गुरुवार, ९ डिसेंबर, २०२१

उत्कृष्ट युवा मंडळ पुरस्कारासाठी 15 डिसेंबरपर्यंत अर्ज सादर करावेत

 


 

कोल्हापूर, दि. 9 (जिमाका) : युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालय भारत सरकारच्या नेहरू युवा केंद्र संगठन मार्फत प्रत्येकवर्षी देण्यात येणाऱ्या उत्कृष्ट युवा मंडळ पुरस्कारासाठी मंडळाकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.  ग्रामीण भागात सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या युवा मंडळास जिल्हा, राज्य व राष्ट्रीय अशा तीन पातळीवर पुरस्कार देण्यात येतात. सविस्तर अहवाल कार्यक्रमाचे पूर्ण महितीसह फोटो, वर्तमानपत्र कात्रणे, कार्यक्रमाचे निमंत्रण पत्रिका इत्यादी माहितीसह आणि विहित नमुन्यात अर्ज नेहरू युवा केंद्राकडे दि. 15 डिसेंबरपर्यंत सादर करावेत, असे आवाहन जिल्हा युवा अधिकारी, पूजा सैनी  यांनी केले आहे.

        जिल्हा पातळीवर निवड केलेल्या युवा मंडळास रु. 25 हजार, राज्य पातळीवर रु. 1 एक लाख, राष्ट्रीय पातळीवर  प्रथम 5 पाच लाख, द्वितीय 3 तीन लाख, तृतीय 2 दोन लाख  अशा तीन क्रमांकावर रोख रक्कम आणि प्रशस्तीपत्र या स्वरुपात युवा मंडळस पुरस्कार दिला जातो.

       पुरस्कार निवडीसाठी मंडळाने Covid-19 व लसीकरण जनजागृती, रक्तदान, वृक्षारोपण, व्यसनमुक्ती, साक्षरता, एड्स निर्मूलन, पाणलोट क्षेत्र विकास, राष्ट्रीय एकात्मता, मोलमजुरी निर्मूलन, आपत्कालीन सहाय्य, ग्रामस्वच्छता, निर्मलग्राम रोजगार निर्माण, प्रधानमंत्री जनधन योजना, मुद्रा बँक योजना, कुटुंब कल्याण, बचतगट, क्रीडा,  कौशल्यव्यवसाय प्रशिक्षण, पल्स पोलिओ, साक्षरता कार्यक्रम, महिला सशक्तीकरण, रोजगार निर्मिती, स्वच्छता मोहीम, वाईट चालीरीती विरोधी कार्यक्रम, राष्ट्रीय दिन व इतर समाजकल्याणचे कार्यक्रम राबविणे गरजेचे आहे. मुलगी वाचवा अभियान, स्वच्छ भारत समर इंटरशिप कार्यक्रम कुटुंब कल्याण नियोजन, बचतगट यासाठी केलेले कार्यक्रम विशेष विचारात घेतले जाईल. पुरस्कारासाठी 1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2021 या कालावाधीतील कार्य व कार्यक्रमाचे मूल्यांकन करून पुरस्कार निवडले जातात. तसेच पुरस्कारासाठी अर्ज करणारे युवा मंडळ 3 वर्षापूर्वीचे नोंदनीकृत आणि नेहरू युवा केंद्राशी सलग्न असावे.

       अधिक माहितीसाठी नेहरू युवा केंद्र, कोल्हापूर येथे संपर्क साधावा. दूरध्वनी क्र. 9423865560

 00 0 0 0

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.