कोल्हापूर, दि. 17 (जिमाका) : महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेच्या माध्यमातून
उदयोन्मुख कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळत आहे. या कलाकारांना पुढे येण्यासाठी
मोठी संधी सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत लाभली आहे, असे प्रतिपादन सांस्कृतिक
राज्यमंत्री राजेंद्र पाटील- यड्रावकर यांनी काल केले.
59 व्या महाराष्ट्र राज्य हौशी संगीत नाट्य
स्पर्धेच्या अंतिम फेरीचे उद्घाटन राज्यमंत्री श्री. यड्रावकर यांच्या हस्ते
इचलकरंजी येथील श्रीमंत नारायणराव घोरपडे नाट्यगृहात झाले. यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी आमदार प्रकाश आवाडे, नगराध्यक्ष ॲड. अलका स्वामी, नाट्य परिषदेचे
इचलकरंजी शाखेचे श्रीकांत फाटक उपस्थित होते.
सुरुवातीला नटराज, पंडित बाळकृष्ण बुवा इचलकरंजीकर
यांची प्रतिमा पुजन आणि दीपप्रज्वलन करुन उद्घाटन करण्यात आले. सांस्कृतिक
राज्यमंत्री श्री. यड्रावकर पुढे म्हणाले, जिल्ह्याच्या ठिकाणी न घेता इचलकरंजी
सारख्या ठिकाणी घेऊन ग्रामीण भागातील कलाकारांना संगीत क्षेत्रात येण्यासाठी वाव
मिळणार आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालयाने ग्रामीण भागातील कलाकारापर्यंत
पोहचण्याचा प्रयत्न केला आहे. सर्व स्पर्धकांचे स्वागत करुन त्यांना शुभेच्छा
दिल्या. सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या सहसंचालक मीनल जोगळेकर यांनी प्रास्ताविक
केले. यावेळी परिक्षक बकुळ पंडित, योजना शिवानंद, मुकुंद मराठे, प्रदिप ओक आणि
सुधीर ठाकूर यांचा राज्यमंत्री श्री. यड्रावकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
शेवटी दिपाली जपे यांनी सर्वांचे आभार मानले.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.