रविवार, ८ मार्च, २०२०

तू रोज एक नेम कर... स्वत: वर तू प्रेम कर... दोन कुटुंबांची जबाबदारी सांभाळणाऱ्या महिलांचा सन्मान करा - ॲड. यशोमती ठाकूर












कोल्हापूर, दि. 8 (जि.मा.का.) : इतुके दिवस बोललो..ओठातल्या ओठात आम्ही
आता कोठे बोलावयाची खरी सुरुवात केली..
तू रोज एक नेम कर.. स्वत:वर तू प्रेम कर..’
या कविता वाचनातून महिलांना संदेश देतानाच दोन्ही कुटुंबांची, घराण्यांची नावे आणि जबाबदारी सांभाळणाऱ्या महिलेला आरक्षण द्या अगर न द्या सन्मान मात्र जरुर द्या, अशी भावना महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज व्यक्त केली.
उमेद- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, ग्राम विकास व पंचायत राज अभियान, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून येथील तपोवन मैदानावर जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिला सक्षमीकरण मेळाव्याचे उद्घाटन आज झाले. यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील, आमदार ऋतुराज पाटील, आमदार चंद्रकांत जाधव, आमदार राजू आवळे, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, माजी खासदार निवेदिता माने आदी उपस्थित होते.
महिला व बाल विकास मंत्री ॲड. ठाकूर यांनी सुरुवातीलाच कविता वाचन करुन महिला सक्षमीकरणाचा संदेश दिला. ‘जे केले नाहीस आजवर ते तू कर, सगळे नाही चे पाढे तू आता तोडून टाक.. आरशात बघून स्वत:ला... म्हण तुझ्यासारखी  नाही बरं का कुणी.. एकदा तू एकटी बाहेर पड.. तू स्वत:ला म्हण तू सुंदर आहेस.. तू स्वत:वर प्रेम कर’ या कविता वाचनाला उपस्थित महिलांनी टाळ्यांच्या कडकडाटात भरभरुन दाद दिली.
त्या पुढे म्हणाल्या, दोन्ही घराण्यांची जबाबदारी सांभाळताना प्रेमापेक्षा जास्त जबाबदारी महत्त्वाची असते, ती तुम्ही सक्षमपणे सांभाळत असताच. आंध्र प्रदेशच्या धर्तीवर महिलांच्या सुरक्षेचा कायदा आम्ही करतो. महाराष्ट्राच्या अंदाजपत्रकात अर्थमंत्र्यांनी प्रथमच जेंडर बजेटींगचा उल्लेख केला. विभागस्तरावर महिला आयोगाचे रिसिव्हिंग केंद्र सुरु करतोय. महिला बचत गटांच्या उत्पादनाला मोठी बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक महिला ही आपल्या  कुटुंबातील सदस्य आहे, ही जबाबदारी प्रत्येकाने ठेऊन तिला सुरक्षा द्यायला  हवी, असेही त्या म्हणल्या.  
पालकमंत्री श्री. पाटील यावेळी म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महिलांना आरक्षण मिळाल्यापासून त्या सक्षमपणे काम करीत आहेत. जिल्हा परिषदेमध्ये महिलाराज आहे. बचत गटाच्या अध्यक्ष ही नवी ओळख पुढे आली आहे. असंघटीतपणे काम करणाऱ्या ज्या महिला आहेत, महाराष्ट्राच्या जीडीपीमध्ये त्यांचे मोठे योगदान आहे. त्याचे मुल्यमापन होणे आवश्यक आहे. जिल्ह्यामध्ये दुध व्यवसायात मोठ्या प्रमाणात महिलांचे योगदान आहे. यावरच ग्रामीण आर्थिक व्यवस्था टिकून आहे. दुधाला लवकरच आम्ही चांगला भाव देणार आहोत. या व्यवसायामध्ये नवी संकल्पना उमेदने आणावी ती महिलांसाठी संजीवनी ठरेल. त्याचबरोबर संजय गांधी निराधार योजनेमधील कांही अटी बदलाव्या लागतील. बचत गटांना मिळणाऱ्या निधीचा वापर महिलांनी उद्योग, व्यवसायासाठी करुन विकासात हातभार लावावा.
ग्रामविकास मंत्री श्री. मुश्रीफ यावेळी म्हणाले, पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून चालणाऱ्या महिलांना बरोबर घेतले नाही म्हणून आशिया खंडातील देश मागे राहिले. महिलांना या आधीच सोबत घेतले असते तर देश महासत्ता झाला असता. यापुढे भविष्यात ती भूमिका आपल्याला घ्यावी लागेल आणि संसद, विधानसभेत आरक्षण द्यावे लागेल. बचत गटाच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी शासन प्रयत्न करीत आहे. जिल्ह्यामध्ये दुधाच्या पदार्थांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठीही प्रयत्न केले जातील. महिलांचे सक्षमीकरण होणे आवश्यक आहे. आंध्रप्रदेशच्या धर्तीवर महिला सुरक्षा कायदा केला जाईल. त्याचबरोबर आरोपीला लवकरात लवकर कशी शिक्षा होईल याबाबतही कायदा करु.
लवकरच 65 वर्षांवरील ज्येष्ठांच्या मदत निधीत 1 हजारांची वाढ केली जाईल. मागील पाच वर्षांत बंद झालेल्या पेन्शन योजना सुरु करु, उत्पन्न मर्यादा 21 हजारांवरुन 50 हजार करु. त्याचबरोबर मायक्रो फायनान्स,  खासगी सावकारांच्याकडून घेतलेले कर्ज माफ करण्याबाबत आमचे प्रयत्न सुरु आहेत.  महिलांना संरक्षण देणे, त्यांना स्वत:च्या पायावर उभे करणे हे आमचे कर्तव्य आहे. लवकरच शासकीय रिक्त जागेची मेगा भरती सुरु होईल. मुलाबाळांना शिकवा, उद्योगात सक्षमपणे काम करा तरच हा मेळावा यशस्वी होईल, असेही ते शेवटी म्हणाले.
यावेळी एका मुलीवर अथवा दोन मुलींवर कुटुंब नियोजन करणाऱ्या जोडप्यांना ताराराणी प्राधान्य कार्डचे वाटप, विविध महिला स्वयंसहाय्यता समुहांना सीआयएफ तसेच विविध राष्ट्रीयकृत बँकांच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले. यलो रिव्होल्युशन, पोषण पंधरवड्याचा शुभारंभ आणि पोषण आकार दिनदर्शिकेचे प्रकाशन यावेळी उपस्थितांच्या हस्ते करण्यात आले. 
महिला व बालविकास सभापती डॉ. पद्माराणी पाटील यांनी सुरुवातीला सर्वांचे स्वागत केले. उमेदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला यांनी प्रास्ताविकात विविध योजनांची माहिती दिली. समाज कल्याण सभापती स्वाती सासणे यांनी सर्वांचे आभार मानले. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सतीश पाटील, सभापती हंबीरराव पाटील, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक उदयानी साळुंखे आदींसह पाच जिल्ह्यातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
000000


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.