बुधवार, १८ मार्च, २०२०

नेपाळहून आलेल्या प्रवाशांबाबत पालकमंत्र्यांनी घेतली माहिती स्वयंशिस्तीने स्वत:हून घरीच स्थानबध्द व्हावे-पालकमंत्री सतेज पाटील




          कोल्हापूर, दि. 18 (जि.मा.का.): येथील सीपीआरमध्ये तपासणीसाठी आणलेल्या  नेपाळहून आलेल्या  प्रवाशांबाबत पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून माहिती घेतली.  जिल्ह्यामध्ये परदेशाहून तसेच अन्य ठिकाणाहून येणाऱ्या नागरिकांनी स्वत:हून आपल्या घरीच 14 दिवस स्थानबध्द व्हावे. स्वत:ची आणि इतरांची कोरोनापासून काळजी घ्यावी, असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले.
        नेपाळहून आलेल्या 43 प्रवाशांना तपासणीसाठी सीपीआरमध्ये आज आणण्यात आले. याबाबत पालकमंत्री श्री. पाटील यांनी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याशी संपर्क साधून माहिती घेतली. त्याचबरोबर कोरोना प्रतिबंधासाठी करण्यात येत असणाऱ्या उपाय योजनांचा आढावाही त्यांनी यावेळी घेतला.
            मेडिकल असोसिएशन, खासगी रुग्णालये यांचे सहकार्य घ्यावे. विलगीकरण तसेच अलगीकरण कक्षाची निर्मिती आणि तेथील उपाय योजनांची योग्य ती तयारी  ठेवावी. लोकांमध्ये जनजागृती होण्याच्या दृष्टीने भर देण्याबाबतही त्यांनी सूचना केल्या. कोरोनाच्या प्रतिबंधासाठी महापालिका, जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषदेच्यामार्फत योग्य ती खबरदारी घेवून, उपाय योजना करण्यात येत आहे. कोणत्याही परिस्थितीत नागरिकांनी घाबरुन जावू नये.  प्रथम स्वत:ची काळजी घ्यावी. आपल्यामुळे इतरांना त्रास होणार नाही याचीही काळजी घ्यावी. अनावश्यक ठिकाणी जाणे टाळावे, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले आहे.
सिंगापूर येथील विद्यार्थ्यांना भारतात आणण्यासाठी पालकमंत्र्यांचे प्रयत्न
        सिंगापूर येथे काही महाराष्ट्रातील विद्यार्थी अडकले आहेत. हे समजल्यानंतर पालकमंत्री श्री. पाटील यांनी त्यांच्याशी संपर्क साधला. लवकरच त्यांना मायदेशी आणले जाईल, असा दिलासाही त्यांनी यावेळी दिला.

  
00000


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.