रविवार, २६ जानेवारी, २०२०

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतून जिल्ह्याला 391 कोटी 96 लाख रुपयांची कर्जमाफी - पालकमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील














                   कोल्हापूर, दि. 26 (जिमाका) :  सत्तारुढ होताच शासनाने राज्यातील आर्थिकदृष्टया अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज माफ करणारी "महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना" आणली. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि राष्ट्रीयकृत बँकांमधील 57 हजार 196 शेतकऱ्यांना 391 कोटी 96 लाख रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एप्रिल महिन्याच्या सुरुवातीस मिळणार आहे, अशी ग्वाही पालकमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील यांनी आज दिली.
           भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 70 व्या वर्धापन दिनी पालकमंत्री सतेज ऊर्फ बंटी डी पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. छत्रपती शाहू स्टेडियम येथे झालेल्या या ध्वजारोहणाच्या मुख्य शासकीय समारंभात पालकमंत्री श्री. पाटील बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील, आमदार चंद्रकांत जाधव, महापौर वकील सूरमंजिरी लाटकर, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके, जिल्हाधिकारी दौलत देसाई, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, अपर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब  गलांडे आदीसह स्वातंत्र्य सैनिक  त्यांचे नातेवाईक उपस्थित होते.
           पालकमंत्री श्री. पाटील यावेळी म्हणाले, परंपरा आणि नवता याचं नातं सागणारा आजचा हा महन्मंगल दिवस आहे. ज्यांच्या त्यागातून आपल्याला स्वातंत्र्य मिळाले, त्या थोर स्वातंत्र्य सैनिकांच्या, देशभक्तांच्या, क्रांतीकारकांच्या आणि शहिदांच्या प्रती मी प्रथम आदर व्यक्त करतो आणि आपणा सर्वांना प्रजासत्ताक  दिनाच्या शुभेच्छा देतो. पुराच्या काळात बचाव व मदत कार्यात मदत करणाऱ्या  सर्वांचे मी ऋण व्यक्त करतो. पूरपरिस्थितीत कोल्हापूरकरांनी जो संयम आणि धैर्य दाखविले त्यांच्या वृत्तीला मी  सलाम करतो.  जिल्ह्यातील आपत्तीग्रस्तांना एकूण 321 कोटी 45 लाखाहून अधिक मदत वाटप केली आहे.  अद्यापही उर्वरित लाभार्थ्यांना अनुदान वाटप प्रक्रिया सुरु आहे.  पूरबाधित लोकांना देय असणारी सर्व मदत विनासायास व तात्काळ देण्यावर प्रशासनाने भर दिला आहे.
391 कोटी 96 लाख रुपयांची कर्जमाफी
  पालकमंत्री पुढे म्हणाले, जिल्ह्यात  अतिवृष्टी व महापुरामुळे 78 हजार 228 हेक्टरवरील तीन लाखांवर शेतकरी बाधीत झाले  तर अवकाळी पावसामुळे 1584  हेक्टरवरील 7861 शेतकरी बाधीत झाले आहेत.  या बाधीत शेतकऱ्यांना रोख स्वरुपातील 160 कोटींची मदत तसेच 295 कोटींची मदत कर्जमाफीच्या माध्यमातून सहकार विभागाकडून प्रस्तावित केली आहे. 1 एप्रिल 2015 ते 31 मार्च 2019 पर्यंत उचल केलेल्या एक किंवा एकापेक्षा जास्त कर्ज खात्यात अल्प मुदत पीक कर्जाची 30 सप्टेबर 2019 रोजी मुद्दल व्याजासह थकीत असलेली व परत फेड न झालेली रक्कम 2 लाखापर्यंत आहे अशा शेतकऱ्यांना कर्ज मुक्तीचा लाभ देण्यात येणार आहे. 31 मे 2020 पूर्वी या योजनेतील शेतकऱ्यांना कर्जमुक्त करुन खरीप पीक कर्ज वाटप करण्याचे उदि्दष्ट आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि राष्ट्रीयकृत बँकामधील 57 हजार 196 शेतकऱ्यांना 391 कोटी 96 लाख रुपयांची कर्जमुक्ती मिळणार आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीस या कर्जमाफीचा शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. जे शेतकरी अल्पमुदत पीक कर्जाची नियमितपणे परतफेड करीत असतात अशा शेतकऱ्यांनाही प्रोत्साहन देण्यासाठी लवकरच नवीन योजना जाहीर करण्याचा शासनाचा मानस आहे.
           छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, म. जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर शासनाची वाटचाल
           जिल्ह्याच्या विकासाचा केंद्रबिंदू असणाऱ्या जिल्हा वार्षिक योजना आराखड्याच्या प्रभावी अंमलबजावणीवर  शासनाने  विशेष  लक्ष  केंद्रीत केले आहे.  यंदा जिल्हा वार्षिक योजना आराखड्यानुसार जिल्ह्यासाठी 386 कोटी 38 लाखाची  अर्थसंकल्पीय तरतूद मंजूर झाली असून शासनाने आतापर्यंत 231 कोटीवर निधी उपलब्ध करुन दिला आहे. यामध्ये सर्वसाधारण योजनेसाठी 271 कोटीची तर अनुसूचित जाती उपयोजनेसाठी 113 कोटी 41 लाखाच्या अर्थसंकलपीय तरतुदीचा समावेश आहे. उजळाईवाडी विमानतळावर रात्रीच्यावेळी विमान उतरविण्यासाठी एव्हीएशन लाईट बसविणे आणि सीपीआर रुग्णालयास सोलर डिप फ्रिजर आणि कार्डीयाक रूग्णवाहिका पुरविण्यासारख्या कामांवर भर दिला आहे.   
           सन 2020-21 साठी सर्वसाधारण योजनेंतर्गत 270 कोटी 85 लाखाचा तर अनुसूचित जाती उपयोजनेसाठी 113 कोटी 41 लाखाच्या वित्तीय मर्यादित आराखडा तयार केला आहे. मात्र यंत्रणाकडून 585 कोटी 87 लाखाची मागणी प्राप्त असून जिल्ह्याची गरज व आवश्यकतेनुसार अधिकाधिक निधी उपलब्ध करून घेण्याचा माझा प्रयत्न राहील.
  राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या माणगाव येथील परिषदेला 100 वर्षे पूर्ण होत आहेत. हा सोहळा शासनाच्यावतीने व्हावा त्यासाठी 50 लाखांचा निधी मिळण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. याबरोबरच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वसंध्येला शाहूवाडी तालुक्यातील मौजे मरळे येथील 35 मागासवर्गीय शेतकरी कुटुंबांना कायम मालकी हक्काने जमीन प्रदान करण्याचा आदेश प्रशासनाने जारी केल्याने मरळे येथील मागासवर्गीय शेतकऱ्यांना फार मोठा दिलासा मिळाला आहे. छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी  छत्रपती शाहू महाराज, म. जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर शासनाची वाटचाल सुरू आहे. 
शहरे आणि गावे स्वच्छ, सुंदर, आरोग्य संपन्न करण्यास प्राधान्य
           जिल्ह्यात घर तेथे शौचालय ही विशेष मोहीम गतीमान करण्याचे निर्देश दिले असून वैयक्तिक तसेच सार्वजनिक स्वच्छता जोपासून जिल्ह्याची स्वच्छ, सुंदर, आरोग्य संपन्नतेची गौरवशाली परंपरा  यापुढेही अखंड ठेवण्याचा या शुभ दिनी संकल्प करूया.
