कोल्हापूर, दि. 18 (जि.मा.का.) : आतापर्यंत क्षेत्रीय स्तरावर एकदाही मंडळ अधिकारी म्हणून काम न केलेल्या अव्वल कारकुन, लिपीक संवर्ग व तलाठी संवर्ग अशा सहा जणांना मंडळ अधिकारी पदाची क्षेत्रीय स्तरावरील जबाबदारी देण्यात आली. कर्मचाऱ्यांच्या सोयीनुसार जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी क्षेत्रियस्तरावर बदली केल्याने महसूल प्रशासनात सकारात्मकतेचे वारे आणि कर्मचाऱ्यांमध्ये समाधान पसरले आहे.
मंगेश दाणी, राजन नाळे, राहूल धाडणकर, एस.एस,माळी, अंजली पाटील, दिपक पिंगळे यांचा यामध्ये समावेश असून आजच त्यांना कार्यमुक्त केले आहे. जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी आतापर्यंत क्षेत्रीय स्तरावर एकदाही मंडळ अधिकारी म्हणून काम न केलेल्या तसेच ज्या कर्मचाऱ्यांनी संमती दर्शविली त्यांना स्वत: समोर बोलावून क्षेत्रीय स्तरावरील कामाच्या अनुभवाचे महत्व समजावून सांगितले. क्षेत्रीय स्तरावर काम केल्याने सर्व बाजूंनी विचार करण्याची क्षमता वाढते, लोकांचे प्रश्न जवळून पाहता येतात, संयमता येते, विविध कायद्यांचा अभ्यास करता येतो, सकारात्मकता ठेवून स्वत: वरचा आत्मविश्वास वाढतो, प्रशासनाविषयी लोकांत आशादायी वातावरण तयार होते.
विशेष करून महिला कर्मचारी संवेदनशील असल्याने त्यांना लोकांचे प्रश्न त्वरित समजतात, त्यामुळे त्यांना प्रोत्साहित केले. कर्मचाऱ्यांची सोय विचारात घेवून मागेल त्या तालुक्यात मंडळ अधिकारी म्हणून नेमणूक दिली. वशिला लावावा लागतो, सोयीच्या ठिकाण जाणीवपूर्वक दिले जात नाही, असे बदल्यांविषयी कर्मचाऱ्यांच्या मनात असलेला गैरसमज दूर झाला. त्यामुळे कर्मचारी क्षेत्रीय स्तरावर काम करण्यास तयार झाले.
या प्रस्तावास विभागीय आयुक्तांनीही त्वरित मान्यता दिली. दुसऱ्या टप्प्यात 5 वर्षापूर्वी क्षेत्रीय स्तरावर काम केलेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा क्षेत्रीय स्तरावर काम करण्याची संधी देण्यात येईल. त्यासाठी त्यांची संमती मागविण्यात येईल व सर्वसाधारण बदल्यांच्या वेळी मंडळ अधिकारी पदे रिक्त राहणार नाहीत याची काळजी घेतली जाईल, असेही जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी सांगितले.
त्यामुळे अभिलेख अद्यावतीकरण, 7/12 संगणकीकरण, पी.एम.किसान, निवडणूक काम, नोंदी तक्रार निवारण सेवा मिळण्याचा हक्काचा कायदा इ. कामे जलद गतीने होण्यास मदत होईल. क्षेत्रीय स्तरावरील सर्व रिकामी पदे याच पध्दतीने पुढेही भरली जातील. कर्मचाऱ्यांनी सेवाभावी वृत्तीने व एक संधी म्हणून सकारात्मक दृष्टिने काम केल्यास प्रशासनाची जन माणसातील ईमेज निश्चितच सुधारेल. कोणताही गैरप्रकार न होता बदल्या झाल्याने भ्रष्टाचार होणार नाही, चुकीची कामे होणार नाहीत. निश्चितच जिल्हाधिकाऱ्यांच्या या सकारात्मक उचलेल्या निर्णयाने कर्मचाऱ्यांमध्ये समाधान पसरले आहे.
0 00 0 0 0
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.