कोल्हापूर, दि. 17 (जिमाका) : करवीर निवासीनी श्री अंबाबाई मंदिरातील दर्शनासह
जिल्ह्यातील चर्च, मस्जिद अशा धार्मिक स्थळांमध्ये सामुहिक प्रार्थना बंद
ठेवण्याचा निर्णय जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या सर्व धर्मिय प्रमुख प्रतिनिधी,
देवस्थान समितीचे पदाधिकारी, प्रमुख प्रतिनिधी यांच्या बैठकीत एकमुखाने आज घेण्यात
आला. याच बैठकीत श्री क्षेत्र जोतिबा यात्राही पुढील आदेशापर्यंत स्थगित ठेवण्याचा
निर्णय घेण्यात आला. मी कोल्हापुरी सुरक्षित माझे कोल्हापूरही सुरक्षित
जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केलेल्या या नव्या मोहिमेला उपस्थितांकडून प्रतिसाद
मिळाला.
जिल्हाधिकारी
कार्यालयातील राजर्षी छत्रपती शाहू सभागृहात जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या
अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश
जाधव, महापौर निलोफर आजरेकर, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, पोलीस
अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे, प्रांताधिकारी वैभव
नावडकर, कोल्हापूर चर्च कौन्सिलचे रेव्ह. सॅमसन समुद्रे, मेमोरियल चर्च कौन्सिलचे रेव्ह.
डी.बी. समुद्रे, सेंट झेंवियर्स चर्चचे फादर जेम्स थोरात, जमिअत उलमा शहरचे मौलाना
अझहर सय्यद, मुस्लिम बोर्डींगचे प्रशासक अ.कादर हमजा मलबारी, मुस्लिम बोर्डाचे
अध्यक्ष गणी आजरेकर, देवस्थान समितीचे सचिव विजय पोवार,कोल्हापूर जिल्हा बैतुलमाल
समितीचे वसिम बशीर चाबुकस्वार, जाफर सय्यद बाबा, हज समितीचे इकबाल बादशहा देसाई,
माजी नगरसेवक आदिल फरास आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी
श्री. देसाई यावेळी म्हणाले, कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी प्रशासनामार्फत
विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. प्रशासनाने केलेल्या आवाहनाला सर्वांनी
सकारात्मक प्रतिसाद दिला. स्वत:हून समारंभ,यात्रा, जत्रा, ऊरूस, मेळावे न करण्याचा
निर्णय घेतला. त्याबद्दल मी सर्वांना धन्यवाद देतो. जिल्ह्यामध्ये एकही कोरोना
रूग्ण नाही ही चांगली बाब आहे. पुढील परिस्थिती निवळेपर्यंत मी कोल्हापुरी
सुरक्षित माझे कोल्हापूरही सुरक्षित ही मोहीम राबवू. त्यासाठी सामुदायिक गर्दी
होणार नाही याचा निर्णय आपणाला घ्यावा लागेल, असे आवाहनही त्यांनी केले. या
आवाहनाला उपस्थितातून सकारात्मक प्रतिसाद मिळाला.
मुस्लिम
बोर्डींगचे अध्यक्ष श्री. आजरेकर यावेळी
म्हणाले, 31 मार्चनंतर इज्तेमा होणार आहे.
मस्जिदमध्ये बाहेर गावाहून येणाऱ्या कोणालाही प्रवेश देण्यात येणार नाही. लग्न
कार्यालय बंद केले आहे. त्याचबरोबर शुक्रवारी होणाऱ्या नमाजबाबत तातडीची बैठक
बोलावली असून त्याबाबतही सकारात्मक निर्णय घेतला जाईल. मुस्लिम समाज प्रशासनाच्या
निर्णयाबरोबर आहे.
पश्चिम
देवस्थान समितीचे अध्यक्ष श्री. जाधव यावेळी म्हणाले, प्रशासनामार्फत चांगली
दक्षता घेतली जात आहे. भविष्यामधील धोका टाळण्यासाठी आत्ताच सर्वांनी दक्षता घेवू.
त्यानुसार श्री अंबाबाई मंदिर, जोतीबा मंदिर, वड्यावरचा गणपती, दत्त भिक्षालिंग
यासह अन्य देवस्थानमधील दर्शन पुढील काळासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 81
प्रभागामध्ये जनजागृती करण्यासाठी प्रत्येक डॉक्टरची नियुक्ती करावी. तरूण मंडळे,
सामाजिक संस्था यांनाही जनजागृतीबाबत जबाबदारी द्यावी. देवस्थान समितीच्या मार्फत
प्रशासनाला निर्जंतुकीकरण द्रावणे, मास्क, मनुष्यबळ याचा पुरवठा करून सहकार्य करू.
रेव्ह.
समुद्रे, फादर थोरात यांनीही यावेळी प्रशासनाला पूर्ण सहकार्य करून सामुहिक
प्रार्थना बंद ठेवत असल्याचे सांगितले. महापौर श्रीमती आजरेकर यांनीही यावेळी
महापालिकेच्यावतीने योग्य त्या उपाययोजना करत असल्याचे सांगून सर्व धर्मगुरूंनी
घेतलेल्या निर्णयाचे स्वागत केले. माजी नगरसेवक श्री. फरास म्हणाले, सामाजिक
प्रश्नासाठी समुदायाने आपण रस्त्यावर उतरत होतो पण आता कोरोना विषाणूचा प्रश्न
सोडवण्यासाठी आपण घरातच बसूया. माणूस वाचला तरच धर्म राहिल त्यामुळे भारतीय म्हणून
सर्वांनी प्रशासनाला मदत केली पाहिजे.
महापालिका
आयुक्त डॉ. कलशेट्टी म्हणाले, प्रशासनाने केलेल्या आव्हानाला जनतेकडून सकारात्मक
प्रतिसाद मिळाला आहे. श्री स्वामी समर्थ प्रकट दिन सोहळा त्याच बरोबर श्री साई
मंदिर समितीने प्रसाद सोहळा स्वत:हून रद्द केला आहे. तालिम मंडळे, सर्व आस्थापना
यांनाही योग्य त्या सूचना दिल्या आहेत. किरणा वस्तु खरेदी करताना लोकांनी अनावश्यक
गर्दी करु नये असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
जोतिबा
देवस्थानचे पुजारी आनंदा लादे यांनी यावेळी ग्रामपंचायत, 10 गावाचे गावकरी आणि
पुजारी यांची आज बैठक झाल्याचे सांगून जोतिबाची यात्रा रद्द करण्याबाबत निर्णय
घेतल्याचे सांगितले.
पोलीस
अधीक्षक श्री. देशमुख यावेळी म्हणाले, एका व्यक्तीचा धोका सर्वांना भोगावा लागू
नये त्यादृष्टीने आपण निर्णय घेवू, सामुदायिक कार्यक्रम टाळावेत, जीवनावश्यक
वस्तुंचा पुरवठा हा खुला राहणार आहे. त्याबाबत कोणतीही टंचाई भासणार नाही. समाज
माध्यमांचा सकारात्मक वापर करावा.
त्या मेडिकलवर कारवाई करु-जिल्हाधिकारी
मास्कची सर्वांचा आवश्यकता नाही, असे सांगून साधा
रुमाल वापरावा, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी यावेळी केले. जनतेला
वेठीस धरुन मास्क, निर्जंतुक द्रावणे छापील किंमतीपेक्षा जादा दराने विकणाऱ्या
मेडिकल स्टोअर्सवर कारवाई करावी असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
|
0 0 0 0 0
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.