           रस्ते या दळणवळणाच्या आणि जिल्ह्याच्या विकासाच्या धमण्या असून  जिल्ह्याचा  विकास  डोळ्यासमोर  ठेवून   यापुढील   काळात   रस्ते विकासाचे जाळे  निर्माण करण्याचा शासनाचा संकल्प आहे. सध्या जिल्ह्यात सुरू असलेल्या रस्ते विकास, पुलांची बांधकामे, शासकीय इमारती उभारणीच्या कार्यक्रमांनाही गती दिली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
          महापुरामुळे जिल्ह्यातील बहुतांशी पूल पाण्याखाली गेले होते त्यामुळे पुलांना धोका निर्माण होण्याची शक्यता गृहीत धरुन पुलांची सुरक्षितता तपासण्यासाठी 31 मोठ्या पुलांची आयआयटी मद्रास या  संस्थेमार्फत Robotics च्या सहाय्याने Under Water Inspection करुन आयआयटीकडून सूचविण्यात येणाऱ्या उपाययोजना प्राधान्य क्रमाने करण्यात येणार आहे. पुरपरिस्थितीमुळे जिल्ह्यातील 7 पूल आणि  158.80 कि.मी. लांबीचे रस्ते 5 ते 6 दिवस पाण्याखाली होते. पूर परिस्थितीला तोंड देण्याचे दृष्टीने रस्ते आणि पुलांबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून एशियन अर्थसहाय्यातून कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत.
सार्वभौमत्व संविधानाचे जनहित सर्वांचे
           लोकशाही सुदृढ व्हावी यासाठी समाजातील सर्व लोकांना सतत शिक्षणाद्वारे जागृत करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाच्यावतीने  आजच्या प्रजासत्ताक दिनापासून लोकशाही पंधरवडा राबविण्यात येत आहे. लोकशाहीच्या बळकटीकरणामध्ये मतदानाची प्रक्रिया अत्यंत महत्वपूर्ण आहे. देशाच्या विकास प्रक्रियेत स्थानिक स्वराज्य संस्थांचे महत्व स्थान आणि भूमिका सर्वार्थाने महत्वाची असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका  निर्भय, मुक्त व  पारदर्शक वातावरणात पार पडाव्यात यासाठी यंत्रणेतील अधिकारी कर्मचाऱ्यांनी निर्भिडपणे काम करावे तसेच लोकशाही जोपासण्यासाठी व टिकवण्यासाठी प्रत्येक मतदारांना संविधानाने दिलेला मतदानाचा हक्क  प्रत्येकाने राष्ट्रीय कर्तव्य समजून बजावला पाहिजे.
           भारतीय राज्य घटनेतील मूलतत्वांची व्याप्ती व सर्वसमावेशकता नागरिकांना समजावी, त्याबरोबरच घटनेतील न्याय, स्वातंत्र्य समानता व बंधुता ही मूलतत्वे समाज मनावर कोरली जावीत यासाठी संविधानाचा परिपूर्ण परिचय नागरिकांना तसेच विद्यार्थ्यांना व्हावा या उद्देशाने आजपासून  'सार्वभौमत्व संविधानाचे जनहित सर्वांचे', हा उपक्रम शाळांमध्ये दररोज परिपाठाच्या वेळी तसेच ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दरवर्षी होणाऱ्या ध्वजारोहण कार्यक्रमापूर्वी संविधानामधील उद्देशिकेचे सामुहिक वाचन सुरु करण्यात येत आहे. यामुळे जबाबदार सुजाण व सुसंस्कृत नागरिक घडविण्यास मदत होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 
           कोल्हापूर शहर स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी करण्यासाठी महापालिकेच्यावतीने दर रविवारी महास्वच्छता मोहीम यशस्वीपणे राबविण्यात येत आहे. सलग 38 रविवारी  शहरातील विविध रस्ते, बागा, घाट, नाली अशा विविध ठिकाणी महास्वच्छता मोहीम राबविली. या मोहिमेंतर्गत सुरूवातीच्या टप्प्यात जयंतीनाल्याच्या स्वच्छतेवर भर दिला आणि जयंती नाल्याने खऱ्या अर्थाने मोकळा श्वास घेतला असे म्हणावे लागेल. महास्वच्छता मोहिमेस मिळालेला  लोकसहभाग हे महापालिका प्रशासनाचे वेगळेपण म्हणावे लागेल.
