इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

बुधवार, १ जानेवारी, २०२०

गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेचा जास्तीत- जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा - विभागीय कृषि सहसंचालक दशरथ तांभाळे



कोल्हापूर, दि. 1 (जि.मा.का.) : गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना सन 2019-20 ही राज्यपुरस्कृत योजना राज्यात 9 डिसेंबर 2020 पर्यंत राबविण्यात येणार आहे. या योजनेचा जिल्ह्यातील जास्तीत-जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन विभागीय कृषि सहसंचालक दशरथ तांभाळे यांनी केले आहे.
      गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना सन 2019-20 ही राज्यपुरस्कृत योजना राज्यात 10 डिसेंबर 2019 ते 9 डिसेंबर 2020 या कालावधीत राबविण्यात येत येणार आहे. योजनेच्या अंमलबजावणीसाठी युनिव्हर्सल सोंपो जनरल इन्शुरन्स कं.लि. या कंपनीची विमा कंपनी म्हणून तर जायका इन्शुरन्स ब्रोकरेज प्रा.लि. या कंपनीची विमा सल्लागार कंपनी म्हणून निवड करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत राज्यातील सर्व वहितीधारक शेतकरी व त्याबरोबरच शेतकऱ्याच्या कुटुंबातील कोणतीही एक व्यक्ती (आई/वडिल/पती/पत्नी/मुलगा/अविवाहित मुलगी) अशा 10 ते 75 वयोगटातील 2 व्यक्तींना विमाछत्र पुरविण्यात आले आहे.
         9 डिसेंबर 2020 या विमा संरक्षण काळात राज्यातील 10 ते 75 वयोगटातील कोणत्याही वहितीधारक शेतकऱ्याचा किंवा त्याच्या कुटुंबातील कोणत्याही एका सदस्याचा अपघाती मृत्यू झाल्यास अथवा दोन डोळे/दोन हात/दोन पाय किंवा एक डोळा व एक हात/पाय निकामी होऊन कायमस्वरुपी अपंगत्व आल्यास 2 लाख रु. इतकी नुकसान भरपाई विमा कंपनीमार्फत देण्यात येईल तर अपघातामुळे एक डोळा/एक हात/एक पाय निकामी होऊन कायमस्वरुपी अपंगत्व आल्यास रुपये 1 लाख इतकी नुकसान भरपाई विमा कंपनीमार्फत देण्यात येईल.
         यासाठी विमा संरक्षित कालावधीत अपघात झाल्यास विहित नमुन्यातील प्रस्ताव आवश्यक कागदपत्रांसह क्षेत्रिय कृषि पर्यवेक्षक यांच्यामार्फत तालुका कृषि अधिकारी कार्यालय येथे (शक्यतो 45 दिवसांच्या आत सादर करावा). सादर करावा.  विहित कागदपत्रांसह ज्या दिनांकास प्रस्ताव तालुका कृषि अधिकारी कार्यालयात दाखल/प्राप्त होईल त्या दिनांकासच तो विमा कंपनीस प्राप्त झाला आहे असे समजण्यात येईल.
         प्रस्ताव दाखल करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे याप्रमाणे- विहित नमुन्यातील पूर्वसूचनेचा अर्ज (सहपत्र क्र. 1), 7/12 उतारा, गाव नमुना 6- 6- ड,  मृत्यू दाखला/ अपंगत्वाचा दाखला, प्रथम माहिती अहवाल, घटनास्थळ पंचनामा, वयाचा दाखला (स्वयंसांक्षांकित प्रत), शिधापत्रिका (स्वयंसांक्षांकित प्रत), विहित नमुन्यातील कार्यकारी दंडाधिकारी यांचे समोर केलेले प्रतिज्ञापत्र (प्रपत्र -ग), याशिवाय अपघाताच्या स्वरुपानुसार पुराव्यासाठी आवश्यक कागदपत्रे अशी आहेत.
00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.