कोल्हापूर, दि. 7 (जिमाका) : पोलीस
दलाच्यावतीने महिला व मुलींसाठी आयोजित केलेल्या आत्मसंरक्षण प्रशिक्षणाबरोबरच
सायबर सुरक्षाविषयक माहिती आणि रस्सीखेच,
पथनाटय, झांज पथक, लेझीम, हाऊस बँड, मर्दानी खेळ, पोवाडा आदी सांस्कृतिक
कार्यक्रमांनी पोलिस संचलन मैदान दणाणून गेले.
जिल्हा
पोलीस दलाच्यावतीने पोलीस उन्नत दिवस (रेझिंग
डे), सायबर सेफ वुमेन आणि सायबर सखी मेळाव्याचे येथील पोलिस संचलन मैदानावर आयोजन
केले होते. या कार्यक्रमाचा शुभारंभ विशेष महानिरीक्षक डॉ. सुहास वारके, महापौर
सुरमंजिरी लाटकर, मधुरीमाराजे छत्रपती आदी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा
पूजनाने करण्यात आला. या कार्यक्रमास पोलीस
अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख, अतिरिक्त पोलीस अधिक्षक तिरूपती काकडे, श्रीनिवास
घाडगे, उद्योजिका अरूंधती महाडिक, माजी नगरसेविका माधुरी नकाते आदी मान्यवर
उपस्थित होते.
रेझिंग
डे , सायबर सेफ वुमेन आणि सायबर सखी
मेळाव्यानिमित्त जीव तुझ्यात गुंतला या लोकप्रिय मालिकेतील राणादाफेम हार्दिक जोशी
आणि अंजलीफेम अक्षया देवधर यांनी भेट देवून या कार्यक्रमात सहभाग घेतला. राणादा
आणि अंजली यांचे आगमन होताच उपस्थित महिला, मुली, विद्यार्थीनींनी उत्स्फूर्तपणे
उभे राहून टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत केले. यावेळी राणादा आणि अंजली यांनी शिटी
वाजवून या उपक्रमाचा शुभारंभ केला. त्यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात
आला.
प्रारंभी
अतिरिक्त पोलीस अधिक्षक तिरूपती काकडे यांनी स्वागत करून या कार्यक्रमाची रूपरेषा
सांगितली. सुरूवातीला महिला आणि मुली विरूध्द पोलीस अधिकारी-कर्मचारी महिला अशी
रस्सीखेच स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये दोन्ही गटाकडून आपापल्या ताकदीनुसार
स्पर्धा जिंकण्याचा प्रयत्नही झाला. पण, पोलीस दलातील महिलांनी ही स्पर्धा जिंकली.
महिला आणि मुलींच्या रस्सीखेच स्पर्धेचे नेतृत्व
महापौर सुरमंजिरी लाटकर, मधुरीमाराजे छत्रपती यांनी केले. तर पोलीस दलाच्या
गटाचे नेतृत्व पोलीस उप अधीक्षक प्रेरणा कट्टे, पद्मा कदम यांनी केले. यानंतर
उपस्थित विद्यार्थींनी व महिलांसाठी सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्नोत्तराचा तास
झाला. सर्वच प्रश्नांची उत्तरे उपस्थित महिला आणि मुलींनी क्षणाचाही विलंब न करता
दिली. विजेत्यांना यावेळी पोलीस दलाच्यावतीने बक्षिसही देण्यात आले.
यावेळी जिल्हा
पोलीस दल व निर्भया पथकाच्यावतीने महिला व मुलींसाठी आत्मसंरक्षण प्रशिक्षण
देण्यात आले. सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश देसाई यांनी सायबर सेफ वुमेन या
मोहिमेंतर्गत सायबर सुरक्षाविषयक माहिती दिली. या कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतलेल्या महिला,मुली,विद्यार्थीनींना
प्रोत्साहनपर बक्षीसे देण्यात आली. तसेच जिल्ह्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम
करणाऱ्या महिलांचा सत्कारही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमानंतर पोलीस परेड मैदान ते धैर्यप्रसाद
चौक या मार्गावर रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये मुलींचे लेझीम पथक, झांज पथक, ढोलपथक इत्यादी सहभागी झाले.
या कार्यक्रमास
पोलीस उपअधीक्षक प्रशांत अमृतकर, अश्विन कुमार, प्रा. नंदिनी साळुंखे यांच्यासह महिला
उद्योजिका, सामाजिक कार्यकर्त्या यांच्यासह अनेक मान्यवर तसेच नगरसेविका, महिला,
विद्यार्थीनी आणि नागरिक उपस्थित होते. यावेळी रणरागिणी पथनाट्य ग्रुपच्या वतीने
पथनाट्य सादर करण्यात आले. तसेच शाहीर रंगराव पाटील यांनी पोवाडा आणि शाहीरीच्या
माध्यमातून बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. झांझपथक, लेझीम, हाऊस बँड
आणि मर्दानी खेळांनी उपस्थितांची मने
जिंकली.
०००००
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.