Hi-Tech कृषी साधन-संपदा निर्माण होणार
           जिल्ह्यात यावर्षी 7 कोटीचा कृषी यांत्रिकीकरणाचा कार्यक्रम राबविण्यात येत असून   जिल्ह्यात शेतकरी गटांना प्रोत्साहन देण्यासाठी गटशेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उत्पादीत मालावर प्रक्रिया करण्यासाठी  13 कोटींची योजना राबविली जात आहे.  तसेच एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाच्या माध्यमातून हायटेक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी 16  कोटीचा प्रस्ताव शासनास सादर केला आहे.  यामध्ये संरक्षीत शेती, प्रक्रिया उद्योग इ.चा फायदा शेतकऱ्यांना होणार असून एक प्रकारे Hi-Tech कृषी साधन-संपदा निर्माण होणार आहे. 
           जिल्हयात 17436 इतके बचत गट असून महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानअंतर्गत आतापर्यंत 2185 स्वयंसहाय्यता समूहांना फिरता निधी वितरणाचे उद्दिष्ट असून 1105 स्वयंसहाय्यता समूहांना 1 कोटी 65 लाखाचा फिरता निधी वितरीत केला आहे.तसेच पतपुरवठा अंतर्गत 2241 स्वयंसहाय्यता समूहांना 39 कोटी 23 लाखाचे अर्थसहाय्य बँकामार्फत करण्यात आले आहे. शिरोळ तालुक्यातील दत्तवाडच्या मैत्री स्वयंसहाय्यता समूहास राष्ट्रीय नामांकनामध्ये तिसरा क्रमांक मिळाला असून  राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्कारामध्ये विभागात दुसरा क्रमांक मिळाला आहे. ही आपल्या जिल्हयाच्यादृष्टीने गौरवाची बाब आहे.
  खेलो इंडियामध्ये महाराष्ट्र आघाडीवर आणि महाराष्ट्रात कोल्हापूर आघाडीवर आहे. आजपर्यत कुस्ती ही कोल्हापूरची ओळख होती. पण सध्या पोहणे, सायकलिंग,ॲथलेटीक्स, खो-खो अशा वैयक्तिक आणि सांघिक क्रीडा प्रकारात कोल्हापूर अव्वल होत आहे. क्रीडानगरी अशी कोल्हापूरची ओळख ठळक होत आहे.  स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांच्या प्रती तुम्हा आम्हा सर्वांनाच नितांत आदर आहे. जिल्हयातील शहीद जवानांच्या तसेच  स्वातंत्र्य सैनिकांच्या, क्रांतिकारकांच्या प्रती सर्वांनीच उतराई होणे अगत्याचे आहे. आपणा सर्वांच्या सहकार्यातून जिल्ह्याची वैभवशाली आणि गौरवशाली परंपरा कायम ठेवूया, असेही पालकमंत्री म्हणाले.
           
जवानांच्या शानदार संचलनाद्वारे मानवंदना
       ध्वजारोहणानंतर पालकमंत्री श्री. पाटील यांनी संचलनाची पाहणी करुन मानवंदना स्वीकारली.  सशस्त्र पोलीस पथक, सशस्त्र महिला पोलीस पथक,  पुरुष गृह रक्षक पथक, महिला गृह रक्षक पथक, वन रक्षक दल, एनसीसी मुलांचे पथक, एनसीसी मुलींचे पथक, अग्निशामक पथक, स्काऊट बॉईज पथक, मुलींचे स्काऊट गाईड पथक, आरएसपी मुलांचे पथक, आरएसपी मुलींचे पथक, एअर स्कॉड्रन एनसीसी पथक, फायर इंजिनिअरिंग अँड सेफ्टी मॅनेजमेंट पथक, पोलीस बँड पथक, श्वान पथक, वज्र वाहन, फॉरेन्सीक लॅब व फिंगर प्रिंट ब्युरो व्हॅन पथक, सीसीटीव्ही सर्व्हेलन्स व्हॅन, दहशदवाद विरोधी पथक, दंगल नियंत्रण पथक, जिल्हा आपत्ती व्यवस्थापक प्राधिकरण चित्ररथ, बेटी बचाओ बेटी पढाओ चित्ररथ, शिक्षण विभागाचा चित्ररथ, अग्निशामन वाहन, 108 रुग्णवाहिका, व्हाईट आर्मी चित्ररथ, तंटामुक्त अभियान चित्ररथ जवानांच्या शानदार संचलनाद्वारे मानवंदना देण्यात आली.
