गुरुवार, २३ डिसेंबर, २०२१

अंधश्रध्दा निर्मुलनासाठी जादूटोणा विरोधी कायद्याचा मोलाचा हातभार -राज्य सहकार्यवाहक भास्कर सदाकळे

 




कोल्हापूर, दि. 23 (जिमाका) : विविध प्रात्यक्षिकांमधून बुवाबाजी करणारे भोंदू लोक समाजामधील भोळ्या भाबड्या लोकांना फसवतात. प्रत्येकाने अंधश्रध्दा निर्मुलन करणे ही काळाची गरज आहे. समाजामधील अनिष्ठ प्रथांवर कार्यक्षम उपाय हा समाज प्रबोधनाने होत असून यासाठी जादूटोणा विरोधी कायद्याचा मोलाचा हातभार असल्याचे प्रतिपादन विज्ञान बोध वाहिनीचे राज्य सहकार्यवाहक भास्कर सदाकळे यांनी केले.

सहायक आयुक्त, समाज कल्याण व डी. के. शिंदे समाजकार्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने डी. के. शिंदे समाजकार्य महाविद्यालय येथे  ‘अंधश्रध्दा निर्मुलन : काळाची गरज’ या विषयावर व्याख्याने आयोजित केले होते त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे,  समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे, समाज कल्याण निरीक्षक दत्तात्रय पाटील हे उपस्थित होते.    

अंधश्रध्दा निर्मुलनाकरिता पोलीस विभागाबरोबर समाजामधील प्रत्येक घटकाने पुढाकार घ्यावा, असे मत पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी व्यक्त केले. अंधश्रध्देमुळे कुटुंबाचे प्रचंड मानसिक, शारिरीक, आर्थिक नुकसान होत असल्याने अंधश्रध्देपासून परावृत्त होण्याकरिता अशा प्रबोधनपर कार्यक्रमांची आवश्यकता असल्याचे नमुद करुन याबाबत समाज कल्याण विभाग व सायबर महाविद्यालय पुढाकार घेत असल्याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.

संत गाडगे महाराज यांच्या पुण्यदिनाचे औचित्य साधून या मार्गदर्शनपर व्याख्यानाचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त  विशाल लोंढे यांनी  प्रास्ताविकात दिली.

कार्यक्रमाच्या सुरूवातीला डॉ. टी. व्ही. जी. सरमा यांनी सायबर महाविद्यालयाची आजपर्यंत झालेली  वाटचाल भविष्यामधील दृष्ट‍िकोन विषद केला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी केले. आभार प्रदर्शन समाज कल्याण निरीक्षक दत्तात्रय पाटील सूत्रसंचालन शिवानंद पोळ शब्दाली मूळगांवकर यांनी केले.

कार्यक्‌रमास जिल्ह्यातील विजाभज आश्रमशाळेचे मुख्याध्यापक, निवासी शाळेचे मुख्याध्यापक, मुलांचे व मुलींचे वसतिगृह अधीक्षक, जिल्हा दक्षता व सनियंत्रण समितीचे अशासकीय सदस्य, तृतीयपंथी बांधव, समतादूत, ज्येष्ठ नागरिक, सायबर महाविद्यालयामधील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी कार्यालयीन अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.