सोमवार, ६ जानेवारी, २०२०

आपत्ती व्यवस्थापन आणि प्रसार माध्यमांची जबाबदारी शिवाजी विद्यापीठात कार्यशाळा माध्यमांच्या जलद, योग्य आणि अचूक प्रसारणामुळे आपत्ती व्यवस्थापनात आशादायी चित्र -जिल्हाधिकारी दौलत देसाई






कोल्हापूर, दि. 6 (जिमाका) : कोणत्याही आपत्ती व्यवस्थापनामध्ये प्रसारमाध्यमांचे काम अतिशय महत्वाचे ठरते. पूर्वतयारी, प्रतिसाद, पुनर्वसन या कामांमध्ये प्रसारमाध्यमांनी जलद, योग्य आणि अचूक माहिती प्रसारित केल्यामुळे आपत्ती व्यवस्थापनात आशादायी चित्र उभं राहतं, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केले.
       मराठी पत्रकार दिनाच्या निमित्ताने शिवाजी विद्यापीठाचा पत्रकारिता व जनसंवाद विभाग, जिल्हा माहिती कार्यालय आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने आपत्ती व्यवस्थापन आणि माध्यमांची जबाबदारी या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा  आज घेण्यात आली.  या कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हाधिकारी श्री. देसाई यांच्या हस्ते आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ पर्यावरण तज्ञ जय सामंत, पत्रकारिता आणि संवादशास्त्र विभाग प्रमुख डॉ. निशा मुडे-पवार, माजी विभाग प्रमुख डॉ. रत्नाकर पंडित, सहाय्यक प्राध्यापक डॉ. शिवाजी जाधव आदी उपस्थित होते. डॉ. निशा पवार संपादित वुमेन इन रिजनल टेलिव्हिजन चॅनल्स या ग्रंथाची तसेच संज्ञापक या रिसर्च जर्नलचे उपस्थितांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
            जिल्हाधिकारी श्री. देसाई पुढे म्हणाले, नैसर्गिक, मानवनिर्मित असे आपत्तीचे प्रमुख प्रकार असले तरी सामाजिक आपत्तीचा प्रकारही पुढे येत आहे. यामध्ये प्रामुख्याने अतिरेकी हल्ले, कीटकनाशकांचा अतिरेक आदींचा समावेश आहे. कोल्हापूरमधील महापुराच्यावेळी प्रसारमाध्यमांचे कौतुक करावे तितके थोडे आहे. लोकांमध्ये विश्वास निर्माण करण्याचे, सहभागी होण्याचे आणि मदत वाढविण्याच्या कामात प्रशासन यशस्वी झाले, ते केवळ प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून ! माध्यमांचा सक्रीय सहभाग राहीला. समाज माध्यमाच्या माध्यमातून दिवसभरात प्रशासनाकडून होणारी मदत याविषयीची माहिती सार्वत्रिक केली जात होती. त्यामुळेच दोनवेळा महापूर येवूनही कोठेही आक्रोश दिसला नाही, याचे सर्व श्रेय प्रसारमाध्यमांना जाते, असेही ते म्हणाले.
            जागतिक तापमान वाढीमुळे पर्यावरणाचा समतोल बिघडल्याचे सांगून पर्यावरण तज्ञ श्री. सामंत म्हणाले, माळीणसारखी भूस्खलनाची दूर्घटना असेल किंवा वाळवंटीकरण झपाट्याने वाढण्याची क्रिया असेल याबाबत मानवाने विचार करायला हवा. देश स्वातंत्र्य झाला त्यावेळी 35 कोटी लोकसंख्या होती. सध्या 130 कोटीच्या घरात लोकसंख्या पोहचत असताना शेतजमिन, पाणी यांच व्यस्त प्रमाण झालयं. धारणक्षमतेच्या बाहेर आपण जात आहोत. अशा परिस्थितीत जनजागृती करण्याची मोठी जबाबदारी माध्यमांची आहे. जागतिक पातळीवर सर्वांनी एकत्र आलं पाहिजे. जनसंपर्क, संदेशवहन, जनजागृती यामुळे येणाऱ्या आपत्ती काळात तोंड देवू शकू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
            डॉ. जाधव यांनी स्वागत केले. तर डॉ. मुडे-पवार यांनी प्रास्ताविक करून पाहुण्यांचा परिचय करून दिला. शेवटी डॉ. जाधव यांनी आभार प्रदर्शन केले.
00000


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.