कोल्हापूर, दि. 17 (जिमाका) : कोरोना व्हायरस व कोंबड्या यांचा काहीही संबंध
नसल्याने कोंबड्यांचे मांस खाण्यास पूर्णपणे सुरक्षित असल्याची माहिती जिल्हा
परिषदेचे पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विनोद पवार यांनी दिली.
कोरोना
व्हायरस अफवेमुळे पोल्ट्री व्यवसाय व शेतकरी अडचणीत आले आहेत. कोंबड्यांचे मांस
खाल्ल्याने कोरोना व्हायरसची लागण होत असल्याच्या अफवा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर
पसरत आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण
भागात सध्या कोंबड्याची व अंडी विक्री होत नाही. मात्र कोरोना व्हायरस व
कोंबड्या यांचा काहीही संबंध नसल्याने कोंबड्यांचे मांस सुरक्षित असल्याचा दावा
जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी केला आहे.
सध्या
जगात केवळ कोरोना व्हायरसची चर्चा सुरू आहे. व्हायरसने बाधित झालेल्यांची संख्या
वाढत असून यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागात शेतकरी आणि कुक्कुटपक्षी पालकांमध्ये
घबराटीचे वातावरण आहे. गेल्या काही दिवसात कोंबड्याची व अंड्याची विक्री कमी झाली
आहे. सोशल मीडियावर कोरोनाबाबत चुकीची माहिती प्रसारित करण्यात येत आहे, यामुळे
कोंबड्यांचे मांस खाल्ल्यास कोरोनाचा धोका असल्याच्या चर्चेच्या अफवेमुळे लोकांनी
मांस खाणे बंद केले आहे. या अफवांमुळे पोल्ट्री व्यवसायाची संबंधित असलेल्या मका
उत्पादन, सोयाबीन उत्पादन तसेच पोल्ट्रीवर अधारित असलेला कामगार वर्ग यांचा रोजगार
बंद पडला आहे.
पशुसंवर्धन
विभागामार्फत कोरोना विषाणूबाबत जनजागृती करण्यात पुढीलप्रमाणे जनजागृती करण्यात
येत आहे. या विषाणूचा प्रसार कुक्कुट पक्ष्यांचे मांस अंडी किंवा मासे
यांच्यामार्फत होत नाही. मांस, अंडी व मासे शिजवून बिनधास्त खा आणि तंदुरूस्त
राहा. कुक्कुट पक्ष्यांचे मांस, अंडी व मासे यांचे सेवन थांबविल्यास प्रथिनांची
कमतरता जाणवू शकते. समाज माध्यमे व इतर प्रसिध्दी
माध्यमातून प्रसारित होणाऱ्या अफवा व अकारण भीती पसरवणाऱ्या बातम्यांपासून
सावध रहा.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.