बुधवार, १८ मार्च, २०२०

सीपीआरमधील विलगीकरण कक्षास राज्यमंत्र्यांची भेट कोरोनाच्या तपासणीसाठी मिरजमध्ये लवकरच नवीन लॅब - सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर








          कोल्हापूर, दि. 18 (जि.मा.का.): कोरोना रुग्णांच्या तपासणीसाठी मिरजमध्ये लवकरच नवीन लॅब उभी करीत आहोत. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अद्याप एकही कोरोना बाधीत रुग्ण आढळला नाही. यापुढचा टप्पा अतिशय महत्त्वाचा व काळजी घेणारा असल्याने वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या सूचनांचे पालन करून शासनाला सहकार्य करावे,असे आवाहन सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी केले.
        छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयातील कोरोना रुग्णांसाठी तयार करण्यात आलेल्या  विलगीकरण कक्षास सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री श्री. यड्रावकर यांनी आज भेट देवून पाहणी केली. यावेळी तपासणीसाठी नेपाळहून आलेल्या 43 प्रवाशांची भेट घेवून त्यांनी विचारपूस केली. या प्रवाशांपैकी कोणालाही कोरोनाची लक्षणे नाहीत. यानंतर कोरोनाबाबत आरोग्य विभागाने केलेल्या उपाययोजनांचा त्यांनी आढावा घेतला. यावेळी  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, आरोग्य उपसंचालक डॉ. हेमंतकुमार बोरसे, राजर्षी शाहू वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी.सी. केम्पी पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, विजय देवणे, राजेश लाटकर आदींसह वैद्यकीय अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.
            राज्यात उद्भवलेल्या कोरोनाबाबत शासन गंभीर असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विभाग युध्दपातळीवर काम करीत आहेत, असे सांगून सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री श्री. यड्रावकर म्हणाले, कोरोना रुग्णांच्या तपासणीसाठी मिरजमध्ये लवकरच नवीन लॅब उभी करीत आहोत. कोरोना प्रतिबंधासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना आरोग्य विभागास देण्यात आल्या आहेत. यात बाहेरून येणाऱ्या प्रवाशांवर विशेष लक्ष देण्याची सूचना करण्यात आली आहे. शासकीय  रुग्णालयांबरोबरच इंडियन मेडिकल असोसिएशनचे सहकार्य घेणार असून, जिल्ह्यामध्ये अद्याप एकही कोरोना बाधीत रुग्ण आढळला नसल्याचे त्यांनी सांगितले.
            कोरोनाच्या दृष्टीने यापुढचा टप्पा अतिशय महत्त्वाचा व काळजी घेणारा असल्याने नागरिकांनी वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या सूचनांचे पालन करून शासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले. यानंतर सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री श्री. यड्रावकर यांनी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याशी चर्चा करून  कोरोनाबाबत केलेल्या उपाययोजनांची  माहिती घेतली.
00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.