सोमवार, २० जानेवारी, २०२०

कुष्ठरोगाविरुध्द अखेरचे युध्द स्पर्श कुष्ठरोग जनजागृती मोहीम यशस्वी करा -जिल्हाधिकारी दौलत देसाई




       कोल्हापूर, दि. 20 (जिमाका)  : कुष्ठरोगाविरुध्द अखेरचे युध्द या घोष वाक्या नुसार 30  जानेवारी ते 13 फेब्रुवारी स्पर्श कुष्ठरोग जनजागृती मोहीम यशस्वी करा, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज केले.
       स्पर्श कुष्ठरोग व क्षयरोग जनजागृती अभियान राबविण्यासाठी जिल्हा समन्वय समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयातील राजर्षी शाहू सभागृहात घेण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अमन मित्तल उपस्थित होते. सुरुवातील सदस्य सचिव तथा आरोग्य सेवा (कुष्ठरोग) चे सहायक संचालक डॉ. प्रकाश पाटील आणि जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. मानसी कदम यांनी संगणकीय सादरीकरण करुन सद्यस्थितीबाबत माहिती दिली.
          यावेळी जिल्हाधिकारी श्री. देसाई म्हणाले, जिल्हा क्षयरोग मुक्त आणि कुष्ठरोग मुक्त करण्यासाठी सर्व यंत्रणांनी  सहकार्य करावे. लवकरात लवकर रुग्ण शोधणे आणि लवकरात लवकर उपचार करणे या विषयी मोहीम राबवावी. यंदाचे घोष वाक्य कुष्ठरोगाविरुध्द अखेरचे युध्द हे असून सर्वांनी कुष्ठरोग निर्मुलनासाठी आवश्यक ते प्रयत्न करावे. शाळा, महाविद्यालय या मधून जनजागृती मोहीम मोठ्या प्रमाणात राबवावी.
कुष्ठरोग/क्षयरोग नियंत्रण प्रतिज्ञा
       मी आज स्पर्श कुष्ठरोग आणि क्षयरोज जानजागृती अभियानाच्या दिवशी शपथ घेतो/घेते की, संशयित कुष्ठरोगाचे आणि क्षयरोगाचे लक्षण असलेल्या व्यक्तीला जवळच्या आरोग्य केंद्रामध्ये जाण्यासाठी प्रेरित करेन. जर कुष्ठरोग असेल तर त्याला पूर्ण उपचार मिळावे यासाठी मदत करण्याची मी दक्षता घेईन. जर माझ्या जवळपास माझ्या मित्रांमध्ये, शेजारी आणि समाजामध्ये कोणी कुष्ठरोगी असेल तर मी त्याच्या/तीच्या सोबत बसणे, खाणे, फिरणे या बाबत कुठल्याही प्रकारचा भेदभाव करणार नाही.
          मी अशी सुध्दा शपथ घेतो/घेते की, कुष्ठरोग पीडित व्यक्तीबरोबर समाजिक भेदभाव होणार नाही. तसेच कुष्ठरोगाविरुध्द अखेरचे युध्द यासाठी मी कटीबध्द राहीन.
          समाजातील सर्व लोक मित्र, नातेवाईक, शेजारी क्षयमुक्त राहण्यासाठी मी काळजी घेईन.
          मी अशीही शपथ घेतो/घेते की, राष्ट्रपीता महात्मा गांधी यांचे कुष्ठरोग मुक्त भारत हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहीन तसेच क्षयरोग मुक्त भारत हे स्वप्न पूर्ण करण्यासाठीही प्रयत्नशील राहीन.
          ही प्रतिज्ञा सर्वांनी केवळ न घेता त्यासाठी प्रत्यक्ष प्रयत्न करावेत, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केले.
बोगस डॉक्टरांविरुध्द मोहीम राबवा-जिल्हाधिकारी
       भिंतींवर डॉक्टरांच्या जाहिराती मोठ्या प्रमाणात दिसत आहेत. त्यामध्ये त्यांचा पत्ताही दिला आहे. जिल्ह्यातील बोगस डॉक्टरांविरुध्द मोहीम राबवून अशा डॉक्टरांची तपासणी करावी, असे आदेश जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांना दिले. त्याचबरोबर वैद्यकीय कचरा तसेच जैव वैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट योग्यरित्या होते की नाही याबाबतही तपासणी करावी.  गॅस दाहिनी प्रकल्प उभारण्यासाठी पुढाकार घ्यावा. सुरुवातील मोठ्या ग्रामपंचातीमध्ये प्रकल्प उभारण्याबाबत प्रयत्न करावेत, अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.  यावेळी शेंडापार्क कुष्ठधाम बाबतही जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घेतला.
शहरी भागात पाच ग्रामीणमध्ये तीन उद्दिष्ट्य-अमन मित्तल
          बोगस डॉक्टर मोहिमेबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यावेळी म्हणाले, शहरी भागात महिन्याला किमान पाच डॉक्टरांचे तर ग्रामीण भागामध्ये किमान तीन डॉक्टरांचे उद्दिष्ट्य पथकाला द्यावे. मोठ्या प्रमाणात ही मोहीम राबवून बोगस डॉक्टरांवर गुन्हे दाखल करावेत. याबैठकीला जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी.सी केम्पी पाटील, डॉ. हर्षला वेदक, डॉ. अमोल कुमार शंकर माने, डॉ. शुभांगी रेंदाळकर, डॉ. बाबासाहेब लंब, डॉ. पी.ए. पाटील, नसिमा खान, आदी उपस्थित होते.
 0 0 0 0  0 0

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.