बुधवार, १५ डिसेंबर, २०२१

जिल्हा व सत्र न्यायालयाच्या ई-सेवा केंद्रामार्फत विविध सुविधा उपलब्ध

 


 

कोल्हापूर, दि. 15 (जिमाका) : जिल्हा व सत्र न्यायालय, कोल्हापूर येथे २३ नोव्हेंबर २०२० रोजी ई-सेवा केंद्राची सुरुवात करण्यात आली आहे. यामध्ये खटल्याची स्थिती व पुढील सुनावणीची तारीख तसेच न्यायालयीन कामकाजासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे स्कॅन करणे व ई फायलिंग, प्रमाणित प्रती व न्यायालयीन कामकाजासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा, E Court App डाऊनलोड करण्याबाबत मार्गदर्शन, न्यायाधीन बंदी असलेल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी ई- मुलाखतीची सुविधा, रजेवरील न्यायाधीश संदर्भात माहिती तसेच विशिष्ट कोर्टाचे स्थान, सर्वोच्च न्यायालय कायदेशीर सेवा समिती, उच्च न्यायालय कायदेशीर सेवा समिती तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्याकडून विनामूल्य कायदेशीर सेवांबद्दल मार्गदर्शन, व्ही. सी. तारखांबाबत माहिती, ई मेल आणि व्हॉटस् अॅपच्या माध्यमातून न्यायालयीन आदेशांची व निर्णयांची सॉफ्ट कॉपी प्रदान करण्याची सोय इ. सुविधा या ई -सेवा केंद्रामध्ये उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

ई -सेवा केंद्रास आजपर्यंत ८ हजार ४५२ इतक्या पक्षकारांनी भेटी दिल्या आहेत. तसेच ई- सेवा केंद्रातर्फे त्यांना वरील नमूद सेवा दिल्या आहेत तसेच मार्गदर्शनही केले आहे. मध्यवर्ती कळंबा कारागृह व सब जेल, बिंदु चौक तुरूंगातील कैद्यांशी त्यांच्या नातेवाईकांची तसेच वकीलांची भेट होण्यासाठी ई मुलाखतीची सुविधा उपलब्ध केल्याने ई मुलाखतीसाठी आजपर्यंत २९८ अर्ज आले असून त्यातील २४७ नातेवाईकांची तसेच वकीलांची ई मुलाखतीद्वारे त्यांच्या बंदीवासी कैद्यांशी भेटी घडवून आणल्या आहेत. तसेच त्यांनी ई मुलाखतीद्वारे कैद्यांसोबत बोलण्यासाठी एक चांगला मार्ग केंद्राने दिलेला आहे,

‘ई मुलाखतीमुळे’लॉकडाऊनमध्ये नातेवाईकांना बंदीजनांना भेटण्याची एक चांगली संधी मिळाली, असे ई मुलाखतीबद्दल अभिप्रायही नोंदवले गेले आहेत. तसेच मध्यवर्ती कळंबा कारागृह येथून बंदीवासी कैद्यांचे त्यांच्या नातेवाईकांशी तसेच वकीलांशी ई मुलाखतीव्दारे भेट होण्यासाठी आजपर्यंत ८४ अर्ज आले आहेत. तसेच इतर सुविधाही लवकरच सुरू करण्यात येत असल्याची माहिती  जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव पंकज देशपांडे यांनी दिली आहे.

0000000

 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.