गुरुवार, २३ जानेवारी, २०२०

जिल्ह्यात 31 जानेवारीपर्यंत बंदी आदेश



कोल्हापूर, दि. 23 (जिमाका)  :  जिल्हयात विविध पक्ष, संघटनांनी  पुकारलेला महाराष्ट्र तसेच भारत बंद तसेच प्रजासत्ताक दिनी विविध मागण्यांसंदर्भात मोर्चा, रॅली, उपोषण, आत्मदहन, धरणे अशी संभाव्य आंदोलने तसेच विविध पक्ष, संघटनांची त्यांच्या मागण्यांसाठी होणारी आंदोलने या पार्श्वभूमीवर  प्र. अपर जिल्हादंडाधिकारी दत्तात्रय कवितके  यांनी  1951 चे कलम 37 (1) अ ते फ आणि कलम 37 (3) अन्वये 31 जानेवारी 2020 पर्यंत जिल्ह्यात बंदी आदेश जारी केला आहे.
       वंचित बहुजन आघाडी पक्षाच्यावतीने CAA,NRC, NPR च्या विरोधात दिनांक 24 जानेवारी रोजी महाराष्ट्र बंद तसेच बहुजन क्रांती मोर्चाच्यावतीने दिनांक 29 जानेवारी रोजी पुकारण्यात आलेला भारत बंद व दिनांक 26 जानेवारी रोजी देशभर साजऱ्या होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून विविध पक्ष/संघटना, व्यक्ती/समुह यांच्याकडून विविध मागण्यांसंदर्भात मोर्चा, रॅली, उपोषण, आत्मदहन, धरणे या प्रकारची संभाव्य आंदोलने तसेच जिल्ह्यातील विविध पक्ष/संघटनांकडून त्यांच्या विविध मागण्यांसाठी वारंवार होणारी आंदोलने या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून प्र. अपर जिल्हादंडाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) अ ते फ आणि कलम 37 (3) अन्वये दि. 24 जानेवारी रोजी सकाळी 7 वाजल्यापासून 31 जानेवारी 2020 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत  जिल्ह्यात बंदी आदेश जारी केला आहे.
कलम 37 (1) अ ते फ
            शस्त्रे, बंदुका, सोटा, तलवारी, भाले, सुऱ्या लाठी अगर काठी किंवा शारिरीक इजा करण्यासाठी वापरता येईल अशा कोणत्याही वस्तू बरोबर न नेणे. कोणताही ज्वालाग्राही पदार्थ अगर स्फोटके पदार्थ वाहून नेणे. दगड अगर तत्सम शस्त्रे साठविणे अगर सहज फेकून त्याचा मारणेसाठी उपयोग करणे. व्यक्ती अगर त्याच्या प्रतिमा यांचे प्रदर्शन दहन करणे. सार्वजनिक घोषणा करणे, गाणी म्हणणे आणि गाणी अथवा वाद्ये वाजविणे. असभ्य हावभाव करणे, ग्राम्यभाषा वापरणे, सभ्यता व नितीविरूध्द निरनिराळ्या जातीच्या नैतिक भावना दुखावल्या जाऊन त्यांच्यामध्ये भांडणे-बखेडे निर्माण होऊन शांततेस अगर सुव्यवस्थेस बाधा येईल अशी सोंगे अगर कोणताही जिन्नस तयार करणे व त्याचा प्रसार करून उपयोग करणे.
कलम 37 (3)
            कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पाच अगर पाचहून जादा लोकांनी एकत्र जमा होणे, जमाव जमणेस, मिरवणुका काढणे व सभा घेणे.
            हा हुकुम ज्या सरकारी नोकरांना त्यांची कर्तव्ये व अधिकार बजाविणेचे संदर्भात उपनिर्न्दिष्ट वस्तू हाताळाव्या लागतात आणि एकत्र जमावे लागते व ज्या व्यक्तींनी पोलीस अधिक्षक अगर संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी अगर संबंधित विभागाने पोलीस निरीक्षक किंवा सक्षम पोलीस प्राधिकारी यांची परवानगी घेतलेली आहे. अशा व्यक्तींना तसेच सर्व जातीधर्माचे सण/उत्सव/ जयंती/ यात्रा इ. हे शांततामय मार्गाने लागू पडणार नाही.
00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.