गुरुवार, १२ मार्च, २०२०

कोरोनाची भीती नको काळजी मात्र आवश्यक प्रत्येकाने आपल्या क्षेत्रात जबाबदारीने काम करा -जिल्हाधिकारी दौलत देसाई -जिल्हाधिकारी दौलत देसाई







       कोल्हापूर, दि. 12 (जि.मा.का.) : कोरोनाची भीती बाळगण्याची गरज नाही. मात्र आवश्यक ती काळजी घेतली पाहिजे. स्थानिक स्वराज्य संस्थांनी मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी. प्रत्येकानेच आपल्या क्षेत्रात जबाबदारीने काम करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केले.
       कोरोना संबंधातील पूर्वतयारी आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना तसेच प्रतिसाद याबाबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, आपत्ती व्यवस्थापन समिती आणि सर्व स्थानिक स्वराज्य संस्था यांची तातडीची बैठक शासकीय विश्रामगृहातील राजर्षी छत्रपती शाहू सभागृहात आज घेण्यात आली. या बैठकीला महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख,  मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी.सी. केम्पीपाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे, वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये उपस्थित होत्या.
          जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांनी सर्वांचे स्वागत करून संगणकीय सादरीकरण केले. जिल्हाधिकारी श्री. देसाई यावेळी म्हणाले, आपण जागरूक व्हायचे आहे आणि शेजाऱ्यालाही जागरूक करायचे आहे. ग्रामपंचायत, पंचायत समिती, नगरपालिका आदी स्थानिक स्वराज्य संस्थांनी गावातील प्रमुख चौकांमध्ये कोरोनाबाबत जनजागृती करणारे फलक तात्काळ लावावेत. यात्रा, जत्रा, ऊरूस, उत्सव अशा गर्दीच्या ठिकाणी जाण्याविषयी स्वत:वरच बंधन घालावे. सध्या स्वयंशिस्तीला प्राधान्य द्यावे. मी आणि माझे कुटुंब, शाळांमधील विद्यार्थी, महाविद्यालये, सार्वजनिक ठिकाणी आणि कामाच्या ठिकाणी अशा पाच स्तरावर स्वच्छता विषयी तसेच कोरोनाविषयी जनजागृती मोठ्या प्रमाणात करावी.
          स्वत:हून तपासणी करावी. त्याचबरोबर शंका आल्यास उपचारासाठी तपासणीसाठी प्रवृत्त करावे, लपवून ठेवू नये. प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थांनी आपल्या स्तरावर 10 ते 15 खाटांची विलगीकरण आणि अलगीकरण कक्षाची व्यवस्था करावी. वैद्यकीय व्यावसायिकांनी येणाऱ्या रूग्णांची लक्षणे तपासून हिस्ट्रीची नोंद घ्यावी आणि संबंधित प्रशासकीय यंत्रणेला तात्काळ कळवावे. कोरोनाची भीती अजिबात बाळगू नये. मात्र आवश्यक ती खबरदारी जरूर घ्यावी, असेही ते म्हणाले.
आरोग्यदूत होण्याची गरज-डॉ. कलशेट्टी
महापालिका आयुक्त डॉ. कलशेट्टी म्हणाले, प्रत्येकाने प्रथम आरोग्यदूत होण्याची गरज आहे. गर्दीची ठिकाणं कशी कमी करता येतील त्यासाठी प्रयत्न करावा. भीती बाळगण्याची गरज नाही. गर्दी टाळणं गरजेचं आहे. मोठ्या प्रमाणात जाणीव जागृती करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी आरोग्यदूत बनून काम करा.

अफवा पसरवणाऱ्यावर कारवाई-डॉ. देशमुख
पोलीस अधीक्षक डॉ. देशमुख यावेळी म्हणाले, कोरोनाबाबत प्रात्यक्षिक करण आवश्यक आहे. प्रत्येक ताप आणि असणारा खोकला हा कोरोना नसतो त्यामुळे त्याची भीती ठेवू नये. मात्र माहिती लपवू नये. स्वत:हून पुढे येवून तपासणी करावी. स्वच्छ रूमाल, स्कार्फ जरी बांधला तरी चालू शकतो. गरज नसेल तर बाहेर पडू नये. प्रत्येकाने स्वत:वर बंधन घालून घ्यावे. निर्जंतुकीकरण द्रावणे, त्याचबरोबर साबणाने स्वच्छ हात धुवावेत. सोशल माध्यमांवर प्रसिध्द वृत्त वाहिन्यांच्या नावांचा वापर करून तसेच स्क्रीन शॉटचा वापर करून कोरोनाविषयी अफवा पसरवण्यात येत आहेत. यावर सायबर सेलच्या माध्यमातून लक्ष ठेवण्यात येत आहे. अशा अफवा पसरवणाऱ्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल याची नोंद घ्यावी, असा इशाराही डॉ. देशमुख यांनी यावेळी दिला.
         
भारतीय परंपरा जपावी-जिल्हाधिकारी
बाहेरून घरी आल्यावर हातपाय धुण्याची भारतीय परंपरा आहे. त्याचबरोबर जेवणापूर्वी स्वच्छ हात धुणे ही परंपरा देखील आहे. हस्तांदोलन करण्यापेक्षा हात जोडून नमस्कार करणे हे आपल्या परंपरेने दिले आहे. सध्या याच परंपरेचा वापर प्रत्येकाने कटाक्षाने करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी यावेळी केले.

          आजच्या या बैठकीला जिल्ह्यातील प्रांताधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी नगरपालिकांचे नगराध्यक्ष, मुख्‍याधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी तसेच उद्योग, विविध बाजार, चित्रपटगृहे यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यांनीही यावेळी विविध सूचना मांडल्या.
000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.