शुक्रवार, १३ मार्च, २०२०

कोरोना प्रतिबंधक आराखडा तात्काळ करा उपाययोजना युध्दपातळीवर हाती घ्या - पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर जिल्ह्यात विलगीकरण व अलगीकरण कक्ष सज्ज - जिल्हाधिकारी






       कोल्हापूर, दि. 13 (जि.मा.का.) :  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक आराखडा तात्काळ तयार करुन त्यानुसार आवश्यक उपाययोजना युध्दपातळीवर हाती घ्या, असे निर्देश पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांना व्हिसीद्वारे दिले.
       कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागामार्फत घेण्यात आलेली दक्षता आणि करण्यात आलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे कोल्हापूर जिल्ह्याचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके, महापालिका आयुक्त डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे, आरोग्य उपसंचालक डॉ. हेमंतकुमार बोरसे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे आदीजन उपस्थित होते.
          जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक सूचनेनुसार कोरोना प्रतिबंधक आराखडा तयार करताना सर्व बारीकसारीक बाबींचा समावेश करावा, अशी सूचना करुन विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर म्हणाले, यामध्ये विलगीकरण कक्ष तसेच अलगीकरण कक्ष, आवश्यक वैद्यकीय साधणे, नियंत्रण कक्ष याबरोबरच प्रबोधन आणि जनजागृतीचा समावेश करावा. जिल्हाधिकाऱ्यांसह सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अधिक दक्ष आणि सजग रहावे, अशी सूचनाही त्यांनी केली.
          कोरोनाची भीती बाळगण्याची गरज नाही मात्र आवश्यक ती खबरदारी घेतली पाहिजे, असे सांगून विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर म्हणाले, कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांसाठी गावागावात आणि वॉर्डा-वॉर्डामधून प्रभावी प्रबोधन आणि जनजागृतीचे कार्यक्रम राबवावे. यामध्ये प्रामुख्याने व्हिडीओ क्लिप, होर्डींग्ज, पोस्टर्स, हॅडबील यासह सर्व प्रसारमाध्यमांबरोबरच समाज माध्यमामधूनही जनजागृती करावी.
जिल्ह्यात विलगीकरण व अलगीकरण कक्ष सज्ज - जिल्हाधिकारी
कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय व आरोग्य यंत्रणा अधिक सतर्क करण्यात आल्याचे सांगून जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी यावेळी सांगितले की, 15 फेब्रुवारी पासून कोरोना बाधीत देशातून कोल्हापूर जिल्ह्यात आलेल्या 50 पर्यटक/ नागरिकांची माहिती घेऊन स्क्रीनींग करुन आवश्यक ती खबरदारी घेण्यात आलेली आहे. 2 जणांचे सॅम्पल पाठविण्यात आले होते ते निगेटीव्ह आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बोगस सॅनिटायझर बाजारात येणार नाहीत यादृष्टिने अन्न -औषध प्रशासनाला सूचना दिल्या असून सॅनिटायझर तसेच मास्कची विक्री होणार नाही, याची दक्षता घेण्यात येत आहे.
          जिल्ह्यात शासकीय तसेच महापालिका आणि खासगी हॉस्पीटलच्या सहकार्याने 98 विलगीकरण बेड तयार करण्यात आले असून 60 जणांची व्यवस्था असणारा अलगीकरण कक्षही तैनात केला असल्याचे सांगून जिल्हाधिकारी दौलत देसाई म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक वैयक्तिक सुरक्षा किट तसेच मास्कची पुरेशी मागणी करण्यात आलेली आहे.

सुट्टीच्या दिवशीही मुख्यालय सोडू नये- जिल्हाधिकारी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा सुट्टीच्या दिवशीही कार्यरत ठेवण्यात येणार असून सर्व संबंधित यंत्रणेतील अधिकारी- कर्मचाऱ्यांनी शनिवार, रविवार या सूट्टीच्या दिवशीही आपले मुख्यालय सोडू नये, अशी सूचनाही जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.

       कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील जनतेची सुरक्षितता आणि आरोग्यास प्रशासनाने प्राधान्य दिले असून त्यादृष्टिने आवश्यक उपाययोजना केल्या जात असल्याचे सांगून जिल्हाधिकारी दौलत देसाई म्हणाले, जिल्ह्यात नजिकच्या काळात होणाऱ्या यात्रा, उरुस, जत्रा, मेळावे, महोत्सव, शासकीय कार्यक्रम तसेच गर्दी होणारे कार्यक्रम स्थगित करणे आवश्यक असून त्यादृष्टिने प्रशासनामार्फत संबंधितांना सूचना करण्यात येत आहेत. जिल्ह्यातील  नगरपालिकांमध्ये 15 खाटांची विलगीकरण कक्षाची व्यवस्था करण्यात येत आहे. वैद्यकीय व्यावसायिकांनी येणाऱ्या रूग्णांची लक्षणे तपासून हिस्ट्रीची नोंद घ्यावी आणि संबंधित प्रशासकीय यंत्रणेला तात्काळ कळवावे. कोरोनाची भीती अजिबात बाळगू नये. मात्र आवश्यक ती खबरदारी जरूर घ्यावी, असेही ते म्हणाले.
       मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी जिल्ह्यात घरोघरी जाऊन कोरोना प्रतिबंधक उपाययोजना आणि घ्यावयाची काळजी याचे प्रबोधन केले जात आहे. शाळां, महाविद्यालयांची स्नेहसंमेलने स्थगित करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये नियंत्रण कक्ष कार्यरत केला आहे. सर्व यंत्रणा सजग ठेवल्याचेही ते म्हणाले.
          महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी म्हणाले, शहरात महापालिकेच्या वतीने स्वच्छता मोहिम अधिक गतिमान करण्यात आली असून सार्वजनिक स्वच्छतेबरोबर वैयक्तिक स्वच्छतेबाबत प्रबोधन करण्यात येत आहे. पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख यावेळी म्हणाले, जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवनार नाही यादृष्टिने काळजी घेतली जात आहे. तरुणांनी तरुणांबाबत खुडसाळपणे समाजमाध्यमांमधून अफवा पसरविणाऱ्यावर सायबर सेलची करडी नजर असून अशा अफवा पसविणाऱ्यांचा शोध घेवून संबंधितांवर कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला.
          या व्हिडीओ कॉन्फरन्सला जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षला वेदक यांच्यासह सर्व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.          
00000


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.