कोल्हापूर, दि. 9 (जिमाका) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व राजर्षी
छत्रपती शाहू महाराज यांच्या माणगाव येथील परिषदेला 100 वर्षे पूर्ण होत आहेत. या
निमित्तानं सामाजिक न्याय विभागामार्फत बांधण्यात आलेल्या स्मारकाचा लोकार्पण
सोहळा 21 मार्च रोजी होणार आहे. माणगाव मधील तरुणांनी आपला परिसर स्वच्छ
ठेवण्यासाठी स्वच्छता मोहीम हाती घ्यावी, असे आवाहन पालकमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील यांनी आज
केले.
हातकणंगले तालुक्यातील माणगाव येथे होणाऱ्या
लोकार्पण सोहळ्याच्या नियोजनाबाबत पालकमंत्री श्री. पाटील यांनी भेट देवून पाहणी
केली. यावेळी खासदार धैर्यशील माने, आमदार
प्रकाश आवाडे, जिल्हाधिकारी दौलत देसाई, माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर, माजी
खासदार राजू शेट्टी, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल आदी उपस्थित होते.
मुख्य
सोहळ्याच्या ठिकाणी भेट देवून तेथील तयारीची पाहणी केली. यानंतर स्मारकाला भेट
देवून तेथील कामकाजाची पाहणी केली. यानंतर तक्याला भेट देवून भारतरत्न डॉ.
बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. याठिकाणी मार्गदर्शन
करताना पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, येणाऱ्या प्रत्येकाच्या स्वागतासाठी परिसर
स्वच्छ राहील याची खबरदारी सर्वांनी घ्यावी. स्वच्छ, सुंदर परिसरामुळे माणगाव माझं
स्वागत करतंय अशी भावना येणाऱ्या प्रत्येकाची झाली पाहिजे. हा लोकोत्सव असून
ग्रामस्थांनी आपली जबाबदारी या सोहळ्यासाठी निश्चित करावी. शासनाकडून प्रलंबित
विषय मार्गी लावून दुसऱ्या टप्याच्या विकासासाठी निधी आणला जाईल, असे
आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
खासदार श्री. माने यावेळी म्हणाले, माणगाव मधील
सोहळा हा राज्य सोहळा होत आहे. जगभरातून, देशातून या सोहळ्यासाठी अनुयायी यावेत.
राष्ट्रीय सणा सारख्या हा सोहळा सर्वांनी केला पाहिजे. कार्यक्रम निट नेटका व्हावा
यासाठी पालकमंत्री स्वत: बारकाईने लक्ष देत आहेत. यामध्ये आपल्या सर्वांचे योगदान
असले पाहिजे.
जिल्हाधिकारी श्री. देसाई यावेळी म्हणाले, मुख्य
सोहळ्यासाठी जागा देणाऱ्या ग्रामस्थांचे मी आभार मानतो. या सोहळ्यासाठी प्रत्येक
घर रंगवून सज्ज झालं पाहिजे. परिसर स्वच्छ ठेवून माणगाव स्वागताला सज्ज ठेवा. आमदार श्री. आवाडे यांनीही यावेळी मार्गदर्शन
केले.
सुरुवातीला सुंदर कांबळे यांनी सर्वांचे स्वागत
केले. शेवटी झाकीर भालदार यांनी सर्वांचे आभार मानले. यावेळी प्रांताधिकारी डॉ. विकास खरात, तहसिलदार
प्रदीप उबाळे, समाज कल्याणचे सहायक आयुक्त बाळासाहेब कामत, समाज कल्याण सभापती
प्रतीभा सासने, सरपंच ज्योती कांबळे, वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक संजय पवार, समाज
कल्याण अधिकारी दिपक घाटे, वास्तु रचनाकार अमरजा निंबाळकर आदीसह ग्रामस्थ,
पदाधिकारी, अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 0 0 0 0 0 0
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.