शुक्रवार, ६ मार्च, २०२०

महिला पोलीस आणि कुटुंबियांसाठी सेवा रूग्णालयात रविवारी आरोग्य शिबीर



       कोल्हापूर, दि. 6 (जि.मा.का.) : जागतिक महिला दिनानिमित्त  महिला पोलीस व त्यांच्या कुटूंबियातील महिलांसाठी कसबा बावड्यातील सेवा रूग्णालयात विशेष आरोग्य शिबीर होणार आहे. सकाळी 8 ते दुपारी 1 या कालावधीत हे शिबीर होणार असल्याची माहिती सेवा रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. उमेश कदम यांनी दिली.
          अखिल भारतीय स्त्रीरोग तज्ञ संघटना संलग्नीत कोल्हापूर स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्र संघटना, जिल्हा पोलीस अधीक्षक व सेवा रूग्णालय यांच्यामार्फत हे शिबीर आयोजित करण्यात येत आहे. यामध्ये गर्भाशय मुखाचा कर्करोग, स्तनाचा कर्करोग व मुखाचा कर्करोग या बाबतीत प्राथमिक तपासण्या करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर आलेल्या प्रत्येक रूग्णाचे रक्तशर्करा, हिमोग्लोबीनचे प्रमाण, रक्तदाब यांची तपासणी करण्यात येणार आहे.
          गरजूंनी या शिबीराचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी.सी.केम्पीपाटील, स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्र संघटनेच्या अध्यक्षा डॉ. मंजुळा पिशवीकर, सचिव डॉ. अनघा कुलकर्णी, डॉ. सुप्रिया देशमुख, डॉ. हर्षला वेदक व डॉ. उमेश कदम यांनी केले आहे.
00000


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.