बुधवार, १८ मार्च, २०२०

क्षयरोग नियंत्रणासाठी क्षयरूग्णांना इन्फेक्शन कंट्रोल किट द्यावे - जिल्हाधिकारी दौलत देसाई




            कोल्हापूर, दि. 18 (जि.मा.का.): क्षयरोग नियंत्रणासाठी जिल्ह्यातील क्षयरूग्णांना इन्फेक्शन कंट्रोल किट उपलब्ध करून देण्याची सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केली.
            जिल्हास्तरीय टिबी फोरमची बैठक जिल्हाधिकारी दौलत देसाई  यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली, त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. उषा कुंभार, टीबी व चेस्ट विभाग प्रमुख डॉ.अनिता सैबन्नावर, कार्यक्रम अधिकारी दीपा शिपुरकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. मानसी कदम, डॉ. विनायक भोई, सुधर्म वाझे आदी उपस्थित होते.
        जिल्ह्यात क्षयरोग नियंत्रणाचा कार्यक्रम अधिक प्रभावीपणे राबवून जिल्हा क्षयमुक्त करण्याचा संकल्प असल्याचे सांगून जिल्हाधिकारी दौलत देसाई म्हणाले, क्षयरोगाचा प्रसार रोखण्याच्या दृष्टिने आवश्यक उपाययोजना आरोग्य विभागाने हाती घेतल्या आहेत. जिल्ह्यात सध्या 2982 क्षयरूग्ण असून त्या रूग्णांना इन्फेक्शन कंट्रोल किट तसेच न्यूट्रिशनल सपोर्ट या बाबी लोकसहभागातून उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्याची सूचनाही त्यांनी केली. क्षयरूग्णांसाठी सर्व ग्रामीण रूग्णालयात इसीजी मशिन त्वरित उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी केल्या.
        जिल्हयात राष्ट्रीय क्षयरोग दूरिकरण कार्यक्रम अधिक गतीने राबविण्याची सूचना करून  जिल्हाधिकारी दौलत देसाई म्हणाले, आवश्यक औषधोपचाराबरोबरच जिल्हाभर क्षयरोग निर्मूलनाचा  जनजागृती व प्रबोधनाचा कार्यक्रम घेण्याचे नियोजन करावे. याबरोबरच खाजगी वैद्यकीय व्यावसायिक शासनाकडील मोफत टिबी वरील औषध देतात त्यांना प्रोत्साहीत करावे व  तर खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांनीही त्याचे अनुपालन करावे. टिबी रुग्णांना औषध सुरु करतेवेळी त्याबाबत सविस्तर माहिती देण्यात यावी जेणेकरून त्यांचे औषधे मध्येच बंद करण्याचे प्रमाण कमी होईल.
        जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.उषा जी.कुंभार यांनी फोरमच्या कामकाजाची माहिती दिली. त्या पुढे म्हणाल्या, टिबी फोरमचा मुख्य उद्देश कार्यक्रमामध्ये सुलभता आणणे व समाज, रुग्ण, आरोग्य प्रणाली व नागरी व्यवस्था यांच्यामध्ये समन्वयक आणणे आहे. टीबी फोरम मध्ये विविध समाजघटक व विविध क्षेत्रामधील सदस्यांचा सहभाग आहे.  भारत सरकारने 2025 पर्यंत देश क्षयमुक्त करणेचे धोरण निश्चित केले असून त्या दृष्टीने  जिल्हास्तरीय टिबी फोरममार्फत कार्यवाही केली जाईल. यावेळी टीबी फोरमचे सर्व सदस्य तसेच सर्व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.