ, शाहूपुरी, कोल्हापूर येथे
संपर्क साधावा, असे आवाहनही श्री. गुरव यांनी केले आहे.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.