गुरुवार, १६ जानेवारी, २०२०

84 पासूनचे प्रलंबित प्रकरण महसूल न्यायाधिकरणाकडून तडजोडीने निकालात








       कोल्हापूर, दि. 16 (जिमाका) : 1984 सालापासूनचा जमीन मालक आणि कुळ यांच्यामध्ये प्रलंबित असणारे प्रकरण महाराष्ट्र महसूल न्यायाधीकरणाकडून सामंजस्याने तडजोड होवून निकालात काढण्यात आले, अशी माहिती न्यायाधीकरणाचे उप प्रबंधक तथा निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब  गलांडे यांनी दिली.
       महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरण, कोल्हापूर येथे जमीन मालक विजय चनबसप्पा दड्डी विरूध्द कुळ धनाजी हिंदुराव दळवी वगैरे यांच्यामध्ये सामंज्याने तडजोड होऊन हे प्रकरण दि. 14 जानेवारी रोजी निकाली निघाले. जमीन मालक विजय चनबसप्पा दड्डी यांच्यातर्फे ॲड. व्ही.ए.करवीरकर विरूध्द कुळ धनाजी हिंदुराव दळवी वगैरे ॲड.शामराव पाटील (शिरोळकर) व ॲड. एम.यु. सुतार यांनी काम पाहिले.
       या प्रकरणामध्ये पक्षकारांमधील वाद हा सन 1984 सालापासूनचा होता. या न्यायाधिकरणाकडे कुळ कायद्यांतर्गत बरेचसे खटले प्रलंबित आहेत. गेल्या काही महिन्यांपूर्वी अशा प्रकारचे जुने खटले तडजोडीने निकाली निघाले होते. त्यावेळी या न्यायाधिकरणाचे सदस्य (न्यायीक) एम.एम.पोतदार, महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरण, कोल्हापूर व उप प्रबंधक तथा निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांनी या न्यायाधिकरणाकडे प्रलंबीत असलेल्या प्रकरणातील पक्षकारांना जाहीर आवाहन करून पक्षकारांनी त्यांच्यातील वाद सामंजस्याने व सामोपचाराने मिटवावे, अशी विनंती केली होती. त्यांच्या ह्या आवाहन व विनंतीला मान देवून हा वाद मिटला आहे. कुळ कायद्यांतर्गत या न्यायाधिकरणाकडे जी काही प्रकरणे प्रलंबीत आहेत त्यामध्ये पक्षकारांनी सामोपचाराने तडजोड करावी, असे आवाहन या न्यायाधिकरणाकडून करण्यात येत आहे.
          सामंजस्याने, सामोपचाराने पक्षकारांनी त्यांच्यातील वाद मिटविल्यास त्यांचा वेळ व पैसा वाचतो तसेच आर्थिक व मानसिक त्रासातून त्यांची मुक्तता होते. महसूल न्यायाधिकरणाचे उप प्रबंधक तथा निवासी उपजिल्हाधिकारी श्री. गलांडे यांनी पक्षकारांच्या तडजोडीने खटला मिटविल्याबद्दल संबंधित पक्षकार व वकीलांचे आभार व्यक्त केले व त्यांनी या न्यायाधिकरणाच्यावतीने या न्यायाधिकरणाकडे प्रलंबीत असणारी प्रकरणे जास्तीत-जास्त तडजोडीने निकाली काढावीत, असे आवाहनही केले.
00000



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.