तहसीलदार आणि बीडीओ यांनी अंमलबजावणीची
खात्री करावी
- हसन मुश्रीफ
कोल्हापूर, दि. 24 (जि.मा.का.) :
तहसीलदार व गटविकास अधिकारी यांनी गावांना भेटी देवून लागू करण्यात आलेल्या
आदेशाची अंमलबजावणी होते की नाही याची खात्री करावी, अशी सूचना ग्रामविकास मंत्री
हसन मुश्रीफ यांनी दिली. खासगी रुग्णालये, उपलब्ध असणारी व्हेंटिलेटर्स तसेच खासगी
डॉक्टर याबाबत नियोजन करावे, अशी सूचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली.
जिल्हाधिकारी
कार्यालयातील राजर्षी छत्रपती शाहू सभागृहात व्हीडीओ कॉन्फरन्सींगव्दारे
तालुकानिहाय सविस्तर आढावा घेतला. यावेळी खासदार संजय मंडलिक, जिल्हाधिकारी दौलत
देसाई, महापालिका आयुक्त डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख,
मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे, आपत्ती
व्यवस्थापन प्राधिकरणाचे नियंत्रक व समन्वयक उप जिल्हाधिकारी संजय शिंदे, प्रादेशिक
परिवहन अधिकारी डॉ. स्टिव्हन अल्वारिस, प्रांताधिकारी वैभव नावडकर आदी उपस्थित
होते.
ग्रामविकास मंत्री श्री. मुश्रीफ
म्हणाले, गावामध्ये आलेल्या ज्या प्रवाशांना होम क्वारंटाईन सांगितले आहे त्यांची
खात्री करा. ज्या ठिकाणी गावामध्ये येण्यासाठीची एन्ट्री पॉइंट सुरु आहेत ते
थांबवा. नगरपालिकांनी दररोज स्वच्छता ठेवावी. त्यासाठी गावामध्ये फवारणी करावी. सोडियम
हायपोक्लोराईड अथवा टीसीएल पावडरचा वापर करावा. तहसिलदार व गट विकास अधिकारी यांनी
गावामध्ये फिरुन शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी होत असल्याबाबत खात्री करावी, असे सांगून
गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या.
पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, गावात
स्वच्छता राहील, स्वच्छ व नियमित पाणी पुरवठा होईल याची दक्षता घ्यावी. परदेशातून
आलेले त्याचबरोबरच मुंबई, पुणे येथून आलेल्या प्रवाशांचे मॅपिंग करावे.
प्रत्येकाने गाववार नियोजन करावे. यापूर्वी देण्यात आलेल्या सूचनेनुसार तयारी
ठेवावी. खासगी रुग्णालयांमध्ये तयारी ठेवावी. उपलब्ध होणारी व्हेंटीलेटर्स एकत्र
शिफ्ट करता येतील का त्या दृष्टिने तयारी ठेवावी. स्वत:ची काळजी घेऊन योग्य नियोजन
करावे. पोलिसांच्या मदतीला गृह रक्षक दल दिले जाईल, त्यामुळे मनुष्यबळाची कमतरता
भासणार नाही, असे सांगून त्यांनी
गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या.
ग्राम समिती, प्रभाग समितीच्या
माध्यमातून प्रभावी नियोजन करावे- जिल्हाधिकारी
जिल्हाधिकारी दौलत
देसाई यांनी सुरुवातीला सविस्तर सूचना केल्या. ते म्हणाले, गामीण भागात ग्राम
समित्या आणि शहरी भागात प्रभाग समित्या स्थापन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
त्याप्रमाणे प्रत्येक सदस्यांनी कामे वाटून जबाबदारी द्यावी. गावामध्ये नोंदवही
ठेवून बाहेरुन आलेल्या प्रवाशांची माहिती
तसेच त्यांची दररोज होत असणाऱ्या तपासणीची
माहिती या नोंदवहीत ठेवावी. इत्यंभूत माहिती ठेवावी. त्याबाबतचा अहवाल पाठवावा.
ग्राम समितीने, प्रभाग समितीने गावांमधून बाहेर जाणाऱ्या तसेच बाहेरुन गावात
येणाऱ्या व्यक्तींवर नियंत्रण ठेवावे. अत्यावश्यक सेवा-सुविधा सुरळीत ठेवण्यासाठी
त्यांना पास द्यावेत. होम क्वारंटाईन असणाऱ्या प्रवाशांच्या कुटूंबियांची काळजी
घेतली पाहिजे. त्यांचीही तपासणी आवश्यक आहे.
·
परदेशातून आलेल्या
कांही व्यक्ती गावात आल्या असतील तर त्यांना सक्तीने सी.पी.आर. , उप जिल्हा
रुग्णालय गडहिंग्लज, आय.जी.एम. इचलकरंजी येथे तपासणीसाठी पाठवावे.
·
तपासणी झाल्यावर त्यांच्याबाबतीत
होम क्वारंटाईन किंवा संस्थात्मक क्वारंटाईन किंवा रुग्णालयात विलगीकरण करावयाचे
याचा निर्णय तेथे घेतला जाईल.
·
पुणे, मुंबई व राज्यातील इतर ठिकाणाहून गावात
किंवा शहरात आलेल्या व्यक्तींची स्थानिकरित्या ग्रामसमितीने प्राथमिक आरोग्य
केंद्र किंवा खासगी रुग्णालयात तपासणी करणे बंधनकारक करावे.
·
सर्दी खोकला, डोके
दुखणे, ताप, घसा दुखणे इत्यादी लक्षणे आढळल्यास अशा व्यक्तीस सक्तीने सी.पी.आर. ,
उप जिल्हा रुग्णालय गडहिंग्लज, आय.जी.एम. इचलकरंजी येथे संदर्भीत करावे.
·
अशा व्यक्तींचे
क्वारंटाईन किंवा विलगीकरणाबाबत तेथे निर्णय घेतला जाईल. परंतु स्थानिक तपासणीत
व्यक्तीची तब्येत ठणठणीत आहे व कोणताही त्रास नाही त्यांना ग्राम किंवा प्रभाग
समितीने पूर्ण खबरदारी पाळून होम क्वारंटाईन करण्यापूर्वी एक टक्का सोडियम
हायपोक्लोराईड द्रावणात निर्जंतुकीकरण केलेला शिक्का व हात साबणाने स्वच्छ
धुतल्यानंतर शिक्के मारण्याची कार्यवाही करण्याची आहे.
·
अशा सर्व होम
क्वारंटाईनचे शिक्के मारलेल्या व्यक्ती घरातच किंवा योग्य ठिकाणी राहत आहेत का
याबाबत समितीने कडक निगराणी ठेवायाची आहे.
एक टक्का सोडियम हायपोक्लोराईडने दररोज
सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता करावी.
गावातील मेडिकल दुकाने व खासगी दावाखाने सुरु राहतील याची काळजी घ्या.
कुणाचीही हयगय करु नका. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा. अनावश्यक
वाहनांची गर्दी टाळण्यासाठी पेट्रोल, डिझेल याचे रेशनिंग करा. होम क्वारंटाईनसाठी
ज्या इमारती शोधल्या आहेत तिथे सर्व सुविधा उपलब्ध करा. त्याचबरोबरच त्याच्या
जबाबदारीसाठी अधिकारी नियुक्त करा. जे कारखाने सुरु आहेत त्यांच्या कामागारांच्या
सुरक्षितेची हमी त्या कारखान्यांवर सोपवावी, असे सांगून जिल्हाधिकाऱ्यांनीही
गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.