मंगळवार, १४ डिसेंबर, २०२१

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत आपल्या न्यायालयीन प्रकरणातील शंकांचे निरसन करण्याचे आवाहन

 


 

कोल्हापूर, दि. 14 (जिमाका) : जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या चौकशी विभागामध्ये १ जानेवारी  ते १३ डिसेंबर अखेर एकूण ४३२ जणांनी मोफत कायदेविषयक मार्गदर्शनाचा लाभ घेतला आहे. त्यापैकी १७२ लोकांना मोफत विधी सहाय पुरविण्यात आले आहे तसेच, १७१ लोकांना नोटीशीद्वारे मध्यस्थीसाठी बोलावण्यात आले आहे. चौकशी विभागात येवून आपल्या न्यायालयीन प्रकरणातील शंकांचे निरसन करण्याचे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव पंकज देशपांडे यांनी केले आहे.

       राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या आदेशानुसार जिल्हा व सत्र न्यायालय, कोल्हापूर येथील जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अंतर्गत चौकशी विभाग सुरु करण्यात आला असून हे कार्यालय मुख्य इमारतीच्या तळमजल्यावर दर्शनी भागामध्ये आहे. या कार्यालयामध्ये एक रिटेनर लॉयर व एक विधी स्वयंसेवक कार्यरत आहेत. कार्यालयात संगणक पुरविण्यात आलेले असून याद्वारे येणाऱ्या नागरिकांना न्यायदानाबाबतची व प्रलंबित प्रकरणांची सविस्तर माहिती देण्यात येते.

चौकशी विभागात येणाऱ्या पक्षकारांना अडीअडचणी तथा व्यथा समजून घेवून पुढील कायदेविषयक मार्गदर्शन तथा सल्ला दिला जातो व त्याप्रमाणे विरुद्ध पक्षकारांना मोफत मध्यस्थीची नोटीस पाठवून बोलावून घेतले जाते आणि त्यांच्यात तडजोड घडवून आणण्याकरिता प्रयत्न केला जातो. जर तडजोड झाली नाही तर कायद्याप्रमाणे कार्यवाही करण्यासाठी योग्य त्या कागदपत्रांची पूर्तता करून मोफत विधी सहाय्य पुरविण्यात येते व त्याप्रमाणे पक्षकारांची वर्गवारी पाहून मोफत विधी सहाय्य मिळण्याकरिता पुढील सल्ला दिला जातो आणि येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची नोंद घेतली जाते.

महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील न्यायालय प्राधिकरणामध्ये चौकशी विभागाची सोय करण्यात आली आहे तसेच तालुका विधी सेवा समितीमध्ये सुध्दा चौकशी विभागाची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली असून याकरीता एक विधी स्वयंसेवकांचीही नेमणूक करण्यात आली आहे.

0000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.