रविवार, २२ मार्च, २०२०

अत्यावश्यक सेवा सुरळीत; नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे -सतेज पाटील




कोल्हापूर, दि. 22 (जिमाका)- कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पूर्वतयारी म्हणून जिल्ह्यात जमावबंदी आदेश प्रशासनामार्फत लागू करण्यात येत आहेत. यामध्ये अत्यावश्यक सेवा सुरळीत राहणार असून नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज केले.
            मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण राज्यातच 144 कलम लागू केले आहे. 5 पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येवू नयेत. असे सांगून पालकमंत्री म्हणाले, वैद्यकीय सुविधा, दूध भाजीपाला, किराणा, इंधन अशा जीवनावश्यक सेवा सुरळीत राहणार आहेत. याबाबत प्रशासनाकडून सविस्तर आदेश काढले जातील. यामध्ये अत्यावश्यक सेवांचा उल्लेख असेल. आज ज्याप्रमाणे जनतेने प्रतिसाद दिला त्याप्रमाणे  इथून पुढेही सहकार्य करावे. अत्यंत गरजेच्यावेळीच घरातून बाहेर पडावे. आपली तसेच इतरांची सुरक्षा घ्यावी, असेही ते म्हणाले.
व्हीसीद्वारे पालकमंत्र्यांनी घेतला आढावा
            पालकमंत्री श्री. पाटील यांनी आज सायंकाळी सर्व प्रांताधिकारी, तहसीलदार, नगरपालिका मुख्याधिकारी, आरोग्य अधिकारी तसेच महापालिका अधिकारी यांची व्हीडीओ कॉन्फरन्सींगद्वारे आढावा बैठक घेतली. ते म्हणाले, ग्रामीण भागातील जनतेला अडचण येणार नाही, यासाठी नियोजन करा. ज्यांना होम क्वारंटाईन सांगितले आहे, ते काटेकोरपणे होते का त्याची खात्री करा. स्थानिक रुग्णालयांमध्ये संस्थात्मक अलगीकरण केंद्र करण्याच्यादृष्टीने आतापासून तयारी करा, अशा सूचना करतानाच, सर्वांनी आपल्या तब्येतीचीही काळजी घ्यावी, असेही ते शेवटी म्हणाले.
            यानंतर त्यांनी महापालिका अधिकाऱ्यांशी संवाद साधून सूचना केल्या ते म्हणाले, केएमटी अत्यावश्यक सेवेसाठी सुरु करुन तसे फलक वाहनाच्या दोन्ही बाजूस लावावेत. स्वच्छता आणि पाणी पुरवठा सुरळीत राहील याची दक्षता घ्यावी. नागरिकांना भाजीपाला मिळण्यासाठी या कालावधित त्याचे नियोजन करा. सर्वांना भाजीपाला मिळेल याची काळजी घ्या. त्या त्या प्रभागात रिक्षा फिरवून नागरिकांना सूचना कराव्यात. आरोग्य सेवा सुरळीत ठेवून आवश्यक त्या उपाय योजना करा, असेही ते म्हणाले.
     यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, जिल्हा आपत्ती कक्षाचे  नियंत्रक व समन्वयक उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे, प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. स्टिव्हन अल्वारीस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी सी केम्पीपाटील आदी उपस्थित होते.

                                   तीन दिवस पालकमंत्री जिल्हाधिकारी कार्यालयात
गेल्या तीन दिवसांपासून पालकमंत्री सतेज पाटील हे जिल्हाधिकारी कक्षात बसून कोरोनाबाबत नियोजन आणि उपाय योजनांबाबत आढावा घेत आहेत. होम क्वारंटाईन असणाऱ्या प्रवाशांसोबत स्वतः संपर्क साधून माहिती घेतली. इचलकरंजी येथील आयजीएम रुग्णालयाला भेट देवून तेथील व्यवस्था पाहिली. हातकणंगले येथील वस्तीगृहाची संस्थात्मक अलगीकरण केंद्रासाठी  पाहणी केली. आजही सकाळपासून ते स्वतः रात्री उशिरापर्यंत थांबून सर्व परिस्थितीवर स्वतः लक्ष देवून आहेत.

000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.