कोल्हापूर, दि. 15 (जि.मा.का.) : शिरोळ तालुक्यातील एकही पूरग्रस्त
शासकीय लाभापासून वंचित राहणार नाही याची काळजी प्रशासनाने घ्यावी. आलेल्या
समस्यांबाबत पुन्हा एकदा शहानिशा करुन आवश्यक तेथे फेर सर्वेक्षण करुन
लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी प्रयत्न करा, अशा सूचना सार्वजनिक आरोग्य
राज्यमंत्री राजेंद्र पाटील- यड्रावकर यांनी दिली.
शिरोळ तालुका पूरग्रस्तांच्या मदतनिधी आणि
समस्यांबाबत आज तहसिलदार कार्यालय येथे आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला खासदार
धैर्यशील माने, जिल्हाधिकारी दौलत देसाई, प्रांताधिकारी डॉ. विकास खरात, तहसिलदार
डॉ. अपर्णा मोरे, गट विकास अधिकारी शंकर कवितके, माजी आमदार उल्हास पाटील आदी
उपस्थित होते.
तालुक्यातील
43 गावांच्या शिष्टमंडळाने विविध मागण्यांचे निवेदन देवून अनुदान वाटप, मदत निधी,
गायरान जमिनीवर अतिक्रमण कायम करणे, छोट्या व्यावसायिकांचे फेर सर्वेक्षण करणे, घर
पडझड बाबत दिलेले अनुदान या बाबतीत आलेल्या अडचणी आणि मागण्या यावर चर्चा केली.
राज्यमंत्री
श्री. यड्रावकर पुढे म्हणाले, तालुक्यातील पूरग्रस्त गावांनी आजच्या या आढावा
बैठकीत विविध समस्या आणि प्रश्नांबाबत तसेच मागण्यांबाबतही आपली निवेदने दिली
आहेत. काही ठिकाणी फेर सर्वेक्षण तसेच शहानिशा करुन निर्णय घेण्यात येईल. एकही
लाभार्थी लाभापासून वंचित राहणार नाही याची काळजी आम्ही घेवू. पूरग्रस्तांना योग्य
न्याय देण्याचा आम्ही प्रयत्न करु. गायरान जमिनीवरील अतिक्रमण कायम करण्याबाबत,
त्याचबरोबर त्या लाभार्थ्यांना मदत देण्याबाबत सकारात्मक चर्चा करुन राज्यस्तरीय
निर्णय घेतला जाईल. आज आलेल्या निवेदनांबाबत 15 दिवसात प्रशासनाने सविस्तर अहवाल
द्यावा, असे निर्देशही श्री. यड्रावकर यांनी दिले.
खासदार
श्री. माने यावेळी म्हणाले, मायक्रो फायनान्सबाबत राज्यशासनाला धोरणात्मक निर्णय
घ्यावा लागेल. त्यासाठी तसा प्रस्ताव पाठवून पाठपुरावा केला जाईल. पूरग्रस्तांच्या
समस्या निश्चितपणे सोडविल्या जातील. राज्य शासनाच्या पातळीवरील काही धोरणात्मक
निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही निश्चित
प्रयत्न करु. शिरोळ तालुक्यावर येणाऱ्या महापुरासारख्या आपत्तीतून कायम स्वरुपी निवारण करण्यासाठी पुनर्वसनाच्या माध्यमातून
प्रयत्न केले जातील. शासकीय लाभ, निधी, अनुदान पूरग्रस्तांना देण्यात येईल. कोणीही
वंचित राहणार नाही, असे आश्वासन त्यांनी दिले.
जिल्हाधिकारी श्री. देसाई
यावेळी म्हणाले, पूरग्रस्तांनी आजूनही आपल्या मागण्यांबाबत तलाठी, ग्रामसेवक
यांच्याकडे आपले लेखी निवेदन द्यावे.
शिरोळचे नगराध्यक्ष अमर
पाटील, जि.प. सदस्य अशोकराव माने, पंचायत समिती सभापती मिनाज जमादार, उपसभापती मल्लु खोत, सदस्य सुरेश कांबळे, सतीश मलमे, आदी
उपस्थित होते.
0 0 00 0 0 0
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.