कोल्हापूर,
दि. 21 (जिमाका)- परदेशातून प्रवास करुन आलेल्या सात
प्रवाशांपैकी 5 जणांना शेंडा पार्कमधील केंद्रात तर दोघाजणांना हॉटेल की मधील
संस्थात्मक अलगीकरण केंद्रात आज ठेवण्यात आले. या ठिकाणी वैद्यकीय तसेच पोलीस पथक
ठेवण्यात आले असल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी दिली.
पालकमंत्री सतेज पाटील यांनी
दिलेल्या सूचनेनुसार आजपासून परदेश प्रवास करुन येणाऱ्या प्रवाशांची तपासणी करुन
संस्थात्मक अलगीकरण केंद्रात ठेवण्यास सुरुवात करण्यात आली. आमदार चंद्रकांत जाधव,
आयुक्त डॉ. कलशेट्टी, पोलीस उपअधीक्षक प्रेरणा कट्टे आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप
पाटील आदींनी आज शेंडा पार्क येथील आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र, हॉटेल
की आणि अंडी उबवणी केंद्र
येथील सुविधांची पाहणी केली. अलगीकरण केंद्रासाठी काही हॉटेल चालक योग्य भावात
स्वतःहून पुढे आले आहेत. अशा ठिकाणी प्रशासनामार्फत पोलीस आणि वैद्यकीय पथके
ठेवण्यात आली आहेत.
परदेश प्रवास करुन आलेल्या
प्रवाशांना त्यांच्या सोयीनुसार संस्थात्मक अलगीकरण केंद्रात ठेवण्यात आले आहे, अशी माहिती डॉ.
कलशेट्टी यांनी दिली. पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनीही या केंद्रांना भेट
देवून तेथील सुरक्षा व्यवस्थेची पाहणी केली.
स्वतः आयुक्तांनीच मैदानावर उतरुन केले आवाहन
शहरातील सासने मैदान, मेरी वेदर
मैदान या ठिकाणी जावून आयुक्त डॉ. कलशेट्टी यांनी खेळणाऱ्या तरुणांना आवाहन केले.
त्याला प्रतिसाद देत गर्दी करणार नसल्याचे यावेळी तरुणांनी सांगितले. रंकाळा परिसर
आणि शहरातून फेरी मारत देखील आयुक्तांनी फेरीवाले, व्यापारी यांनाही त्यांनी आवाहन
केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.