गौरव समारंभ
          पालकमंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते राष्ट्रपती पदक विजेते पोलीस उप निरीक्षक मधुकर चौगुले, सहायक पोलीस उप निरीक्षक रवींद्र नुल्ले, नक्षलग्रस्त भागामध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबाबत पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, उप अधीक्षक गणेश बिरादार, उप निरीक्षक योगेश पाटील, सहायक पोलीस निरीक्षक दिपक भंडवलकर, उपनिरीक्षक राहूल वाघमारे, रविकांत गच्चे, प्रितमकुमार पुजारी, सोमनाथ कुडवे, रोहन पाटील, किशोर खाडे, विक्रांत चव्हाण, विवेकानंद राळेभात, अभिजीत भोसले, प्रमोद मगर, भागवत मुळीक, अजित पाटील यांना विशेष सेवा पदक प्रदान करुन गौरविण्यात आले.
          क्रीडा क्षेत्रामध्ये विश्व विक्रम केल्याबद्दल डॉ. केदार साळुंखे, राष्ट्रीय युवा पुरस्कार ओंकार नवलीहाळकर, छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार 2017 डॉ. सायरस पुनावाला इंटरनॅशनल स्कूल वडगाव, शालेय व सामाजिक कार्यात साईराज पांडे, जिल्हा स्मार्ट ग्राम पुरस्कार ग्रामपंचायत माणगाव, गुणवंत क्रीडा मार्गदर्शक शिवाजी पाटील, गुणवंत क्रीडा कार्यकर्ता विनय जाधव, गुणवंत खेळाडू सुनील कोनेवाडकर आणि आभा देशपांडे, गुणवंत खेळाडू दिव्यांग कमलाकर कराळे, थेट पुरस्कार सोनल सावंत आणि वैष्णवी सुतार, जिल्हा उद्योग केंद्राकडील लघु उद्योजक जिल्हा पुरस्कार प्रथक संजय डी. माळी, मे. फायर फ्लॉय फायर पंप्स, प्रा.लि., द्वितीय (विभागून) तानाजीराव बापूसाहेब पाटील मे. यशश्री पॉली एक्स्ट्रजन, तानाजी सावर्डेकर मे. यश रेफ्रिजरेशन, जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागामार्फत माझी कन्या भाग्यश्री योजनेच्या लाभार्थी मैथीली सुंदर शिंदे यांना 50 हजार आणि शेजल शंकर कांबळे यांना 25 हजार रुपयाचे मुदत ठेव प्रमाणपत्र देण्यात आले. खेला इंडिया युथ गेम्स मधील 42 खेळाडूंचा सामुहिक सत्कार यावेळी करण्यात आला.
सांस्कृतिक कार्यक्रमांना उपस्थितांकडून दाद
       सांस्कृतिक कार्यक्रमात ल.कृ. जरग विद्या मंदिर, कोल्हापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण मंदिर यांनी देशभक्तीपर गीतावरील समुह नृत्य केले. केंद्रीय प्राथमिक शाळा शिवाजी मंदिर वडणगे यांनी ग्रामीण लेझिम प्रकार सादर केला. शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी बेटी बचाओ- बेटी पढाओ पथनाट्य सादर केले. संजीवन इंग्लिश मेडियम स्कुल रंकाळा यांनी देशभक्तीपर गीत सादर केले. जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागामार्फत उपस्थितीत सुमारे 2 हजार विद्यार्थ्यांनी माणुसकीच्या शत्रू संगे युध्द आमचे सुरु आणि अजिंक्य भारत अजिंक्य जनता ललकारात सारे ही समुह गीते सादर करुन उपस्थितांची वाहवा मिळविली.
          यावेळी पालकमंत्र्यांनी उपस्थित स्वातंत्र्य सैनिकांची भेट घेवून त्यांना गुलाब पुष्प देवून प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या तसेच मान्यवर आणि विद्यार्थी, विद्यार्थींनीचीही भेट घेवून त्यांनाही प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी विविध विभाग प्रमुख, आजी-माजी अधिकारी, पदाधिकारी, पालक, नागरिक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.        
0 0 0 0 0 0

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.