सोमवार, ६ जानेवारी, २०२०

बातमीदारीच्या कर्तव्याबरोबरच सामाजिक बांधीलकी महत्वाची -निवासी संपादक निखिल पंडितराव







कोल्हापूर, दि. 6 (जिमाका) : पत्रकाराला कोणत्याही परिस्थितीत बातमीदारीचे कर्तव्य पार पाडावे लागते. आपत्ती व्यवस्थापनात बातमीदारीबरोबरच आपत्तीग्रस्तांसाठी मदत मिळवून ती पोहोच करणारी सामाजिक बांधीलकीही महत्वाची असते, असे प्रतिपादन दै. सकाळचे निवासी संपादक निखिल पंडितराव यांनी केले.
          मराठी पत्रकार दिनाच्या निमित्ताने  शिवाजी विद्यापीठाचा पत्रकारिता व जनसंवाद विभाग, जिल्हा माहिती कार्यालय आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने आपत्ती व्यवस्थापन आणि माध्यमांची जबाबदारी या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा  आज घेण्यात आली.  या कार्यशाळेत आपत्ती व्यवस्थापन आणि वृत्तपत्रे या विषयावर श्री. पंडितराव बोलत होते. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते, न्यूज 18 लोकमतचे ब्युरो चिफ संदीप राजगोळकर उपस्थित होते.
            सुरूवातीला सहयोगी प्राध्यापक डॉ. शिवाजी जाधव यांनी स्वागत करून पाहुण्यांचा परिचय करून दिला.  पत्रकारिता आणि संवादशास्त्र विभाग प्रमुख डॉ. निशा मुडे-पवार यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे पुस्तक देवून स्वागत केले. माजी विभाग प्रमुख डॉ. रत्नाकर पंडित उपस्थित होते. श्री. पंडितराव पुढे म्हणाले, कोल्हापूरमध्ये आलेल्या महापुरात बातमीदारीबरोबरच सर्वच वर्तमानपत्रांनी आपली सामाजिक बांधिलकी जपली होती. प्रशासनाच्या मदतीला सामाजिक संस्था, विविध मंडळे, इतर जिल्ह्यातून आलेले कार्यकर्ते यांनी मदतीचे कार्य सुरू ठेवले होते. वर्तमानपत्रांच्या भूमिकेमुळे मदतीसाठी मोठा ओघ राज्यातून कोल्हापूरला येत होता. ज्या दिवशी अंक छपाई करता  आली नाही त्या दिवशी समाज माध्यमांचा वापर करून वाचकांपर्यंत ई-आवृत्ती पोहचविण्यात आल्याचेही ते म्हणाले.
पोस्टची खातरजमा झाल्याशिवाय समाज माध्यमांवर फॉरवर्ड नको  -प्रशांत सातपुते
 समाज माध्यमांवर येणारी प्रत्येक पोस्ट खरी असेलच असे नाही. त्यासाठी संबंधित सक्षम यंत्रणेकडून खातरजमा झाल्याशिवाय अशा पोस्ट पुढे पाठवू नयेत, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांनी केले.  आपत्ती व्यवस्थापन आणि सोशल मीडिया या विषयावर ते बोलत होते. समाज माध्यमांवर कोणाचे नियंत्रण सध्यातरी नाही. त्यामुळे वापर कर्त्यानेच सद्सदविवेक बुध्दिला स्मरून भान ठेवावे. तेच नियंत्रण महत्वाचे. विविध संकेतस्थळ, ॲप्, फोटोशॉप यासारख्या तंत्रज्ञानामधून व्हिडीओ अथवा छायाचित्र बनावटरित्या बनवता येवू शकतात हे ओळखले पाहिजे. अशा पोस्टवर अजिबात विश्वास न ठेवता त्या डिलिट कराव्यात. 
            महापुराच्या काळात समाज माध्यमाच्या सहाय्याने दिवसातून ठराविक वेळेला प्रशासनाच्या कार्याबाबत माहिती ही सार्वत्रिक करण्यात येत होती. महापूराच्या काळात अंक छपाई काही दिवस बंद होती. अशा वेळेला समाज माध्यमांचा प्रभावीपणे वापर करण्यात आला. चांगल्या कामासाठी समाज माध्यमांचा वापर कायम महत्वाचा ठरतो. त्यासाठी प्रत्येक माहितीसोबत तिची तारीख आणि वेळ लिहीणं हे जास्त महत्वाचे असते. समाजातील विघातक प्रवृत्ती ओळखून पोस्ट फॉरवर्ड न करता तिचा हेतू हाणून पाडावा आणि समाजाच्या चांगल्यासाठी समाज माध्यमाचा सजगपणे वापर करावा, असेही ते शेवटी म्हणाले.
महापुराच्या काळात इलेक्ट्रॉनिक मीडियाही अग्रेसर- संदीप राजगोळकर
            प्रशासनाकडून विशेषत: जिल्हा माहिती कार्यालयाकडून येणारी प्रत्येक माहिती आम्ही पोहचवत होतो. महापुराच्या काळात मिळेल त्या साधनाने माहिती मिळवणं आणि ती दर्शकापर्यंत पोहचवण्यात इलेक्ट्रॉनिक मीडियाही अग्रेसर होता, असे प्रतिपादन न्यूज 18 लोकमतचे ब्युरो चिफ संदीप राजगोळकर यांनी केले. आपत्ती व्यवस्थापन आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया या विषयावर बोलतांना त्यांनी महापुरातील अनुभव  व्यक्त केले.
            प्रशासनाच्या बरोबरीने प्रत्येक कोल्हापूरकर, विविध संस्था, कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी मदत कार्यामध्ये उतरले होते. यामध्ये प्रसार माध्यमेही मागे नव्हती. पहावे तिकडं पाणी, महामार्ग बंद झालेला, बाहेरून येणारी मदतीत अडथळे अशा परिस्थितीत इलेक्ट्रॉनिक माध्यमं घटनास्थळी पोहचून आपापल्यापरिने वृत्तांकन करत होते. बहुतेक वेळेला भावनिकता आड येत होती. पण, पुन्हा बातमीदारीच्या कर्तव्यावर जावं लागत होतं. मदत कार्य आणि पुनर्वसन याबरोबरच लोकांना धीर देण्याचं, दिलासा देण्याचं काम यावेळी मीडिया करत होती. महापुराचा आमच्या सगळ्यांसाठी वेगळा अनुभव होता, असेही ते शेवटी म्हणाले.
            डॉ. जाधव यांनी शेवटी आभार प्रदर्शन केले.
00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.