शुक्रवार, १० डिसेंबर, २०२१

बार्टी तर्फे संविधान साक्षरता अभियान

 


 

कोल्हापूर, दि. 10 (जिमाका) :  राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्था डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) च्या वतीने करवीर तालुक्यात संविधान साक्षरता अभियान उपक्रमांतर्गत करवीर तालुक्यातील वसगडे या गावची निवड करण्यात आली आहे. या गावांमध्ये संविधानावर आधारित प्रश्नमंजुषा, वत्कृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, विविध चर्चासत्र, परिसंवाद शाळा व महाविद्यालय ठिकाणी 'संविधानातील मूलभूत हक्क व कर्तव्य' यासंदर्भात कार्यशाळा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. 

              अस्पृश्यता निवारण व जातीय सलोखा वृद्धिंगत होण्यासाठी अनुसूचित जाती- जमाती प्रतिबंधक कायदा 1989 सुधारित अधिनियम 2016 तसेच जातपंचायतीचे वास्तव व जाती- अंत करिता आंतरजातीय विवाह यांची आवश्यकता या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करणे, महिला व बाल हक्क यांचे अधिकार याबाबत कार्यशाळा आयोजित करणे, कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण याविषयी कार्यशाळा, लोकशाही बळकटीकरण यामधील माहितीचा अधिकार याविषयी कार्यशाळा, अंधश्रद्धा निर्मूलन, जादूटोणा विरोधी कायदा या विषयी कार्यशाळा, विविध शासकीय योजनांची प्रचार व प्रसिद्धी करण्यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन, आरोग्य पर्यावरण व कृषी विषयक संविधानिक तरतुदी व त्यानुषंगाने शासनाच्या विविध योजना या विषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

         अशा प्रकारचे कार्यक्रम दि. 26 नोव्हेंबर  ते 26 जानेवारी 2022 पर्यंत वसगडे या गावामधे राबविण्यात येणार आहेत. या सर्व कार्यक्रमाचे आयोजन करवीर तालुका समतादुत आशा रावण या करणार आहेत. यावेळी ग्रामपंचायतचे ग्रामसेवक गिरीगोसावी, सरपंच नेमगोंडा पाटील, उपसरपंच संजय पाटील, सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. 

            कार्यक्रमाचे  आयोजन बार्टी चे  महासंचालक धम्मज्योती गजभिये, कोल्हापूर समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे, बार्टी चे कोल्हापूर जिल्हा प्रकल्प अधिकारी गणेश सवाखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली  करण्यात आले.

00000

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.