मंगळवार, १४ जानेवारी, २०२०

अन्नधान्य वाटपात कोल्हापूर राज्यात अव्वल -दत्तात्रय कवितके



       कोल्हापूर, दि. 14 (जिमाका) : प्रत्येक महिन्यात धान्य वाटपात कोल्हापूर जिल्हा संपूर्ण राज्यात पहिल्या अथवा दुसऱ्या स्थानी असतो. दि. 1 जानेवारी 2020 पासून ते आज दि. 13 जानेवारी 2020 अखेर 5 लाख 55 हजार 755 शिधापत्रिकांपैकी 4 लाख 7 हजार 40 इतक्या शिधापत्रिकांवरती धान्य वाटप झाले आहे. या वाटप झालेल्या शिधापत्रिकांची संख्या ही राज्यात अव्वल आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके यांनी दिली.
       जिल्ह्यात प्रत्येक महिन्याचा दि. 7 हा दिवस अन्न दिन म्हणून साजरा करण्यात येतो व दि. 8 ते 15 या कालावधीत अन्न सप्ताह साजरा करण्यात येतो. दि.7 जानेवारी 2020 रोजी 5 लाख 55 हजार 755 इतक्या शिधापत्रिका पैकी फक्त एका दिवशी 64 हजार 605 इतक्या शिधापत्रिकांवरती धान्य वाटप करण्यात आले आहे. ही आकडेवारी राज्यात पहिल्या क्रमांकाची आहे. तसेच दि. 10 जानेवारी 2020 पर्यंतची धान्य वाटपाची टक्केवारी ही 57 टक्के इतकी आहे. कोल्हापूर जिल्ह्यात अन्न दिन सप्ताह हा दिनांक 8 ते 15 तारखेपर्यंत साजरा करण्यात येतो. दि. 13 जानेवारी 2020 रोजीच्या सायंकाळी 6 वाजेपर्यंतचा धान्य वाटपाचा अहवाल पाहता धान्य वाटपाची टक्केवारी ही 73.24 टक्के इतकी आहे.
000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.