शुक्रवार, २० मार्च, २०२०

सर्व रेस्टॉरंटस्, हॉटेल्समध्ये उपाययोजनेसाठी दैनंदिन स्वच्छता ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश



       कोल्हापूर, दि. 20 (जि.मा.का.) : कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी सर्व रेस्टॉरंटस्, हॉटेल्स, विश्रांतीगृहे, खाद्यगृहांमध्ये उपाययोजना करण्यासाठी आस्थापनेची दैनंदिन स्वच्छता ठेवण्यात यावी, आस्थापनेत येणाऱ्या व्यक्तीस सेवा देताना दोन व्यक्तींमध्ये किमान 3 फूट किंवा 1 मीटरचे अंतर असावे, आस्थापनेत येणाऱ्या व्यक्तीस, ग्राहकास हात धुण्यासाठी पुरेशा प्रमाणात पाणी व साबण किंवा सॅनिटायझर उपलब्ध करून द्यावेत, असे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज दिले आहेत.
       कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा भाग म्हणून खबरदारी घेण्याच्या अनुषंगाने आस्थापनेत वारंवार वापरल्या जाणाऱ्या वस्तू, बैठकीची ठिकाणे, स्वच्छतागृहे (दरवाजाचे हॅन्डल, टेबल, खुर्ची, जिन्यातील रेलिंग्ज, पाण्याचे जार, ग्लास इ.) वारंवार साबणाने ,सॅनिटायझरने स्वच्छ करण्यात यावी. कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी अनावश्यक गर्दी टाळावी.
          या आदेशानुसार तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधित आस्थापनांना देण्यात येत आहेत. त्याप्रमाणे  आदेशाचे पालन  न करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती अथवा संस्थांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 तसेच भारतीय दंडसंहिता 1960 चे कलम 188 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल आणि पुढील कार्यवाही करण्यात येईल.
000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.