सोमवार, १३ जानेवारी, २०२०

31 व्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानास प्रारंभ स्वयंशिस्तीचे धडे लहानपणापासून व्हायला हवेत -खासदार धैर्यशील माने









       कोल्हापूर, दि. 13 (जिमाका) : वेगावर स्वार होणाऱ्या पीढीला झालेला दंड हे प्रतिष्ठेचे साधन वाटते. यामधून विकृत पिढी तयार होत आहे. अपघात करणाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल झाले पाहिजेत. लहानपणापासूनच स्वयंशिस्तीचे धडे व्हायला हवेत त्यासाठी आपण सर्वजण मिळून प्रयत्न करूया, असे आवाहन खासदार धैर्यशील माने यांनी केले.
       31 व्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानास येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयात आज प्रारंभ करण्यात आला. यावेळी खासदार श्री.माने, आमदार ऋतुराज पाटील, जिल्हाधिकारी दौलत देसाई, पोलिस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संभाजी माने आदी उपस्थित होते.
          रोड सेफ्टी ऑन व्हील्स, जनजागृती करणारे वाहन आणि रस्ता सुरक्षा गॅलरीचे उद्घाटन यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर झालेल्या कार्यक्रमात खासदार श्री. माने पुढे म्हणाले, प्रादेशिक परिवहन कार्यालयाने लोकसहभागातून जनजागृती सुरू केली आहे. आपल्या जिल्ह्याची सुमारे 41 लाख लोकसंख्या असून 13 लाख वाहनांची संख्या आहे. म्हणजे 25 टक्के घरांमध्ये 1 गाडी असे प्रमाण होत आहे. जिथे शक्य आहे तिथे गाडी वापरण टाळलं पाहिजे. पण आपले मानसिक प्रदूषण रोखणार कोण हा खरा प्रश्न आहे.
          ज्यावेळी सुरक्षिततेच्याबाबतीत आपण आपल्या चुका स्वीकारू त्याचवेळी अशा उपक्रमांना बळकटी येईल. यासाठी स्वयंशिस्त हवी. शाळांमधून स्वयंशिस्तीचे संस्कार होत आहेत. त्याचा अशा उपक्रमांमध्ये उपयोग करायला हवा. अपघातांमध्ये मृत्यूमुखी पडणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. यामध्ये संसार उद्ध्वस्त होत आहेत. वेगावर स्वार होणाऱ्या पिढीने संयमाचा ब्रेकर लावला पाहिजे. त्यासाठी नियमांचे पालन करणारी लाईफस्टाईलला स्वत:पासून सुरूवात करू आणि अपघातांचे प्रमाण शून्यावर आणू. त्यासाठी आपण सर्वांनी मिळून काम करू, असे आवाहनही खासदार श्री. माने यांनी केले.
          आमदार ऋतुराज पाटील यावेळी म्हणाले, नियमांचे पालन करण्याची आणि स्वत:बरोबर इतरांची सुरक्षितता जपण्याची वैयक्तिक जबाबदारी आपली आहे. जिल्ह्यातील अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी डॉ. डी.वाय.पाटील ग्रुपच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून असे उपक्रम राबवू. महापुराच्या काळात नादुरूस्त झालेल्या रस्त्यांसाठी 178 कोटींची मागणी केली असून निश्चितपणे जिल्ह्यासाठी किमान 100 कोटी आणू, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
          जिल्हाधिकारी श्री. देसाई यावेळी म्हणाले, परदेशात वाहतूक सुरक्षेचे  बाळकडू लहानपणापासून मिळतं. हेच बाळकडू शिक्षणाच्या माध्यमातून आपणाला मिळाल तर रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा करायची गरज असणार नाही. रस्त्यांची सुरक्षा इको सिस्टीम भोवती फिरते. पादचाऱ्यांसाठी सबवे अथवा भुयारी मार्ग त्याचबरोबर शाळा, गाव अशा ठिकाणीही भुयारी मार्ग, उड्डाण मार्ग आवश्यक असतो. जिल्हा रस्ता सुरक्षा  समितीच्या माध्यमातून गेल्या 5 वर्षात झालेल्या अपघातांचा आढावा घेवून हे प्रमाण कमी करण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न करू.
          पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख म्हणाले, हेल्मेट घालून वाहतूकीचे नियम पाळून तो फोटो समाज माध्यमांवर अपलोड करून त्याला लाईक्स मिळवावेत. शिस्त आणि नियम पाळण्याला आयुष्याचा भाग बनवा. लोकप्रतिनिधीच नियम पाळणारे आहेत. याचा आदर्श तरूणांनी घेतला पाहिजे, असेही ते म्हणाले. यावेळी अधीक्षक अभियंता श्री. माने, जिल्हा लॉरी असोशिएशनचे अध्यक्ष सुभाष बापू यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. स्टीव्हन अल्वारिस यांनीही यावेळी मनोगत व्यक्त करून रस्ता सुरक्षा अभियानाबाबत माहिती दिली.
आमचंही ठरलयं
प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. अल्वारिस यांनी आपल्या मनोगतात आमचंही ठरलयं असे सांगून  ‘नियम पाळणार अपघात टाळणार’ ‘कोल्हापूरकर सुरक्षादूत म्हणून काम करणारं’ अशी घोषणा केली. याला उपस्थितांनी मनमुराद दाद दिली. 

हीच ती वेळ...पुन्हा येण्याची
खासदार धैर्यशील माने आपल्या ओघोवत्या शैलीने नियमबध्द लाईफस्टाईलची तरूणाईला साद घातली. यावेळी बोलताना ते आमदार श्री. पाटील यांच्याकडे पाहून म्हणाले, आजच्या कार्यक्रमाविषयी  डॉ. अल्वारिस यांना वेळे अभावी सांगितले होते.  ‘मी पुन्हा येतो मी पुन्हा येतो’ पण पुन्हा येण्याचं काही खरं नसतं. हीच ती वेळ.. पुन्हा येण्याची म्हणून ‘मी पुन्हा आलो.’ असे म्हणताच उपस्थितांना हास्यकल्लोळ झाला.

अपघाताचा मी एक व्हिक्टीम...
वयाच्या चौथ्या वर्षी वडीलांचा अपघातात मृत्यू झाला. वडीलांचा चेहरासुध्दा आठवत नाही, असे सांगून खासदार श्री. माने यांनी अपघाताचा आपण व्हिक्टीम असल्याचे सांगितले. वाहन परवाना का मिळतो, कसा मिळतो यावर सनियंत्रण ठेवायला हवं. वाहन परवाना मिळाला की आपलं काम संपलं. या भावनेपेक्षा आपली आणि इतरांच्या सुरक्षिततेची जबाबदारी वाढली ही भावना ठेवायला हवी, असे आवाहन त्यांनी केले.

रोड सेफ्टी ऑन व्हिल्स
* रस्ता सुरक्षा अभियानाची माहिती देण्यासाठी वाहन
* वाहनात 20 संगणक मोठ्या पडद्यासह उपलब्ध
* रस्ता सुरक्षाबाबतीत नियम आणि छायाचित्रणांची माहिती
* नियमावली, सुरक्षितता या विषयीचे व्हीडीओ
* शहरातील महाविद्यालये तसेच ग्रामीण भागातही जनजागृती
000000






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.