मंगळवार, १० मार्च, २०२०

जिल्ह्यामध्ये कोरोनाचा रुग्ण नाही नागरिकांनी घाबरु नये, खबरदारी घ्यावी -जिल्हाधिकारी दौलत देसाई



       कोल्हापूर, दि. 10 (जि.मा.का.) : जिल्ह्यामध्ये एकूण 16 जण परदेशातून आले आहेत. त्यापैकी 9 लोकांचा 14 दिवसाची निरीक्षण कालावधी पूर्ण झाला असून उर्वरीत 7 जणांवर निरीक्षण चालू आहे. जिल्ह्यामध्ये कोरोनाचा रुग्ण नाही. नागरिकांनी घाबरुन जावू नये. परंतु, खबरदारी घ्यावी, असे आवाहन करतानाच खबरदारीसाठी सर्व यंत्रणा सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
       जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेला महानगरपालिका आयुक्त डॉ. मलिनाथ कलशेट्टी, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.योगेश साळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी.सी. केम्पीपाटील उपस्थित होते.
            जिल्हाधिकारी श्री देसाई यावेळी म्हणाले, स्थानिक स्वराज्यस्ंस्था व सर्व सबंधित अधिकारी योग्य नियोजन व अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिली आहे. कोरोना व्हायरस प्रतिबंध होण्यासाठी तातडीने कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना जिल्हा शल्यचिकित्सकांना दिल्या आहेत. सी.पी.आर. हॉस्पीटलमध्ये एकूण २० बेड, आयसोलेशन हॉस्पिटल मध्ये १० बेड, इचलकरंजी आय.जी.एम. येथे ४ बेड, गडहिंग्लज उप जिल्हा रुग्णालयात ४ बेड व खासगी रुग्णालय अॅस्टर आधार येथे १० बेड असे एकूण ४८ आयसोलेशन बेड रुग्णांसाठी तयार ठेवण्यात आलेले आहेत. त्याच बरोबर करोनाग्रस्त देशामधील परदेशवारी करुन आलेल्या एकदम जास्त लोकाची संख्या असल्यास त्यांना एकत्रीत ठेवून विलगीकरण करण्यासाठी अलगीकरण कक्ष (कोरोनटाईन) तयार करण्यात आला आहे. या अलगीकरण (कोरोनटाईन) कक्षामध्ये ज्या लोकांना कोरोनाचे आजाराचे लक्षणे नाहीत अशा लोकांना १४ दिवस एकत्र ठेवून निरीक्षण करण्यासाठी अलगीकरण (कोरोनटाईन) पशुसंवर्धन प्रशिक्षण केंद्र येथे तयार करण्यात आलेले आहे. त्यामध्ये ४० रुग्णांना ठेवण्याची व्यवस्था आहे. तसेच गरज पडल्यास प्रशिक्षण केंद्राच्या मेस मध्ये २० रुग्णांचे व्यवस्था करण्यात येऊ शकते.
            आतापर्यंत दि. २ फेब्रुवारी २०२० पासून एकुण १६ लोक कोरोनाग्रस्त देशातून प्रवास करुन जिल्ह्यामध्ये आलेले आहेत. चीनमधून ५, इटलीतून ४, इराणमधून १ व सऊदी अरेबिया येथून ६ आलेले आहे.  पैकी ०९ लोकांची १४ दिवसाचा निरीक्षण कालावधी पूर्ण झालेला असून त्यांना कोणत्याही प्रकारे कोरोना सदृश आजाराची लक्षणे नाहीत. उर्वरित ०७ लोकांवर निरीक्षण चालू असून त्यांचा १४ दिवसाचा निरीक्षण कालावधी पूर्ण होणे बाकी आहे. त्यांनाही कोणत्याही प्रकारची लक्षणे नाहीत.
            जिल्ह्यामध्ये पूर्वतयारी नियोजनासाठी कृती कार्यक्रम तयार करण्यात आलेला असून
प्रसार रोखण्यासाठी तालुकास्तरावर समिती स्थापन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. जनतेमध्ये
भीतीयुक्त वातावरण तयार होऊ नये म्हणून व्यापक प्रसिध्दी तसेच दृकश्राव्य माध्यमातून
आजाराची जनजागृती करण्याच्या सूचना दिली आहे. यामध्ये शाळा अंगणवाडी मध्ये हात धुण्याची प्रात्यक्षिके, ग्रामपंचायतीच्या माध्यमातून माईकींग करणे यांचा समावेश आहे. शहरामध्ये १० वेगवेगळ्या ठिकाणी या आजारा संबंधी माहिती फलक व होर्डीग लावणेत येणार आहेत. चित्रपटगृह व केबल नेटवर्कद्वारे माहिती माध्यमातुन माहिती देणेबाबत सूचना दिली आहे. सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता ठेवणे उदा. बसस्टॅण्ड, रेल्वेस्टेशन, मॉल्स, हॉटेल्स, बॅंक्स, ए.टी.एम. इत्यादी ठिकाणी वारंवार निर्जंतुकीकरण करण्याची सूचना दिली आहे.
            एम. आर. पी पेक्षा जास्त किंमत घेतल्यास कारवाई- जिल्हाधिकारी
निर्जंतुकीकरणाची द्रावणे व मास्क यांची विक्री  एम. आर. पी पेक्षा जास्त किंमतीला दुकान दार करत असल्यास अशा दुकानांवर आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 नुसार कारवाई केली जाईल असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिला.
            कोरोनासंदर्भात माहितीसाठी नियंत्रण कक्षाची स्थापन करण्यात आली आहे.  जिल्हा आपत्ती कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय ०२३१- २६५९२३२ व १०७७ जिल्हा परिषद आरोग्य विभाग येथे संपर्क नं. ०२३१-२६६१६५३ व सी.पी.आर हॉस्पिटल येथील ०२३१-२६४०३५५ असून त्या त्या तालुकास्तरावर देखील नियत्रंण कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे.
0000



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.