शुक्रवार, २० मार्च, २०२०

प्रथम मी सुरक्षित, माझ्यामुळे इतर सुरक्षित रविवारचा जनता कर्फ्यू 100 टक्के यशस्वी करा





       कोल्हापूर, दि. 20 (जि.मा.का.) : रविवार दि. 22 मार्च रोजी सकाळी 7 ते रात्री 9 या कालावधीत सर्वांनी आपल्या घरातच राहून कोरोना विषाणूच्या संभाव्य संक्रमणाला पर्यायाने धोक्याला रोखूया. प्रथम मी सुरक्षित, माझ्यामुळे इतर सुरक्षित ही भावना घेवून रविवारचा जनता कर्फ्यू 100 टक्के यशस्वी करुया, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी संयुक्तपणे केले आहे.
       कोरोना विषाणूच्या संक्रमणामुळे संपूर्ण जग चिंताग्रस्त झाले आहे. याचा धोका आपल्या देशालाही निर्माण झाला आहे. कालच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यानी जनतेला याविषयी आवाहन केले आहे. या विषाणूवर कोणतीही लस आज तरी उपलब्ध नाही. परंतु, या रोगाला प्रतिबंध करण्यासाठी एकमेव मार्ग म्हणजे संक्रमण थांबवणे होय. हे संक्रमण थांबवायचे असेल तर प्रधानमंत्र्यांनी रविवारी मांडलेली जनता कर्फ्यू ही संकल्पना 100 टक्के अंमलात आणून ती यशस्वी करणे होय.
            जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पोलीस अधीक्षक आम्ही सामुहिकपणे आवाहन करतो की, जिल्ह्यातील सर्व दुकानदार, सर्व छोटे-मोठे बझार व मॉल्स, शेतकरी, शेत मजूर तसेच ग्रामीण कारागीर, छोटे व्यावसायिक व कारागीर, उद्योजक, शेतमाल विक्रीत सहभागी असणारे सर्व घटक, लघू व कुटीर उद्योजक त्याचप्रमाणे प्रवासी व माल वाहतूक करणारे चालक, मालक व वाहक, शासकीय व निमशासकीय सेवक  (अत्यावश्यक सेवा वगळून) या सर्वांनी समाजाच्या, जिल्ह्याच्या भवितव्यासाठी रविवारी होणाऱ्या जनता कर्फ्यूमध्ये 100 टक्के योगदान द्यावे. या दिवशी अत्यावश्यक सेवा सुरु राहणार असल्याने कोणीही भीती बाळगू नये.
            कोरोना विषाणूचा संसर्ग देशातील कोणाही नागरिकांना होवू नये यासाठी पूर्ण वेळ कार्यरत असणारी अत्यावश्यक सेवा यंत्रणा, आरोग्य यंत्रणा, पोलीस यंत्रणा, स्वच्छता येत्रणा, सार्वजनिक वाहतूक यंत्रणा, प्रशासन व प्रसार माध्यमे यांचे प्रतिनिधी अहोरात्र काम करीत आहेत. या सर्वांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासठी सायंकाळी 5 वाजता सर्व नागरिकांनी आपल्या घराच्या खिडक्या, बाल्कनीमध्ये, दरवाज्यासमोर, छतावर किंवा मोकळ्या जागेत येवून 5 मिनिटांसाठी मोठ्याने टाळ्या वाजवाव्यात. यातून आपण राष्ट्र म्हणून सर्व नागरिक एकत्र येवून कोरोनाच्या महामारी आजारा विरुध्द युध्द पुकारून त्यात यशस्वी होण्याचा महानिर्धार करण्याचा आहे.
 00 0 0 0 0

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.