कोल्हापूर, दि. 5 (जि.मा.का.) : सीपीआर रूग्णालय, वैद्यकीय
महाविद्यालय, महापालिका वैद्यकीय विभाग आणि जिल्हा परिषद आरोग्य विभागाने कोरोना
विषाणूच्या खबरदारीसाठी योग्य ते नियोजन करावे. एन 95 मास्कची खरेदी करण्याबरोबरच
विलगीकरण कक्ष तयार करावेत. खासगी रूग्णालयांमध्येही विलगीकरण कक्ष करण्यासाठी
पाहणी करावी, अशी सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज दिली.
आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण व
आपत्ती व्यवस्थापन समितीची जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती शिवाजी सभागृहात
बैठक झाली. या बैठकीला महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, निवासी
उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी.सी. केम्पीपाटील,
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे आदी
उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी
सुरूवातीलाच आरोग्य विभागाच्या तयारीबाबत आढावा घेतला. एकूण 34 विलगीकरण कक्ष तयार
असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली. जिल्हाधिकारी श्री. देसाई
यावेळी म्हणाले, प्रथम टप्प्यात किमान 100 बेड विलगीकरण कक्षाची तयारी ठेवावी.
त्यादृष्टिने खासगी रूग्णालयाची पाहणी करून यादी तयार करावी. पर्यटक अथवा बाहेरून
येणाऱ्या व्यक्तींबाबत विशेष काळजी घ्यावी. एन 95 मास्कचा पुरेसा साठा उपलब्ध
ठेवण्यासाठी त्याची खरेदी करावी. वर्तमानपत्रे, आकाशवाणी तसेच एफएम वाहिन्या यावरून
उपाययोजना याबाबतची जनजागृती करावी. नागरिकांमध्ये भीती पसरणार नाही याची काळजी घ्यावी.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.